चक्रवर्ती राजगोपालाचारी जिवंन परिचय C Rajagopalachari

चक्रवर्ती राजगोपालाचारी

चक्रवर्ती राजगोपालाचारी शिक्षण

          चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्म दि. १० डिसेंबर १८७८ रोजी तमिळनाडू प्रांतातल्या सेलम जिल्ह्यातील होसूर उपनगरापासून ७-८ कि.मी दूर असलेल्या तोरापल्ली नावाच्या एका लहानशा गावात, एका वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्री. नल्लन चक्रवर्ती होसूर येथे मुन्सफाचे काम करत असत. राजाजींचे प्राथमिक शिक्षण होसूरमध्ये झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली.

            बेंगलुरुच्या सेंट्रल हिंदू कॉलेजमधून इंटरमिजिएट होऊन मद्रासच्या प्रेसिडेंसी कॉलेजमधून बी. ए. व एल. एल. बी. केले आणि सेलम जिल्हा कोर्टात वकिलीची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. व्यवसायातील पदार्पणातच त्यांनी पहिला नियम मोडला, तो म्हणजे सीनिअर वकिलांच्या हाताखाली प्रॅक्टिस सुरू न करता सरळ स्वतःचे काम सुरू केले.

chakravarti-rajagopalachari

चक्रवर्ती राजगोपालाचारी समाजसेवा

        चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी  समाजात पूर्वापार चालत आलेले धार्मिक अवडंबर, स्पृश्यास्पृश्यता, शिवाशीव, पाखंडीपणा या विरोधात ते कंबर कसून उभे राहिले. कारण त्यांच्या बालवयापासून ते हे सगळं बघत होते. ते त्यांना असह्य झाले होते.

            समाजातील वरिष्ठ जातिवर्ण यामुळे चकित झाला. दुखावला. त्यांना समजावले गेले की, त्यांनी हे सगळे सोडून द्यावे; पण त्यांनी कोणाचेच काहीही ऐकले नाही. यामुळे चिडून जाऊन त्यांनाच जातिबहिष्कृत केले गेले. इतके की, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर दहन संस्कारालाही कोणी आले नाही. तरीही ते आपल्या निर्णयावर निश्चल राहिले.

             त्यांच्या समाजसेवेमुळे ते सेलम नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. दोन वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अस्पृश्यांसाठी त्यांनी खूप मोलाची कामे केली. ‘त्यांना मनाई असलेल्या रस्त्यांवरून चालण्याची अनुमती, नगरपालिकेच्या नळाचे पाणी मिळणे, देवळांच्या आजूबाजूला हिंडणे-फिरणे- बसणे’ अशा सगळ्या गोष्टींना कायदेशीर मान्यता मिळवून दिली. साहजिकच या क्रांतिकारी बदलांमुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल स्थान निर्माण झाले.

चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि महात्मा गांधी

             ‘हिंदू’ पत्राचे संपादक स्व. कस्तुरीरंगम आयंगर यांच्या आग्रहावरून ते मद्रासला आले आणि तेथे हायकोर्टात त्यांनी वकिली सुरू केली. इ. स. १९१९ मध्ये त्यांनी गांधीजींना मद्रासला भेटीसाठी बोलावून घेतले होते. त्या वेळी ते राजाजींच्या घरीच राहिले होते. त्या दोघांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते.

              इ. स. १९२० मध्ये नागपूर अधिवेशनातील असहयोगाच्या प्रस्तावानुसार देशबंधू चित्तरंजनदास, पं. मोतीलाल नेहरू आदी वकिलांबरोबरच राजाजींनीही आपली वकिली सोडून ते स्वातंत्र्याच्या लढाईत उतरले. १९२१ मध्ये राजाजी काँग्रेसचे महामंत्री बनले. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी म. गांधींनी साबरमती आश्रमात २० दिवसांनी दांडी यात्रा केली; त्याच वेळी इकडे तिरुचिरापल्लीहून १५ दिवस पायी चालून राजाजींनी वेदारण्यम्च्या सागरकिनारी मिठाचा कायदा तोडून अटक करवून घेतली.

                 दक्षिणेकडील अहिंदी भाषी प्रदेशात हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘दक्षिण भारत हिंदी प्रचार सभे’ची स्थापना केली. तिचे कार्यालय त्यांनी स्वतःच्या घरातच उघडले.

चक्रवर्ती-राजगोपालाचारी

राजकीय

गव्हर्नर जनरल

                इ. स. १९४६ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली बनविल्या गेलेल्या अंतरिम सरकारात राजाजींना उद्योग आणि वाणिज्य मंत्री बनविले गेले. त्यानंतर शिक्षण आणि अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे सोपविले. भारताचे मावळते गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटननी त्यांची स्तुती केली; जेव्हा त्यांच्या नंतर भारताचे गव्हर्नर जनरल पद राजाजींना दिले. त्यांनी सांगितले की,

 “माझे उत्तराधिकारी नवे गव्हर्नर जनरल हे महान राजनीतिज्ञ आणि आकर्षक, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे आहेत.” 

              राजाजींना त्या काळातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे म्हणजेच गांधीवादी राजनीतिक क्षेत्राचे चाणक्य मानले जात होते.

              दोन वर्षांनी त्यांनी भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचा राजीनामा दिला होता तरीही त्यांची, त्यांच्या कार्याची,नवभारतासाठी असलेली आवश्यकता जाणून सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर पं. नेहरूंनी त्यांना डिसेंबर १९५० मध्ये भारताचे गृह मंत्रालय दिले.

तामिळनाडू मुख्यमंत्री ​

               राजाजी कट्टर गांधीवादी, काँग्रेसी होते; मात्र त्यांचे कार्य नेहमीच त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र आणि तर्कसंगत विचारधारेनुसार असायचे. म्हणूनच त्यांनी कोणत्याही मोठ्यात मोठ्या माणसाशीसुद्धा कधीही समझोता केला नाही. हातमिळवणी केली नाही.

              याच त्यांच्या हट्टी स्वभावामुळे पं. नेहरूंशी त्यांचा मतभेद झाला आणि त्यांनी सन १९५१ मध्ये गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला; पण त्यानंतर तमिळनाडू प्रांताचे ते मुख्यमंत्री झाले, कारण तेथील परिस्थिती फारच अशांत व अस्थिर होती. या काळात त्यांनी तेथे अनेक अत्यावश्यक महत्त्वाची कामे केली.

            सर्व शाळांमध्ये हिंदी विषय सक्तीचा केला; मात्र जेव्हा एकूण समाजस्थितीत सुधारणा होत गेली आणि जनतेने विरोध करायला सुरुवात केली, तेव्हा स्वतःहून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजाजींनी राजीनामा दिला.

स्वातंत्र्यासंबंधी

chakravarti-rajagopalachari-image

           चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांनी  निषेध, काळे झेंडे यांची कधीच पर्वा केली नाही; जे त्यांच्या जीवनात अनेक वेळा घडले होते. कारण भावनांपेक्षा स्वतः घेतलेल्या तत्त्वनिष्ठ तार्किक निर्णयावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच काँग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात ते पाच वेळा तुरुंगात गेले; पण जेव्हा त्यांना कळले की, काँग्रेस योग्य प्रकारे काम करत नाही, तेव्हा काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून ते पूर्णतयः विभक्त झाले; पण नंतर इ. स. १९४५ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल होऊन स्वातंत्र्यासंबंधी चर्चेत अत्यंत व्यासंगपूर्ण सहभाग घेतला.

              दि. १८ मार्च १९१९ ला देशात रौलेट अक्टचे दमन चक्र फिरू लागले. तेव्हा संपूर्ण देशात गांधीजींच्या हाकेनुसार हरताळ सुरू झाला. राजाजीही सत्याग्रहात सामील झाले. त्यांना अटक झाली. याप्रमाणे राजाजींच्या राजनीतिक जीवनाची वादळी सुरुवात झाली. त्यांनी स्वतःला त्यात झोकून दिले.

            गांधीजींच्या तुरुंगवारीच्या वेळी ‘यंग इंडिया‘ नामक पत्राचे प्रकाशन राजाजीच करत होते. गांधी-आंबेडकर वादामध्ये राजाजींनीच समझोता घडवून आणला.

आंतरजातीय विवाहाला

            गांधीजींचा मुलगा ‘देवदास‘ व राजाजींची मुलगी ‘लक्ष्मी‘ १९२७ मध्ये विवाह करू इच्छित होते; पण राजाजी ब्राह्मण व गांधीजी वैश्य होते. त्या काळात या आंतरजातीय विवाहाला हिंदू समाजाची मान्यता नव्हती.

               मग दोघांच्या वडिलांनी मुलांना अट घातली, की ‘पुढील पाच वर्षं दोघांनीही कुठलेही संबंधन ठेवता अलग राहावे, त्यानंतर जर दोघांनाही लग्न करायचे असेल तर करू शकतात. याप्रमाणे दोन्ही मुलांनी केल्यानंतर इ. स. १९३३ मध्ये अत्यंत थाटामाटाने दोघांचे लग्न झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी


                दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही काँग्रेस, ब्रिटिश सरकार आणि राजाजी यांच्यात तणातणी झाली. वादविवाद, प्रतिवाद झाले.

                 गांधीजी राजाजींमध्ये मतभेद झाले. अनेक काँग्रेसी नेतेही त्यांच्याशी असहमत होते. तरी राजाजींनी स्वतःचे मत बदलले नाही. कारण त्यांचा स्वतःच्या बुद्धीवर व निर्णयावर पूर्ण विश्वास होता. 

लेखक आणिप्रभावी वक्ता

                 राजाजी केवळ कुशल राजनीतिज्ञच नव्हते, तर सिद्धहस्त लेखक आणि प्रभावी वक्ताही होते. त्यांच्या वाणीप्रमाणेच त्यांची लेखणीही धारदार होती. तमिळ आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर त्यांचे सारखेच प्रभुत्व होते. रामायण आणि महाभारतावर त्यांनी लिहिलेली पुस्तके खूपच लोकप्रिय झाली होती. ‘स्वराज्य‘ त्यांचे आवडते साप्ताहिक पत्र होते.

               जनतेला दर आठवड्याला या साप्ताहिकामधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरची राजाजींची मते, त्यांचे विचार स्पष्ट शब्दांत आणि मर्मग्राही भाषेत वाचायला मिळत असत.

राहणीमान

            ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून नेहमीच प्रतीत होत असे. धोतर, सदरा, हातात घड्याळ, पायात चपला, डोळ्यांवर काळा चष्मा हाच त्यांचा कायमचा पोशाख होता.

           गव्हर्नर जनरल पदावर असताना व्हॉइसराय भवनामध्येसुद्धा ते याच पोशाखात असत. धूम्रपान व मद्यपानाचे ते कट्टर विरोधी होते. जात-पात, शिवाशीव ते कधीच मानत नसत. गांधीजींचे तर ते परमभक्त होते

भारतरत्न

अशा या विलक्षण प्रतिभेच्या दूरदर्शी राजनीतिज्ञाला भारत सरकारने इ. स. १९५४ मध्ये ‘भारतरत्न’ किताब देऊन गौरविले.

दि. २५ डिसेंबर १९७२ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी या महान सुधारणावादी देशभक्ताचा मृत्यू झाला.

FAQ

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्म कधी झाला ?

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्म दि. १० डिसेंबर १८७८ रोजी तमिळनाडू प्रांतातल्या सेलम जिल्ह्यात झाला.

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा मृत्यू कधी झाला ?

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा मृत्यू दि. २५ डिसेंबर १९७२ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी मृत्यू झाला.

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना भारतरत्न कधी मिळाला ?

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना भारतरत्न इ. स. १९५४ मिळाला.

भारतरत्न पुरस्कारप्राप्त सर्व व्यक्तींचे जीवनचरित्र संक्षिप्त स्वरुपात या ब्लॉग मधून  मांडले आहे, जेणेकरून या व्यक्तींनी केलेल्या महान कार्याची लोकांना ओळख होईल आणि उल्लेखनीय कार्य करण्याची प्रेरणादेखील मिळेल

1 thought on “चक्रवर्ती राजगोपालाचारी जिवंन परिचय C Rajagopalachari”

Leave a Comment