भगवद गीता अध्याय 7 श्लोक 1,2

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
Table of Contents
Toggleभगवान श्रीकृष्ण म्हणाले, हें पार्था! अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन तू ज्यायोगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त, सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निःसंशयपणे जाणशील, ऐक, मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही.
या अध्यायात भगवंत अर्जुनाला ज्ञान-विज्ञान म्हणजे काय, याचा उलगडा करणार आहेत; पण तत्पूर्वी तू माझ्या ठिकाणी अनन्य भावाने मन एकाग्र कर. तू योगी हो. तू माझे स्मरण कर. सर्व शक्तिमान, सर्व विभूतींनी युक्त, ऐश्वर्यसंपन्न अशा मला जाणण्याचा प्रयत्न कर, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. ज्ञान-विज्ञान हे ज्ञान असे आहे की, जे प्राप्त झाल्यावर जगात दुसरे असे महत्त्वाचे ज्ञान शिकायचे राहतच नाही.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 3

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मत्परायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो.
भगवंतांनी मनुष्यदेह निर्माण केला तो ईश्वरचिंतन व्हावे म्हणून, या सृष्टीचा भोक्ता होताना थोडे तरी या सृष्टीकर्त्या भगवंताचे स्मरण व्हावे म्हणून; पण भगवंताची आठवण किती लोक ठेवतात? हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादाच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या हजारो योग्यांमध्ये एखादाच मोक्षप्राप्ती करून घेतो.
एखादाच सच्चिदानंद स्वरूपाची ओळख करून घेतो. एखादाच भगवत्परायण होतो. याचाच अर्थ असा की, लक्षावधी मनुष्यांमधून एखादाच भगवंताला येऊन मिळतो. त्या परमभक्ताची भगवंत शतकानुशतके वाट पाहत असतो. केवळ अज्ञानामुळे लोक भगवंताला ओळखत नाहीत. मनाची ओढ इंद्रियांच्या विषयसुखाकडे अधिक असते. विषयभोगाचा रेटा एवढा प्रचंड असतो की, क्षणैक विषयसुखाकडे माणूस ओढला जातो व त्यातच गुरफुटून अनंत दुःख यातना भोगत बसतो.
पशू आणि मनुष्य यात काही फरकच राहत नाही. एखादा सज्जन जन्माला येतो. तो योगसाधना करू लागतो. काही योगी योगभ्रष्ट होतात. योगमार्ग सोडून देतात. काही योगभ्रष्ट पुन्हा योगसाधना करू लागतात. अशा अनेक योग्यांमधून एखादाच योगसिद्धी प्राप्त करतो आणि मोक्ष मिळवितो.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 4,5

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे अर्जुना ! हिच्याहून दुसरी, जिच्यायोगे सर्व जग धारण केले जाते, ती माझी जीवरूप परा म्हणजे चेतन प्रकृती समज.
भगवंतांनी आता विज्ञान म्हणजे काय हे सांगायला सुरुवात केली आहे. भगवंत म्हणतात की, प्रकृती म्हणजे शक्ती. ही प्रकृती अचेतन किंवा अपरा व चेतन किंवा परा, या दोन प्रकारांत विभागली जाते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पाच जड स्थूल भूतांपासून व मन, बुद्धी आणि अहंकार या तीन सूक्ष्म अशा एकूण आठ तत्त्वांपासून ही अष्टधा प्रकृती तयार झाली आहे. तिला अचेतन किंवा अपरा प्रकृती असे म्हणतात.
दुसरी जी प्रकृती आहे तिने सर्व जग धारण केले आहे. ती जीवरूप म्हणजे परा प्रकृती होय. सर्व सजीवांची उत्पत्तीपरा आणि अपरा या दोन प्रकृतींपासून होते. म्हणून मनुष्यदेहाला अष्टधा प्रकृती, असे म्हणतात. अहंकार म्हणजे मी व माझे ही भावना असणे होय. मन, बुद्धी व अहंकार या सूक्ष्म तत्त्वांमुळे सजीव मायेच्या आवरणात गुंततो व ईशतत्त्व त्याला दिसत नाही.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 6,7

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
सर्व सजीवमात्र या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे. अर्थात, सर्व जगाचे मूळ कारण आहे, हे तू जाण. हे धनंजया! माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्यात मणी ओवावेत, तसे माझ्यात गुंफलेले आहे.
भगवंत म्हणतात की, जगाची उत्पत्ती परा आणि अपरा या दोन प्रकृतींपासून झाली आहे. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे. जिथे उत्पत्ती आहे, तिथे प्रलय आहे. म्हणून या उत्पत्ती व प्रलय यांचा नियंता मीच आहे. उत्पत्ती, स्थिती व प्रलय या तीन अवस्था म्हणूनच या जगातला प्राप्त होतात. दोऱ्यात मणी गुंफल्यानंतर जसे मणी दोऱ्यापासून अलग होत नाहीत, त्याप्रमाणे निर्माण झाल्यानंतर हे जग माझ्यापासून अलग होत नाही.
मीच निर्माणकर्ता आहे, मीच पालनकर्ता आहे व मीच संहारकर्ता आहे, हे तू विसरू नकोस. सर्व जग माझ्यात गुंफलेले आहे. या जगाचे उत्पत्ती व प्रलय हे मूळ कारण मीच आहे. त्यामुळे जे मला योगसाधनेने भजतात त्यांचा उद्धार मीच करतो, कारण ते माझाच अंश आहेत. हे अर्जुना, तू योगी व्हावेस, असे मला वाटते.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 8,9

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
हे अर्जुना! मी पाण्यातील रस आहे, चंद्र-सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे. तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यांतील तप मी आहे.
वरील श्लोकात भगवंत परा व अपरा शक्तींनी कसे सर्व व्यापक आहेत, हे सांगत आहेत. चंद्र व सूर्य हे आपणास प्रकाश पुरवितात. त्यांचे जे तेज, जो प्रकाश तो म्हणजे भगवंत आहे. द्रव, घन आणि वायू या तीन अवस्थांमध्ये पाणी असते. रस हा पाण्याचा मुख्य गुणधर्म आहे. सजीवांची तहान भागविणे व त्यांचे पोषण करणे, त्यांना स्वच्छ ठेवणे हे पाण्याचे प्रमुख कार्य आहे. म्हणून पाण्याचा रस म्हणजे भगवंत आहेत.
वेदांतील प्रमुख शब्दब्रह्म जो ओंकार तो म्हणजे भगवंत आहेत. आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व, पृथ्वीतील पवित्र गंध, अग्नीतील तेज, सजीवांचे जीवन, तपस्व्यांतील तप म्हणजे भगवंत आहेत. या जगातील जे जे उत्तम, उदात्त व उन्नत आहे ते सर्व म्हणजे भगवंतच आहे यात शंका नाही. अशारीतीने भगवंत सर्वव्यापक आहे. शब्द, रस, स्पर्श, गंध, तेज, प्रकाश, शक्ती, या तत्त्वांचा उल्लेख येथे आला आहे.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 10,11

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
हे पार्था! तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा ! मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवांतील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे.
भगवंत म्हणतात की, हे अर्जुना ! मी परा आणि अपरा या दोन प्रकृर्तीने सर्व विश्व निर्माण केले आहे. पाच महाभूते (पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी, आकाश) व मन, बुद्धी, अहंकार अशा आठ तत्त्वांनी हे जग मी निर्माण केले आहे. म्हणून मी सर्वव्यापक आहे. सर्व सजीव मीच निर्माण केले आहेत. बुद्धिवंतांची बुद्धी, तेजस्वी जनांचे तेज, बलवानांचे बल (आसक्तिरहित व कामनारहित सामर्थ्य), तसेचसर्व सजीवांतील काम (धर्माला अनुकूल व शास्त्राला अनुकूल) ते सर्व मीच आहे.
या जगात सजीवांच्या एकूण चौऱ्याऐंशी लक्ष प्रजाती आहेत. त्यात काही जलचर, भूचर, उभयचर तर काही खेचर आहेत. (अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज) त्या सर्व मी निर्माण केल्या आहेत. सर्वांचे बीज मीच आहे हे ध्यानात ठेव. जो माझे स्मरण करतो, जो मला प्राप्त करतो, तो मात्र या जन्म-मरणाच्या फेऱ्यातूनमुक्त होतो. दुःखमुक्त होतो.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 12,13

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
आणखीही जे सत्त्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत, असे तू समज; परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्त्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या भावांनी हे सारे जग- सजीव समुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाहीत.
प्रकृतीपासून सत्त्व, रज व तम हे त्रिगुण निर्माण झाले आहेत; पण भगवंताने जरी हे तीन गुण निर्माण केले असले तरी भगवंत त्यात नसतो आणि भगवंतातही ते नसतात. या तीन गुणांच्याही पलीकडे भगवंत असतो. तो निर्गुण व निराकार आहे. मायेच्या या त्रिगुणात सर्व जीव अडकतात. सत्त्वगुणी ते ब्राह्मण, रजोगुणी ते क्षत्रिय, रजोगुणी व तमोगुणी ते वैश्य आणि तमोगुणी ते शूद्र होत. या चारही प्रकारांच्या खालच्या योनीत पशू असतात. सात्त्विक, राजस, तामस या भावांनी जग मोहित झाले आहे.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 14,15

कारण, ही अलौकिक अर्थात अतिअद्भूत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे; परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात, ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसारातून तरून जातात. मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे, असे आसुरी स्वभावाचे, पुरुषांमध्ये नीच असणारे, दुष्ट कर्मे करणारे मूढ लोक मला भजत नाहीत.
मनुष्य आणि भगवंत यामध्ये त्रिगुणात्मक मायेचा समुद्र आहे. मनुष्याला भगवंताची भेट घ्यायची असेल तर मायेचा समुद्र पार करून गेले पाहिजे. जे भगवंताला नित्य भजतात, ते प्रयत्न व चिकाटीने माया पार करून भगवंताला प्राप्त होतात; पण जे दुष्ट कर्म करणारे, आसुरी स्वभावाचे, अज्ञानी नीच प्रकारचे लोक भगवंताचे स्मरण करीत नाहीत, भगवंताला भजत नाहीत असे सर्व लोक या जन्म-मृत्युच्या फेऱ्यात अडकतात. जन्मोजन्मी दुःख भोगतात व या त्रिगुणांच्या भोवऱ्यात फिरत राहतात. जे भगवंताला स्मरतात, ते लोक सच्चिदानंद परमात्म्याला प्राप्त करून घेतात, मोक्ष प्राप्त करतात व जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 16,17

हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना ! उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात. त्यांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेम-भक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय; कारण मला तत्त्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे.
कुकर्मी लोकांचे चार प्रकार आहेत १) मूढ किंवा अतिशय मूर्ख, २) नराधम किंवा नीच, ३) दुष्कृती किंवा भ्रांत झालेले तर्कवादी, ४) नास्तिक किंवा अनीश्वरवादी. असे लोक समाजाला घातक असतात; पण समाजात उत्तम कर्म करणारे चार प्रकारचे भक्त असतात. १) अर्थार्थी, २) आर्त, ३) जिज्ञासू, ४) ज्ञानी. जे नेहमी सकाम कर्म करतात व फलाशेने ईश्वराची भक्ती करतात, त्यांना अर्थार्थी भक्त म्हणतात.
संसारात येणारे दुःख, यातना, संकट दूर व्हावे म्हणून भगवंताची भक्ती करतात, त्यांना आर्त भक्त म्हणतात. जे साधू, संत यांच्या संगतीत येऊन ईश्वराची भक्ती करतात त्यांना जिज्ञासू भक्त म्हणतात. जे खरोखर ज्ञानी आहेत व निष्काम कर्म करतात, मनोभावे ईशभक्ती करतात, त्यांना ज्ञानी भक्त म्हणतात.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 18, 19

हे सर्वच उदार आहेत; परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे, असे माझे मत आहे. कारण, तो माझ्या ठिकाणी मन-बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्त्वज्ञानी झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.
जो कोणी भगवंताला कोणत्याही कारणाने शरण येतो तो महात्मा असतो. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू व ज्ञानी हे सर्व भक्त भगवंताच्या हृदयात वास करतात. कारण भक्तीमुळे त्यांचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतात. पहिले तीन प्रकारचे भक्त स्वार्थ व परमार्थ दोन्ही करतात; पण ज्ञानी भक्त फक्त भगवंत हवा म्हणून भक्ती करतो. त्याच्या वासना मेलेल्या असतात. असा भक्त भगवंताला खूप आवडतो. तो शरणागत होऊन सर्व कर्तेपण भगवंताला देतो. निष्काम भावनेने कर्म करतो. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करतो. तो सर्व जगाचे कल्याण चिंततो. तो सतत भगवंताचे ध्यान करतो. असा दुर्मिळ प्रेमळ भक्त सर्व लोकांचा लाडका असतो म्हणून तो
भगवंताला आवडतो.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 20,21

त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे, असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन, निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतास्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो, त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो.
संसार करताना मनुष्याला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. दारिद्र्य, व्याधी, दुःख, वार्धक्य, पारतंत्र्य, अपंगत्व इ. अनेक प्रकारच्या यातना मनुष्याला भोगाव्या लागतात. अशावेळी नेमके काय करावे हे त्याला सुचत नाही. मग तो देव-देवतांची पूजा करू लागतो. कोणी सूर्योपासना करतो, कोणी शिव, तर कोणी सरस्वती यांची पूजा करतो.
सर्वांभूती भगवंत असल्यामुळे अशा भक्तांच्या मनोकामना त्यांच्या भक्तीनुसार भगवंत त्या देव-देवतांच्या करवी पुरवतो. त्यामुळे त्यांची ईश्वरभक्ती वाढण्यास मदत होते. त्यांची ईश्वरावरील श्रद्धा वाढीस लागते. ते सश्रद्ध होतात. ते जरी सकाम भक्ती करीत असले तरी कालांतराने त्यांना ज्ञानप्राप्ती होऊन ते खऱ्या भगवंताची पूजा करू लागतात. जो निर्गुण, निराकार परमात्मा आहे त्याला ओळखतात व त्याची भक्ती करतात.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 22,23

तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो; पण त्या अल्पबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजोत, अंती मलाच येऊन मिळतात.
भगवंताच्या अनुज्ञेवाचून देव-देवता वर किंवा शाप देऊ शकत नाहीत; कारण देव-देवता भगवंताच्या आधीन असतात. अंतिम सर्व सत्ता भगवंताचीच असते. त्यामुळे भक्तीनुसार भगवंतांनी ठरविलेले फळ देव-देवतांमार्फत भगवंतच भक्तांना देतो;
पण मायेमुळे हे त्यांना कळत नाही. ते फळदेखील नाशवंत असते. क्षणैक असते; ते भक्तही त्या देवतांना प्राप्त होतात; पण भगवंताचे जे खरे भक्त आहेत, जे ज्ञानी आहेत, निष्काम कर्मयोगी आहेत, सदाचारी आहेत, निरिच्छ आहेत ते मात्र अंती भगवंतालाच येऊन मिळतात. त्या भक्तांवर भगवंताचे मनापासून प्रेम असते. त्यांना भगवंत मुक्ती देतो, मोक्ष देतो. भगवंताच्या रूपात भगवंत त्यांना सामावून घेतो.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 24,25

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन- इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या, सच्चिदानंदघन परमात्मस्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात. आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात, मी जन्मणारा मरणारा आहे, असे समजतात.
भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की, बाबा रे! मूढ लोक, अभक्त लोक मला मनुष्याप्रमाणे जन्म घेणारा व मृत होणारा मानतात. मला खरेखुरे जाणत नाहीत. मी सच्चिदानंद परमात्मा आहे, अविनाशी, निर्गुण, निराकार आहे, परमेश्वर आहे, हे ते मान्य करीत नाहीत. मी जन्मणारा मरणारा आहे, असेच ते समजतात. अज्ञानामुळे त्रिगुणात्मक मायेच्या समुद्रात दुःख भोगत असल्यामुळे व विषय भोगत असल्यामुळे त्यांना मी दिसत नाही. जे खरोखर माझी भक्ती करतात, मला जाणतात, त्यांना मात्र मी दर्शन देतो, मोक्ष देतो, मुक्ती देतो; कारण मी भावाचा भुकेला आहे.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 26,27

हे अर्जुना ! पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमानकाळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो; पण श्रद्धा, भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. हे भरतवंशी अर्जुना ! सृष्टीत इच्छा व द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुख-दुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात.
मनुष्याला पूर्वजन्माचे स्मरण नसते. पुढील जन्माची कल्पना नसते. इच्छा व द्वेष यामुळे सुख-दुःख, राग लोभ, माझे तुझे या द्वंद्वात तो सापडतो. माझे घर, माझी पत्नी, माझी मुले या मोहात तो अडकतो. मायेच्या वर्चस्वाखाली वावरतो. त्याच्याकडे भगवंताविषयी श्रद्धा नसते, भक्ती नसते. असते ते फक्त अज्ञान. त्यामुळे तो भगवंताला जाणू शकत नाही.
भगवंत मात्र सर्व प्राणीमात्रांचे सर्व जन्म जाणू शकतो. लाखो वर्षांपूर्वी भगवंतांनी सूर्याला केलेला उपदेश आठवतो. सूर्याने मनूला केलेला उपदेश आठवतो. सर्व युगांतील सर्व सजीवांचे सर्व जन्म भगवंताला आठवतात. ढगांच्या आवरणामुळे आपणाला चंद्र, सूर्य, तारे काहीच दिसत नाही, त्याप्रमाणे मायेच्या आवरणामुळे प्राणीमात्रांना भगवंत दिसत नाही. ज्ञानी लोक हे मायेचे आवरण पार करून जातात.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 28,29

भगवद गीता अध्याय 7 श्लोकआणि अर्थ
परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते राग-द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात.
जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे जड जीवाला पिडणारे विकार आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवास त्याच्या पूर्वकर्मानुसार, अज्ञानानुसार व प्रारब्धानुसार व्याधी प्राप्त होतात. त्या कोणासही चुकविता येत नाहीत; पण जो खरोखर ज्ञानी असेल, जो निष्काम भावनेने श्रेष्ठ कर्म करीत असेल, ज्या योग्याचे सर्व पाप नाहीसे झाले असेल, ज्यांचा द्वंद्वरूप मोह नाहीसा झाला असेल, त्या प्रिय भक्तांचे वार्धक्य व मृत्यू भगवंत टाळू शकतो. त्यांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवू शकतो. त्यांना मोक्षप्राप्ती करून देऊ शकतो. ते भक्तच संपूर्ण अध्यात्म, ब्रह्म व संपूर्ण कर्म जाणू शकतात. त्यांनाच सच्चिदानंदाचा आनंद प्राप्त होतो.
भगवद गीता अध्याय 7 श्लोक 30

जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.
जे भक्त भगवंताला सर्व प्रकृतीचा निर्माता असा अधिभूत म्हणून जाणतात, जे भक्त भगवंताला सर्व देव-देवतांचा अधिष्ठाता असा अधिदैव म्हणून जाणतात, जे भक्त सर्व कर्मांचे, सर्व यज्ञाचे कर्तेपण भगवंतालाच देतात व अधियज्ञ म्हणून जाणतात, भगवंताला शरण जातात. जे अंतकालीही भगवंताचे स्मरण ठेवतात. ते सर्व भक्त शेवटी भगवंतालाच येऊन मिळतात.
या अध्यायात भगवंतांनी भक्तांचे प्रकार (अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू, ज्ञानी), ब्रह्मज्ञान व परमात्मज्ञान, मनुष्याच्या विकारांचे प्रकार (जन्म, मृत्यू, जरा, व्याधी), अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय? परा व अपरा प्रकृती म्हणजे काय? अष्टधा प्रकृती (आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश, मन, बुद्धी, अहंकार) म्हणजे काय? त्रिगुण (सत्त्व, रज, तम) म्हणजे काय? यांची माहिती घेतली. तसेच भगवत्प्राप्ती कशी करता येते याचे विज्ञान समजून घेतले. आता पुढील अध्यायात भगवंत आपणास अक्षरब्रह्म योगाची माहिती देत आहेत.
हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी ज्ञानविज्ञान योग हा सातवा अध्याय समाप्त झाला.