सी व्ही रमण यांची माहिती
जन्म व कुटुंब
डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी दक्षिण भारतातील तमिळनाडूमधील त्रिश्नापल्ली नगराच्या जवळील तिरुवणिइक्कवल नामक गावात एका अय्यर परिवारात झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वती अम्मल व वडिलांचे नाव श्री. रामनाथन चंद्रशेखर अय्यर होते. वडील तेथील शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पूर्वजांची शेती-वाडी आणि जमीनदारी तंजौर जिल्ह्यातील अय्यमपेट जवळील एका गावात होती.
Table of Contents
Toggleत्यांचे सर्वच कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत होते. शिक्षणासाठी तळमळणारे होते. हीच तळमळ, साहस आणि निष्ठा रमणना वारसाहक्काने मिळाली होती. त्यांच्या जन्मानंतर तीनच वर्षांनी वडिलांना विशाखापट्टणमच्या मिसेस ए. वी. एनम कॉलेजमध्ये गणित व भौतिकीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाल्याने त्यांचे सर्व कुटुंब विशाखापट्टणमला राहायला आले.
बालपण आणि शिक्षण
विद्यार्थी रमणला बालवयापासून अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचे वरदान होते. म्हणूनच वयाच्या केवळ १२ व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा अतिशय उत्तम गुणांनी तो उत्तीर्ण झाला. त्याच काळात श्रीमती अनी बेझंट अमेरिकेहून भारतात परतल्या होत्या. तेव्हा त्यांच्या धार्मिक भाषणांचा रमणच्या मनावर अतिशय खोल परिणाम झाला आणि त्याने एफ. ए. मध्ये विज्ञान विषयच सोडून दिला.
तेव्हाही तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. नंतर मात्र श्री. रमण यांनी बी. एस्. सी. ला भौतिक विज्ञान व गणित आदी विषय घेतले. मग सर्वांना सांगूनच टाकले की, “विज्ञानाव्यतिरिक्त दुसरा कोणताही विषय घेणार नाही.” विज्ञानाची एवढी आवड होती की बी. एस. सी. च्या संपूर्ण वर्षात जेवढे प्रयोग व प्रात्यक्षिके करायची होती, ती सर्व आणि शिवाय पुढचीसुद्धा काही दिवसांतच पूर्ण केली. ‘मग आता काय करायचं?’ प्रश्न मनात नाचू लागला.
डोक्यात चलबिचल सुरू झाली. शेवटी प्राचार्य नानासाहेब यांच्या लक्षात ही गोष्ट आली. तेव्हा त्यांनी श्री. रमण यांच्यावरील पाठ्यक्रमासंबंधी सर्व बंधने काढून टाकली. शिवाय नवीन प्रयोग-प्रात्यक्षिके करण्याचीही संधी उपलब्ध करून दिली. फलस्वरूप रमण संपूर्ण विश्वविद्यालयात बी. एस. सी. मध्ये सर्वप्रथम आले आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे हे एकमात्र विद्यार्थी होते.
एम. एस. सी. आणि ‘फिलॉसॉफिकल मॅगेझिन’मध्ये लेख

उपमहालेखागार ते महालेखागार
नंतर वित्त विभागाच्या निवड परीक्षेत उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन त्यांना त्यातही प्रथम क्रमांक मिळाला आणि त्यांची वित्त विभागात ‘उपमहालेखागार म्हणून नेमणूक झाली. तेव्हा कलकत्त्याला ते राहू लागले. एकदा कामावरून घरी परतत असताना बाजाराच्या रस्त्यावर ‘विज्ञानाच्या अनुशीलनार्थ भारतीय संस्थान’ अशी एक पाटी लावलेली त्यांनी पाहिली. ताबडतोब ते तिथे पोहोचले.
दरवाजावाजविल्यावर श्री. आशुतोष डे यांनी दार उघडले. आतमध्ये एक मोठी प्रयोगशाळा संशोधनासाठी तयार होती. रमणना परमानंद झाला. त्यांच्या डोळ्यांत पाहून श्री. आशुतोष डेनी त्यांची भेट त्या संस्थेचे मंत्री श्री. अमृतलाल सरकार यांच्याशी घालून दिली. श्री. सरकार तर अशाच विद्यार्थ्याच्या शोधात होते. अपेक्षापूर्तीच्या समाधानाच्या आनंदात त्या प्रयोगशाळेच्या चाव्याच त्यांनी रमण यांच्या हातात सोपविल्या. त्याचा पुरेपूर वापर श्री. रमण यांनी सुरू केला.
सी व्ही रमण पहाटे साडेपाच वाजता प्रयोगशाळेत पोहोचायचे, तेथून पावणेदहा वाजता परतायचे. नंतर नित्यकर्म, जेवणखाण उरकून ऑफिसमध्ये जायचे. तिथले कर्तव्य प्रामाणिकपणे करून तिथून सरळ प्रयोगशाळेत जाऊन ठिय्या मारायचा आणि रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत घरी परतायचे. इतक्या काटेकोर जीवनक्रमामध्ये त्यांनी भरपूर संशोधन केले. ज्यामुळे देशविदेशांत मान्यवरांमध्ये त्यांचे संशाधन पसरले. त्यांची ख्याती सर्वदूर झाली.
साहजिकच आहे की, असा मोठेपणा ज्यांना मिळतो त्यांच्यावर जळणारी स्वार्थी, मत्सरी माणसे आजूबाजूला असतातच. त्यांनी प्रामाणिकपणे आपली ड्यूटी सांभाळून इतर वेळात संशोधनाचे काम केले होते; तरीही विघ्नसंतोषींनी त्यांचे काम असमाधानकारक असल्याच्या तक्रारी केल्याच. त्यामुळे त्यांची बदली रंगूनला केली गेली. तिकडे त्यांना वैज्ञानिक प्रयोग करता येत नव्हते तरीही त्यांनी वैज्ञानिक पुस्तकांचा अभ्यास चालूच ठेवला.
त्यातच वडिलांच्या निधनाची बातमी आली. म्हणून ते रंगूनहून मद्रासला परतले. तिथे प्रेसिडेंसी कॉलेजच्या प्रयोगशाळेत त्यांचे संशोधन चालू राहिले. इकडे त्यांच्या कार्यालयीन कामाची विभागीय चौकशी केली गेली. त्यात निष्पन्न झाले, की यांचे ऑफिसचे काम अत्यंत परिपूर्ण व वेळच्या वेळी केले जाणारे होते. साहजिकच मग सन १९११ मध्ये ‘महालेखागार’ म्हणून नियुक्ती होऊन ते कलकत्त्याला कामावर रुजू झाले.
भौतिकीचे प्रोफेसर
आता इथे पुन्हा भरपूर नवनवीन प्रयोग आणि ग्रंथलेखन होत राहिले. यामुळे अत्यंत प्रभावित होऊन कलकत्ता विश्वविद्यालयाचे उपकुलपती श्री. आशुतोष मुखर्जी यांनी एका नव्या उघडलेल्या सायन्स कॉलेजमध्ये श्री. रमण यांना फिजिक्सचे प्रोफेसर म्हणून आमंत्रित केले; पण ते साशंक होते की, एवढी उच्चपदस्थ सरकारी नोकरी सोडून ते कसे येतील? पण उलट अत्यंत उत्साहाने त्यांनी ही भौतिक विषयाची प्रोफेसरकी स्वीकारली.
कारण तेच तर त्यांचं खरंखुरं पॅशनहोतं! तेव्हा इ. स. १९१७ पासून सी व्ही रमण कलकत्ता विश्वविद्यालयात भौतिकीचे प्रोफेसर म्हणून काम करू लागले. आता सर्व भारतातले विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षिले गेले. श्री. रमण यांची आपल्या कामाप्रती असलेली तळमळ, निष्ठा आणि त्यांची असलेली प्रतिभा पाहून त्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर्चीचाल्ड म्हणून गेले की, “विश्वविद्यालयाची शोभा ही उत्तुंग आणि आलिशान इमारती नसून, तेथील गुरू-शिष्य परंपरा आहे.”
संशोधन आणि नोबेल पुरस्कार
इ. स. १९२१ मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रमंडळ विश्वविद्यालयाच्या एका सभेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रो. रमण यांना इंग्लंडला पाठविले गेले. तिथे त्यांनी आपले संशोधनपर विचार मांडून जगभराच्या वैज्ञानिकांवर चांगलाच ठसा उमटविला. या भारत-युरोप समुद्री प्रवासादरम्यान जहाज भूमध्य सागरावरून जात असताना डेकवर उभे राहून त्यांनी अथांग जलराशीला नीलमण्याच्या कांतीसमान नजरेत साठविले.
मूलभूत प्रश्न मनात निर्माण झाला, ‘पाण्याचा रंग निळा का?‘ झाले…! सात वर्षे याच विषयावर संशोधन होत राहिले. जेव्हा इ. स. १९२८ मध्ये त्यांनी आपले हे संशोधन जगासमोर प्रकाशित केले, तेव्हा संपूर्ण विज्ञान जगतात एकच खळबळ उडाली आणि कित्येक अज्ञात प्रश्नांची उत्तरे मिळाली.
इंद्रधनुष्याचे रंग हा प्रकाशकिरणांचा एक महान चमत्कार आहे. डॉ.सी व्ही रमण यांच्या संशोधनाचा मुख्य विषय ‘प्रकाश’ हाच होता.
प्रकाशकिरणांचे पसरणे,तरल, पारदर्शक व स्फटिकासारख्या पदार्थांमधून आरपार जाणे, नाना रंग दाखवणे वा एकाच रंगात सम्मिलित होणे, त्यातून मूळ रंगाचे ज्ञान होणे म्हणजेच प्रकाशकिरणांच्या गुणधर्माचे संशोधन व विवेचन हाच त्यांचा मुख्य विषय होता. यातूनच अणू सिद्धान्त अधिक सुलभ झाला आणि अणूंची गणना करणे शक्य झाले. हेच संशोधन ‘रमण इफेक्ट’ या नावाने मान्यता पावले आहे. यालाच भौतिक विज्ञानातील ‘नोबेल पुरस्कार’ इ. स. १९३० मध्ये मिळाला.
आशिया खंडात भौतिक विज्ञानात मिळालेला हा पहिला पुरस्कार होता. याचबरोबर प्रो. रमणनी ध्वनिविज्ञानाशी संबंधितही अनेक सिद्धान्त प्रतिपादित केले आहेत.
C V Raman Information In Marathi
'लेनिन पुरस्कार' व इतर संशोधन
सी व्ही रमण यांच्या संशोधनाने विश्वकल्याणात भरच पडली आहे. याची जाण ठेवून रशियन सरकारने इ. स. १९५७ मध्ये त्यांना ‘लेनिन पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच इतर देशांनीही डॉ. रमण यांचा आपापल्या पुरस्काराने सन्मान करून त्यांच्या वैश्विक कार्याची योग्य अशी दखल घेतली.
मृत्यूपूर्वी काहीच वर्षे आधी त्यांनी डोळ्यांमधील ‘रेटिना’ संबंधी विशेष संशोधन केले; जे भौतिक विज्ञान, शरीर विज्ञान आणि मानवी मेंदू या तीन संपूर्ण वेगळ्या विषयांना एकाच वेळी स्पर्श करत होते. याद्वारे त्यांनी सांगितले की, डोळा व कॅमेरा यांची तुलना संभ्रम निर्माण करणारी आहे. मनुष्य स्वतः त्याच्या डोळ्याच्या रेटिनाचे चित्र पाहू शकतो आणि स्वतःचा डोळा कसा काम करतो हेही बघू शकतो.
सी व्ही रमण बालवयात वाद्यांची आवड होती. त्यातही त्यांनी संशोधन केले होते. शिवाय फुलांवर प्रेम करणारा हा शास्त्रज्ञ त्यांच्या रंगांविषयीही तितकाच संशोधक होता.
सी व्ही रमण यांनी ‘रमण संशोधन संस्थे’ची स्थापना
इ. स. १९३३ मध्ये बंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर ते बंगलोरचेच झाले. तिथेच त्यांनी ‘रमण संशोधन संस्थे’ची स्थापना केली. तिचे ते संस्थापक-संचालक होते.
C V Raman Information In Marathi
सी व्ही रमण भारतरत्न
शेवटपर्य सी व्ही रमण हे कर्मरत, कृतिशील व संयमी जीवन जगत होते.
सन १९५४ मध्ये भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला.
सी व्ही रमण स्वर्गवासी
असे जीवनसाफल्याचे समाधान सोबत घेऊन हा भारताचा महान वैज्ञानिक नरोत्तम दि. २१ नोव्हेंबर १९७० रोजी स्वर्गवासी झाला.