माझा आवडता शिक्षक निबंध maza avadta shikshak nibandh

माझा आवडता शिक्षक निबंध

              प्राथमिक शाळेतून मी माध्यमिक शाळेत आलो तेव्हा थोडा धास्तावलेलाच होती. पण पहिल्याच दिवशी माझी भीती पळून गेली, त्याचे श्रेय जाते ते सावंत सरांकडे, सरांनी आपल्या मधुर वाणीने आम्हांला जिंकले होते. त्यामुळेच शाळा आम्हांला फार प्रिय झाली. सावंत सर आम्हांला मराठी शिकवतात ते आमचे वर्गशिक्षकही आहेत. सरांमुळे मला हा विषय फार प्रिय झाला.

            आजही सर वर्गात शिकवतात, तेव्हा सारा वर्ग त्यांच्या शिकवण्यात रंगून जातो. त्यावेळी शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भोवतालच्या साऱ्या गोष्टींचा विसर पडलेला असतो. कितीही अवघड कविता असली तरी सर ती अगदी सुलभ करून, रंगवून सांगतात. मराती साहित्याचा सरांचा अभ्यास खूप चांगला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांची किती तयारी आहे, याचीही त्यांना योग्य कल्पना आहे.

                  मला आठवतंय, आम्ही पाचवीत असताना सरांनी आम्हांला ‘आई’ ही कविता शिकवली होती. त्यावेळी आम्ही सर्वजण एकदम भारावून गेलो होतो. एक शब्दही कोणी उच्चारला नाही. शब्दांचे सामर्थ्य एवढे असते, हे मला त्या दिवशी प्रथम जाणवले. नंतर मराठीच्या प्रत्येक तासाला आम्हांला काही ना काही नवीन ज्ञान मिळत असे.आठवड्याच्या तासातील एक तास ते अवांतर वाचनासाठी ठेवत, त्या तासाचा उपयोग करून सरांनी आम्हांला अनेक चांगली पुस्तके वाचून दाखवली. सरांनी केलेले पुस्तकांचे वाचन एवढे भावस्पर्शी होते की, सारा वर्ग त्यात गुंगून जायचा. या सामुदायिक वाचनामुळे आम्हांला वाचनाचा छंद लागला.

            सरांचे हस्ताक्षर उत्तम आहे. त्यांनी फळ्यावर लिहिलेला मजकूर पुसूच नये असे वाटते. आमचे हस्ताक्षरही वळणदार व्हावे म्हणून ते कसून प्रयत्न करतात, प्रसंगी कठोरही होतात. सरांची साधी राहणी, प्रेमळ वृत्ती आणि स्वीकारलेले काम चोख करण्याचा स्वभाव या गोष्टींनी मला अतिशय आकर्षित केले आहे. त्यामुळे सर आणि मराठी विषय हे दोन्हीही माझे विशेष लाडके झाले आहेत.

माझे-आवडते-शिक्षक

माझा आवडता शिक्षक

Leave a Comment