डॉ. भगवान दास संपूर्ण माहिती
जन्म व बालपण
डॉ. भगवानदास यांचा जन्म वाराणसीच्या एका वैश्य कुटुंबात १२ जानेवारी १८६९ रोजी झाला. त्यांचे वडील माधवदास बनारसचे एक प्रतिष्ठित खानदानी गृहस्थ होते. त्यांचे गावात खूपच वजन होते.
Table of Contents
Toggleमाधवदासांना चार मुलगे : गोविंददास, भगवानदास, रामचरण व सीताराम या चौघांनाही त्यांनी उच्चशिक्षित केले होते. यांच्यातील भगवानदास हे सर्वांत बुद्धिमान आणि मेधावी होते.
कौटुंबिक पार्श्वभूमी
भगवानदासांचे कुटुंब हे इंग्रजी राजवटीचे समर्थक व विरोधक यांच्यामधली कडी होते. त्या काळात खरं तर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाऱ्याच्या रूपात सहयोग दिला होता; तरीसुद्धा भारतीयत्व कधीही सोडले नव्हते.
चातुर्य, सत्यनिष्ठा व्यापारकुशलतेमुळे यांचे कुटुंब इंग्रजांच्या संपर्कात आले होते. असे म्हणतात की, जेव्हा भारतात प्रवास अतिशय दुष्कर होता, त्या वेळेला संपूर्ण भारतात त्यांच्या व्यापाराच्या पन्नास एक शाखा कार्यान्वित होत्या. त्यांच्या हुंड्या सर्व भारतभर चालत होत्या.
डॉ. भगवानदासांचे पूर्वज साहू मनोहर दास होते. त्यांनी भरपूर नाव कमावले होते व खूप मायाही जमवली होती. त्याचबरोबर दानधर्मही केला होता. असे सांगतात की, इंग्रजांनी टिपू सुलतानचा सामना करण्यासाठी जी फौज पाठवली होती, तिला रसद पुरविण्याचा ठेका यांच्याकडेच होता.
त्यातून मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी शेकडो बिघे जमीन खरीदली आणि गाईंना चारण्यासाठी दान केली. त्यातच पाणी पिण्यासाठी एक तलावही खोदला. हे साहू मनोहरदास खूपच दूरचा विचार करीत असत.
म्हणून आपल्या भविष्यात येणाऱ्या कोणत्याही पिढीला दारिद्र्याचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांनी कलकत्ता येथे आणखी मोठी जमीन विकत घेऊन तेथे एक मोठी चौकोनी बाजारपेठ बनविली. आजसुद्धा यांच्या कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाचे साधन म्हणजे हीच बाजारपेठ आहे.
अडीच-तीनशे वर्षांपूर्वी हे कुटुंब वाराणसीला आले. तिथे ते खानदानी, सुसंस्कृत, गर्भश्रीमंत म्हणून प्रसिद्ध पावले. या कुटुंबात लक्ष्मी व सरस्वती दोन्हीचा वास होता. तत्त्वज्ञानी असूनही व्यवहार पाळणारे होते.

डॉ. भगवान दास शिक्षण व ग्रंथ रचना
डॉ. भगवानदास यांनी आपले कुटुंब, घर, स्वकीय, समाज व राष्ट्र सर्वांप्रती असलेले आपले दायित्व पार पाडले. त्यांचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण वाराणसीतच झाले. वयाच्या १२ व्या वर्षी एंट्रन्स परीक्षा पास करून, क्विन्स कॉलेजमधून इंग्रजी मानसशास्त्र, तत्त्वज्ञान व संस्कृत हे विषय घेऊन बी. ए. केले. अलाहाबादमध्ये त्या वेळेला विद्यापीठ नसल्यामुळे एम. ए. करण्यासाठी त्यांना कलकत्त्याला जावे लागले.
‘तत्त्वज्ञान’ विषयात त्यांनी एम. ए. केले. या शिवाय संस्कृत, उर्दू, पारसी याही भाषांचा अभ्यास त्यांनी केला होता. सुरुवातीपासूनच त्यांचे अध्ययन व चिंतन अत्यंत एकाग्रतेने चालत असे. म्हणूनच केवळ २३ वर्षांच्या वयातच त्यांनी ‘सायन्स ऑफ पीस‘ व ‘सायन्स ऑफ इमोशन्स’ सारख्या ग्रंथांची रचना केली.
डॉ. भगवान दास संपूर्ण माहिती
डॉ. भगवान दास कलेक्टर
उच्च शिक्षण व खानदानी कौटुंबिक पाश्र्वभूमी यामुळे भगवानदासांसाठी सरकारी नोकरी सहज साध्य होती. त्यांना नोकरी नको होती; पण वडिलांच्या आग्रहामुळे वयाच्या एकविसाव्या वर्षीच ते उत्तर प्रदेशात तहसीलदार झाले.
नंतर कलेक्टर व मॅजिस्ट्रेटही झाले. जवळजवळ आठ वर्षे ते या पदांवर नोकरीत होते. इ. स. १८९७ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी ही सरकारी नोकरी सोडून दिली.
सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना
त्या काळात भारतात एक नवीन जागृती होत होती. देशातील जाणत्या लोकांना हे प्रतीत झाले होते की, देशाची संस्कृती, भाषा, इतिहास या बरोबरचस्वाभिमान जनतेमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी इंग्रज सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय शिक्षण संस्थांची आवश्यकता होती.
डॉ. अॅनी बेझंट वाराणसीमध्ये हिंदू कॉलेज स्थापन करण्याच्या विचारात होत्या. डॉ. भगवानदासनी त्यांना मदत केली आणि सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. या कॉलेजात धर्माचे शिक्षण अनिवार्य होते; म्हणून इंग्रज सरकारने आर्थिक अनुदान द्यायला साफ नकार दिला
आर्थिक अडचणीमुळे कॉलेज चालवणे कठीण झाले. तेव्हा डॉ. भगवानदास व त्यांचे बंधू श्री. गोविंददास यांनी अनेको कठीण झाले. तेव्हा जे-महाराजांकडे जाऊन त्यांच्याकडून मदतनिधी गोळा केला आणि सेंट्रल हिंदू कॉलेजचे स्वप्न साकार केले. एवढेच नाही, तर कॉलेजमध्ये साहित्य आणि दर्शनशास्त्र विषय शिकविण्याची जबाबदारीही स्वतःवर घेऊन ती समर्थपणे पूर्ण केली.
कॉलेज उत्तम प्रकारे कार्यान्वित झाले. त्या वेळेला पंडित मदन मोहन मालवीयजी बनारस हिंदू विश्वविद्यालय स्थापन करत होते. त्यामध्ये डॉ. भगवानदास यांनी त्यांना पूर्ण सहकार्य देऊन स्वतः मेहनतीने स्थापिलेले ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ‘बनारस हिंदू विश्वविद्यालयात’ अंतर्भूत केले.
डॉ. भगवान दास काशी विद्यापीठ स्थापना
सन १९२१ मध्ये गांधींनी पूर्ण असहकाराची घोषणा केली. त्या वेळी विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा-कॉलेजवर बहिष्कार घातला, म्हणून त्यांच्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करण्याची हाक गांधींनी दिली.
वाराणसीमध्ये ‘काशी विद्यापीठा’ची स्थापना झाली. त्याचे मुख्य संस्थापक आणि प्रथम कुलपती डॉ. भगवानदास झाले. लालबहादूर शास्त्री व त्यांच्या बरोबरीच्या इतर तरुणांना डॉ. भगवानदासांनीच मार्गदर्शन केले, की प्रथम या राष्ट्रीय संस्थेमध्ये शिक्षण पूर्ण करा व मग देशकार्यात उतरा. त्यातूनच भारताला अनेक देशप्रेमी मिळाले.
‘काशी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी काशी निवासी श्री. शिवप्रसाद गुप्त यांनी ११ लाख रुपयांचा निधी दान केला होता. त्यात शिकविणारे प्राध्यापक डॉ. संपूर्णानंद, आचार्य नरेंद्रदेव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास आदी थोर विभूती होत्या. डॉ. भगवानदासांचे संयत जीवन, कर्मनिष्ठा व उदारतेचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम झाला. ते मानवतेचे पुजारी होते आणि सर्व धर्माविषयी समान आस्था त्यांच्या मनात होती.
राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असे. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री हे त्यांचेच विद्यार्थी होते. डॉ. भगवानदास नंतर या कॉलेजचे प्राचार्य झाले.
हिंदी साहित्यावर प्रेम आणि त्यांची पुस्तके
हिंदी साहित्याचे त्यांना खूपच प्रेम होते. हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग व नागरी प्रचारिणी सभा यांच्याशी डॉ. भगवानदासांचा फार जवळचा संबंध होता. इ. स. १९२१ मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनाचे ते सभापती होते.
‘एसेन्शियल युनिटी ऑफ ऑल रिलिजन्स’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला ते सर्वाधिक प्राधान्य देत असत. या पुस्तकाचे ‘सर्वधर्मोंकी बुनियादी एकता’ हे हिंदी रूपांतर पंडित सुंदरलाल यांनी केले होते. शिवाय डॉ. भगवानदासांची ‘दर्शन का प्रयोजन’ व ‘पुरुषार्थ’ ही पुस्तके त्या काळात फारच लोकप्रिय होती.
त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक प्रतिष्ठित पदांवर काम केले. बनारस म्युनिसिपल बोर्डाचे चेअरमन असताना प्राथमिक शिक्षणात त्यांनी टकळी, चरखा चालविण्याच्या शिक्षणाला सुरुवात केली. राष्ट्रीयता, देशभक्ती, समाज व संस्कृती यांवर अनेक बालोपयोगी पुस्तके लिहिली.
१९२२ वाराणसी म्युनिसिपालिटीमध्ये अध्यक्ष
डॉ. भगवानदास काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होत असत. इ. स. १९२२ मध्ये वाराणसी म्युनिसिपालिटीमध्ये ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. काँग्रेसद्वारा प्रशासनाचा हा देशातला पहिलाच प्रयोग होता. वाराणसी शहराची सफाई व इतर सुधारणांच्या कार्यात त्यांनी खूपच प्रयत्न केले.
हिंदी साहित्य संमेलनात तर ते प्रथमपासून कार्यरत होते व अध्यक्षही होते. इ. स. १९३५ मध्ये केंद्रीय विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांची निवड झाली होती. म्हणजे ते स्वत:च्या दुनियेत रममाण असलेले तत्त्वज्ञानी नव्हते, तर एक जागरूक, कर्तव्यनिष्ठ भारतवासी होते.
डॉ. भगवान दास राहणीमान
डॉ. भगवानदास दार्शनिक, विद्वान, समाजसेवक व चिंतक होते; तरी जीवनातील लहानसहान, किरकोळ गोष्टींच्या बाबतीत जागरूक होते. ते मितव्ययी स्वभावाचे व साध्यासुध्या राहणीचे होते. त्यांचा वेश पूर्ण भारतीय होता. लांब दाढी व निखळ भारतीय वेशभूषेमुळे ते ऋषितुल्य भासत असत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भव्यता व शालीनता प्रतीत होत असे. त्यांचा सामाजिक, नैतिक व बौद्धिक स्तर कधीच ढळला नाही. नियमित व्यायामामुळे ते कधीच वृद्ध दिसले नाहीत, नव्वद वर्षांच्या वयापर्यंतही ते एखाद्या तरुणाप्रमाणे ताठ चालत असत.
जीवनात ते समाधानी होते. कोणतीच अभिलाषा त्यांच्या मनात नव्हती. म्हणून अतिशय व्यस्त सार्वजनिक जीवनातून त्यांनी अंग काढून घेतले होते. मग एखाद्या वानप्रस्थाप्रमाणे आपले जीवन चिंतन, मनन व अध्ययनात व्यतीत केले.
डॉ. भगवान दास विचार
भारतीय दर्शनशास्त्राचे ते प्रकांड पंडित मानले जात असत. मनुस्मृतीचे ते आचार्य होते. त्यांच्या मते सर्व धर्माची मूलतत्त्वे हा विश्वशांतीचा आधार होता. प्राचीन व अर्वाचीन समन्वय त्यांना हवा होता.
त्यांचे म्हणणे होते की, ‘आपल्या देशात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. या सर्वांत विविधता असूनही सर्व जाती व धर्म एकाच भारतीय रंगात रंगले आहेत. या सगळ्यांची संस्कृती एकच आहे. कारण ते सगळे या देशाच्या मातीमध्ये फळले-फुलले आहेत, ज्या मातीला मानवतेचा सुगंध आहे. इथल्या सर्व धर्मांचा निवास हा मानवतेमध्ये आहे.’
डॉ. भगवान दास 'डॉक्टरेट' पदवी
त्यांचे विचार व साहित्यिक सेवेने भारून जाऊन काशी हिंदू विश्वविद्यालय व अलाहाबाद विश्वविद्यालयाने त्यांना ‘डॉक्टरेट’ची मानद पदवी दिली.
डॉ. भगवान दास भारतरत्न
त्यांची देशभक्ती, विद्वत्ता आणि साहित्य-साधना पाहून भारत सरकारने डॉ. भगवानदासांना इ. स. १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ किताब देऊन गौरविले.
सूर्य अनंतात विलीन झाला
जवळजवळ ९० वर्षांच्या आयुष्यानंतर दि. १८ सप्टेंबर १९५८ रोजी सर्वधर्मसमभाव, मानव एकता, राष्ट्रभक्ती व समन्वय साधनेचा हा सूर्य अनंतात विलीन झाला.
FAQ
डॉ. भगवान दास यांचा जन्म वाराणसीच्या एका वैश्य कुटुंबात १२ जानेवारी १८६९ रोजी झाला.
डॉ. भगवान दास यांचा मृत्यू १८ सप्टेंबर १९५८ रोजी झाला ‘
डॉ. भगवान दास यांचा वडीलाचे नाव माधवदास बनारसचे एक प्रतिष्ठित खानदानी गृहस्थ होते.
त्यांचे म्हणणे होते की, ‘आपल्या देशात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. या सर्वांत विविधता असूनही सर्व जाती व धर्म एकाच भारतीय रंगात रंगले आहेत. या सगळ्यांची संस्कृती एकच आहे. कारण ते सगळे या देशाच्या मातीमध्ये फळले-फुलले आहेत, ज्या मातीला मानवतेचा सुगंध आहे. इथल्या सर्व धर्मांचा निवास हा मानवतेमध्ये आहे.’
काशी हिंदू विश्वविद्यालय व अलाहाबाद विश्वविद्यालयाने त्यांना ‘डॉक्टरेट’ची मानद पदवी दिली..
भारत सरकारने डॉ. भगवानदासांना इ. स. १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ किताब देऊन गौरविले.