भगवद गीता अध्याय 10 ( विभूतियोग ) bhagwat geeta adhyay 10 in marathi

भगवद गीता अध्याय 10

विभूतियोग

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 1,2

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-1-2

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ 

               भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना! आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी, कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षीचे आदिकारण आहे.

             भगवंत कसा आहे? पराशर मुनी म्हणतात की, बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या ऐश्वर्यांनी परिपूर्ण जो पुरुषोत्तम आहे, त्याला भगवान किंवा भगवंत म्हणावे. आतापर्यंत आपण भगवंताच्या बलाविषयी माहिती घेतली. या अध्यायात भगवंत अर्जुनाला त्यांच्या ऐश्वर्याविषयी रहस्यमय व प्रभावयुक्त माहिती त्याच्या हितासाठी सांगणार आहेत.

                भगवंत सर्वांचे आदिकारण असल्यामुळे भगवंतांची उत्पत्ती व अवतार साधू, संत, ऋषी, महर्षी, देव, देवता यापैकी कोणीही जाणू शकत नाही. भगवंताचा अवतार व स्वरूपदेखील ते जाणू शकत नाहीत. भगवंत अनादि आहेत.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 3

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-3

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ  

            जो मला वास्तविक जन्मरहित, अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्त्वतः जाणतो, तो मनुष्यांत ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो.

                   सातव्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की, जो योगी आध्यात्मिक क्षेत्रात साक्षात्कारापर्यंत प्रगती करतो, तो योगी सामान्य मनुष्य नसतो. तो ज्ञानयोगी असतो, कारण या अवस्थेत तो मला जन्मरहित जाणतो. मी अनादी आहे, असेही जाणतो. मला तो महान ईश्वर असेही जाणतो. ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे शक्य होत नाही. येथे भगवंतांनी अज हा शब्द वापरला आहे. अज म्हणजे अजन्मा.

             अजन्मा म्हणजे जन्मरहित. ज्याला जन्म असतो त्याला मृत्यू असतो. जो आहेच तो अजन्मा. चौथ्या अध्यायात म्हटले आहे की, भगवंत कधीही अपरा प्रकृतीच्या अधीन होत नाहीत. जन्म व मृत्यू पावणारे जीव देहांतर करतात तसे भगवंत देहांतर करत नाहीत. भगवंत जरी अवतार घेत असले तरी ते परा प्रकृतीतच असतात.

               भगवंत सर्व विश्वाचे स्वामी आहेत हे मनुष्याने जाणले पाहिजे, असे भगवंत आवर्जून या श्लोकाद्वारे सांगत आहेत. भगवंत या सृष्टीच्या आदीपासून आहेत आणि या सृष्टीच्या नंतरही असणार आहेत. ते सर्व देव-देवतांचे महेश्वर आहेत. आध्यात्मिक गुरू व शास्त्र हे भगवंताचे प्रतिनिधी समजले जातात, कारण ते पापरहित व शुद्ध असतात. ते आपल्याला भगवंत हे अनादी व महान ईश्वर आहेत हे पटवून देऊ शकतात, कारण त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 4,5

भगवद-गीत-अध्याय-10-श्लोक-4-5

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

              निर्णयशक्ती, यथार्थ ज्ञान, असंमूढता, क्षमा, सत्य, इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख-दुःख, उत्पत्ती-प्रलय, भय-अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती-अपकीर्ती, असे हे भूतांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात.

               मनुष्य म्हटला की, त्याला मन असते. मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण याला अंतःकरण चतुष्ट्य असे म्हणतात. मनुष्य म्हटला की, त्याच्या मनात निरनिराळे भाव उत्पन्न होतात. बुद्धी म्हणजे निर्णय शक्ती होय. बुद्धीमुळेच यथार्थ ज्ञान होते. असंमोह म्हणजे असंमूढता होय. संशय आणि मोह यापासून सुटका होणे महत्त्वाचे असते. क्षमा आणि दया हे मनुष्याचे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत.

                भय-अभय, सुख-दुःख अशी द्वंद्वे मनुष्याच्या मनात नेहमी निर्माण होतात. शम म्हणजे मनोनिग्रह, तर दम म्हणजे इंद्रियदमन. भव-अभाव म्हणजे उत्पत्ती- प्रलय होय. तुष्टी म्हणजे आनंद किंवा संतोष होय. अहिंसा, तप, दान असे अनेक प्रकारचे भाव मनुष्याच्या मनात निर्माण होत असतात. ते सर्व भाव भगवंतापासूनच निर्माण होतात; पण चांगले भाव आत्मसात करावेत व जे चांगले भाव नाहीत, त्यांचा त्याग करावा. सद्भाव, सद्वर्तन, सत्कर्म यांचा अंगीकार करावा.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 6,7

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-6-7

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

               सात महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकादिक, तसेच स्वायंभुव इत्यादी चौदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. जो पुरुष माझ्या या परमैश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वतः जाणतो, तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात शंका नाही.

             भगवंत आपणास जीवांची वंशावळ सांगत आहेत. भगवंतांनी हिरण्यगर्भ या मनाच्या संकल्पशक्तीपासून ब्रह्मदेव हा निर्माण केलेला पहिला जीव आहे. ब्रह्मदेवांनी मग चार सनकादिक मुनी (सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार), सप्तर्षी (क्रतू, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ, आणि मरीचि), चौदा मनु (स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, देवसावर्णि आणि इंद्रसावर्णि) असे एकूण पंचवीस महर्षी निर्माण केले.

              यांना प्रजापती असे म्हणतात. या जगातील सर्व मानवजात त्यांच्यापासूनच निर्माण झाली आहे. ब्रह्मदेवाला पितामह, तर भगवंतांना प्रपितामह असे म्हणतात. जो ईश्वराला जाणतो ती खरा भक्त होय.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 8,9

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-8-9

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

                  मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे, असे जाणून श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला नेहमी भजतात. निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांत माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात.

                ब्रह्मदेव, चार सनकादिक मुनी, सप्तर्षी, चौदा मनू, अकरा रुद्र, बारा आदित्य, आठ वसू, इंद्र, शिव, देव, मानव, दानव अशा प्रकारे सृष्टीतील जीवांची निर्मिती झाली. भगवंतच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहेत. सर्व सृष्टी आपणास क्रियाशील दिसते, त्याचे कारणही भगवंतच आहेत. श्रद्धावान भक्त भगवंताला जाणतात, भगवंताची भक्ती करतात, भगवंताची पूजा करतात; कारण ते ज्ञानी असतात. ते भगवंताच्या शौर्याची, शक्तीची परस्परात चर्चा करतात. निरुपणे, प्रवचने व कीर्तने करतात. ते भगवंत चिंतनात रमतात.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 10,11

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 10,11

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

              त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो.

                  ज्यायोगे मनुष्य या भौतिक जगाच्या जंजाळातून मुक्त होतो व ज्ञानमार्गाने भगवंताला आपलेसे करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ज्ञानयोगी किंवा सांख्ययोगी म्हणावे हे आपण दुसऱ्या अध्यायात पाहिले. जेव्हा मनुष्याला जीवनाचे अंतिम ध्येय माहीत असते, पण तो कर्मफलात आसक्त असतो तेव्हा त्याला सकाम कर्मयोगी म्हणावे. जेव्हा तो कर्मफलाची आशा न करता भगवंतासाठी कर्म करतो, तेव्हा त्याला निष्काम कर्मयोगी म्हणतात.

            इंद्रिय दमन करून सिद्ध समाधी योगाने जो भगवंताला आपलेसे करतो, त्या योग्याला ध्यानयोगी म्हणावे; पण जेव्हा मनुष्य अनन्य भक्तीने भगवंताला आपलेसे करून घेतो, तेव्हा त्याला भक्तियोगी म्हणतात. हे ज्ञान भगवंत भक्ताला देऊन त्याचे अज्ञान नष्ट करतात.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 12,13

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-12-13

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

               अर्जुन म्हणाला, आपण परमब्रह्म, परमधाम आणि परमपवित्र आहात; कारण आपल्याला सर्व ऋषिगण सनातन, दिव्य पुरुष, तसेच देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता.

                    भगवंतांनी अर्जुनाला जीवांची वंशावळ सांगितल्यावर आणि भगवंतहे सर्व सृष्टीचे आदिकारण आहेत हे सांगितल्यावर अर्जुनाला खूप आनंद झाला. अर्जुन भगवंतांना म्हणाला की, तुम्ही साक्षात परब्रह्म आहात. आपण साक्षात भक्तांचे परमधाम आहात. आपण अत्यंत परम पवित्र आहात. भगवंत, आपल्याला सर्व ऋषी, मुनी, साधू, संत, गुरुजन, आचार्य, सनातन मानतात.

               दिव्य पुरुष मानतात. सर्व देव-देवतांचा आदिदेव मानतात. अजन्मा मानतात. सर्वव्यापी मानतात. देवर्षी नारद. मुनिवर असित, ऋषिवर देवल व महर्षी व्यास यांनी पण असेच मत व्यक्त केले आहे. वेद व उपनिषदे सुद्धा हेच सांगतात. शास्त्रदेखील हेच सांगते. आणि आपणही मला तेच सांगत आहात. भक्तांचे आपण परब्रह्म, परमधाम, विश्रांतीस्थान आहात.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 14,15,16

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-14-15-16

  भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ 

            हे केशवा ! जे काही मला आपण सांगत आहात, ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन्! आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव. हे भुतांना इत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा ! तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. म्हणून ज्या विभूर्तीच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात.

                      परमभक्त अर्जुन भगवंतांना निक्षून सांगत आहे की, तुम्ही जे सांगत आहात ते मी सत्य मानतो. आपल्या लीलामय स्वरूपाला दानव, मानव, देव कोणीच जाणू शकत नाही. आपण भुतांचे ईश्वर, देवांचेही देव, जगाचे स्वामी आहात. आपणच फक्त स्वतःस जाणता. आपण या सृष्टीत दिव्य विभूर्तीच्या योगाने व्यापून आहात..

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 17,18

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-17-18

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

                   हे योगेश्वरा ! मी कशाप्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवन्! आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात? हे जनार्दना ! आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा; कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. अर्थात, ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहते.

                 सर्वसामान्य भक्तांना भगवंतो ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून अर्जुन वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांना प्रश्न विचारून भगवंताच्या विभूती आणि योगशक्तींची अमृत वचने ऐकण्यास उत्सुक झाला आहे. भगवंतांनी बोलतच राहावे असे अर्जुनाला वाटत आहे.

                 त्याची तृप्तीच होत नाही. निरंतन चिंतन करीत भगवंताला कशाप्रकारे जाणावे? भगवंताचे चिंतन करताना भक्तामध्ये कोणते भाव असावेत? असे अनेक प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारीत आहे; कारण अर्जुन हा भगवंतांचा सखा तर आहेच पण भगवंतांचा तो परमभक्त आहे. त्यामुळे भगवंतांना प्रश्न विचारण्याचा त्याला तेवढा अधिकार प्राप्त झाला आहे. भगवंतांची खुशामत करताना अर्जुन भगवंतांना योगेश्वर म्हणतो. भगवन् म्हणतो. जनार्दन म्हणतो.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 19,20

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 19,20

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

                 श्री भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा! आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत, त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन; कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. हे गुडाकेशा! मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे.

                आपल्या लाडक्या भक्ताचे, अर्जुनाचे प्रश्न ऐकून भगवंतांना खूप आनंद झाला. भगवंतांनीही कुरुश्रेष्ठ व गुडाकेश असे संबोधून अर्जुनाचा गौरव केला आहे. गुडाकेश म्हणजे निद्रेवर विजय मिळविणारा. अज्ञान या अंधःकाररूपी निद्रेवर विजय मिळविल्यावर भक्त भगवंताला जाणू शकतो.

               शरीरात आत्मा असेल तरच देहाला जीव म्हणतात, तसे चराचरात परमात्मा असेल तरच सृष्टी जिवंत वाटते. सृष्टीत भगवंताच्या अनंत दिव्य विभूती आहेत. अशा सर्व विभूती सामान्य भक्त जाणू शकत नाही. म्हणून भगवंत त्यातल्या मुख्य अशा काही विभूतीच आता सांगण्यास तयार झाले आहेत. भगवंत हे सर्व भूतांचे आदी, मध्य व अंत आहेत. सर्व भूतांच्या हृदयात आत्मा या स्वरुपात वास करतो.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 21,22

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-21-22

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

                 अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. एकूण पन्नास वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. वेदांत सामवेद मी आहे, देवांत इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे.

                अदितीच्या बारा पुत्रांना (त्वष्ट, पूषा, विवस्वान, मित्र, धाता, विष्णू, भग, वरुण, सवितृ, शक्र, अंश आणि अर्यमा) आदित्य असे म्हणतात. यापैकी विष्णू म्हणजे भगवंत आहे. आकाशात असंख्य तारे आहेत. त्यातील प्रमुख सूर्य भगवंत आहेत. आकाशातील एकूण पन्नास प्रकारच्या वायूंपैकी मरीचि भगवंत आहेत. नक्षत्रांचा अधिपती चंद्र म्हणजे भगवंत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चार वेदांमध्ये सामवेद म्हणजे भगवंत आहेत. देवांचा राजा इंद्र होय.

             इंद्र म्हणजे भगवंतांची विभूती आहे. पाच ज्ञानेंद्रिये (कर्ण, नासिका, त्वचा, चक्षु व जिव्हा), पाच कर्मेंद्रिये (हस्त, पाद, मुख, उपास्य व पायू), ही दहा इंद्रिये असून मन हे अकरावे इंद्रिय मानले जाते. हे मन म्हणजे भगवंत आहेत. सर्व जीवांची चेतना म्हणजे जीवनशक्ती. ते चैतन्य म्हणजे भगवंत आहेत.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 23,24

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-23-24

भगवद गीता अध्याय 10 श्लोकआणि अर्थ

               अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षस यांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. मी आठ वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरु पर्वत आहे. पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज. हे पार्था! मी सेनापतींमधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे.

                एकूण अकरा रुद्र आहेत (मन्यू, मनू, महिनस, महान, शिव, ऋतुध्वज, इग्ररेता, भव, काल, वामदेव व धृतव्रत) यामध्ये शिव भगवंत आहेत. यक्ष आणि राक्षस यांचा अधिपती व देवांचा कोषाध्यक्ष, धनाचा स्वामी कुबेर म्हणजे भगवंत आहेत. एकूण आठ वसू आहेत (आप, ध्रुव, सोम, अनिल, अग्नी, प्राण, प्रभास व प्रत्यूष) त्यामध्ये अग्नी म्हणजे भगवंत आहेत. उंच पर्वतांना शिखर असते. अशा उंच पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत म्हणजेभगवंत आहेत.

           बृहस्पती हा सर्व देवांचा पुरोहित म्हणजेभगवंत आहेत, शंकर व पार्वती यांचा पुत्र जो स्कंद तो सर्व देवांच्या सैन्याचा सेनाधिपती म्हणजे भगवंत आहेत. सृष्टीमध्ये तलाव, नदी, विहिरी, समुद्र असे जलाशय आहेत. त्यात समुद्र प्रमुख मानला जातो. तो समुद्र म्हणजे भगवंत आहेत.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 25,26

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-25-26

           मी महर्षीमध्ये भृगू आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. सर्व वृक्षांत पिंपळ आणि देवर्षीमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे.

             वरुणपुत्र भृगूमहर्षी यांचा अध्यात्मातील अधिकार मोठा असल्यामुळे ते श्रेष्ठ महर्षी आहेत. भृगू म्हणजे भगवंत आहेत. ॐकाराला एकाक्षर ब्रह्म असेही म्हणतात. ॐकार भगवंत आहेत. वेदात अनेक यज्ञ सांगितले आहेत. त्यात जपयज्ञ किंवा नामयज्ञ कलियुगात सर्वश्रेष्ठ आहे. तो जपयज्ञ भगवंत आहेत. हिमालय अचल आहे, श्रेष्ठ आहे म्हणून हिमालय भगवंत आहेत.

              पिंपळ या वृक्षाला अश्वत्थ म्हणतात. म्हणून अश्वत्थ वृक्ष म्हणजे भगवंत आहेत. देवर्षी नारदमुनी हे भगवंतांचे लाडके भक्त. तीनही लोकात त्यांना संचार करण्याची परवानगी होती. म्हणून नारद हे भगवंत आहेत. गायन कलेत पारंगत असणाऱ्या गंधर्वामध्ये चित्ररथ अत्यंत श्रेष्ठ समजला जातो. म्हणून चित्ररथ भगवंत आहेत. कपिलमुनी हे सर्व सिद्धांमध्ये श्रेष्ठ आहेत म्हणून भगवंताची विभूती आहे.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 27,28

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 27,28

               घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गाईंमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्वांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे.

             सूर व आसुर यांनी समुद्रमंथन केले. त्यावेळी चौदा रत्ने निघाली. (लक्ष्मी, कौस्तुभ, इच्चैःश्रवा, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, कामधेनू, विष, अप्सरा, ऐरावत, शांगी धनुष्य, शंख, अमृत) उच्चैःश्रवा हा पांढराशुभ्र सातमुखांचा दिव्य घोडा, इंद्राचे वाहन असलेला श्रेष्ठ दिव्य ऐरावत हत्ती, इच्छित वस्तू पुरविणारी सुरभी दिव्य कामधेनू गाय हे सर्व भगवंत आहेत.

              सर्व समाजामध्ये राजाला फार महत्त्व आहे. तो प्रजेचा रक्षणकर्ता असतो. समाजव्यवस्था राजामुळे टिकून राहते. धर्मरक्षण होते. राजा म्हणजे भगवंत होय. इंद्राजवळ असणारे वज्र हे आयुध अत्यंत प्रभावशाली असते. वज्र म्हणजे भगवंत आहेत. कामवासनेमुळे प्रजोत्पादन होते. तेसुद्धा शास्त्रविहित हवे. कामदेव म्हणजे भगवंत आहेत. समुद्रमंथनाचे वेळी वासुकीचा उपयोग झाला. वासुकी म्हणजे भगवंत आहेत.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 29,30

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-29-30

            मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. तसेच पशुंमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी विनितापुत्र गरुड आहे.

                  सर्पाच्या विविध जाती आहेत. (शेषनाग, वासुकी, तक्षक, कुलक, कर्कोटक, पद्म, शंख, चूड़, धनंजय इ.) शेषनागाला अनंतनाग असेही म्हणतात. याच नागावर भगवंत पहुडलेले असतात. शेषनाग भगवंत आहेत. सर्व जलचर प्राण्यांचा अधिपती जो वरुणदेव तो भगवंत आहेत. पितरांमध्ये अर्यमा पितर म्हणजे भगवंत आहेत. यमराज हा मृत्यूनंतर सजीवांचा सर्वश्रेष्ठ दंडाधिकारी आहे. म्हणून शासनाधी पती यम हे भगवंत आहेत. दैत्यकुळातील असूनही भक्त प्रल्हादाने अनन्य भक्ती केली. प्रल्हाद हे भगवंत आहेत.

               समय किंवा काळ यामुळे कालगणना शक्य होते. समय भगवंत आहेत. वनराज सिंह अत्यंत बलवान आहे. सिंह ही भगवंताची विभूती आहे. विनिता मातेचा पुत्र पक्षीराज गरुड हे भगवंतांचे वाहन आहे. गरुड हा अत्यंत बलवान पक्षी समजला जातो. तो गरुड ही भगवंताची विभूती आहे.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 31,32

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 31,32

               मी पवित्र करणाऱ्यांत वायू आणि शस्त्रधाऱ्यांत श्रीराम आहे. तसेच माशांत मगर आहे आणि नद्यांत भागीरथी गंगा आहे. हे अर्जुना ! सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मी विद्यांतील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे.

         सजीवांना पवित्र करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. हवा. पाणी, गोमूत्र इ. प्राण, अपान, उदान, समान, व्यान हे वायू सजीवांना पवित्र ठेवतात. म्हणून वायू म्हणजे भगवंत आहेत. शस्त्र धाऱ्यामध्ये एकपत्नी, एकवचनी व एक बाणी असलेला श्रीराम म्हणजे भगवंत आहेत. मत्स्य कुळात मगर अत्यंत शक्तिशाली असते. ती मगर भगवंताची विभूती आहे. सर्व नद्यांमध्ये भागीरथी ही पवित्र करणारी, अत्यंत श्रेष्ठ नदी आहे. गंगा म्हणजे भगवंत आहेत. ही सर्व सृष्टी भगवंत निर्माण करतात.

           पालनपोषण भगवंत करतात. या सृष्टीचा विनाशही भगवंत करतात. म्हणून या सृष्टीचे आदी मध्य व अंत भगवंत आहेत. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या किंवा ब्रह्मविद्या सर्वश्रेष्ठ आहे. ती विद्या भगवंत आहेत. अंतिम तत्त्व शोधण्यासाठी अनेक पंडित वाद घालतात. तो वाद म्हणजे भगवंत आहेत.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 33,34

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-33-34

             मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द्वंद्व समास आहे. अक्षय काल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराटस्वरूप, सर्वांचे धारण-पोषण करणाराही मीच आहे. सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे.

              वेदांचा प्रारंभ या प्रथम स्वरापासून होतो. अकाराशिवाय कोणताच ध्वनी निर्माण होत नाही. म्हणून कार भगवंत आहेत. संस्कृत, मराठी, हिंदी भाषांत अनेक प्रकारचे समास असतात; पण दोन्ही शब्दांना सारखेच महत्त्व देणारा द्वंद्व समास म्हणजे भगवंत आहेत. सीताराम या शब्दात सीता व राम यांना सारखेच महत्त्व आहे. अक्षय असणारा काळ, सर्व बाजूंनी मुखे असणारे विराटस्वरूप, पालनहार, भगवंत आहेत.

            सजीवांच्या जन्म व मृत्यूचे कारणही भगवंत आहेत. कीर्ती, श्री म्हणजे लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे द्रुता, क्षमा हे सर्व स्त्रीलिंगी शब्द आहेत. यातील थोडी जरी ऐश्वर्ये मनुष्याला प्राप्त झाली तरी तो मनुष्य ऐश्वर्यवान समजला जातो. भगवंताला पुरुषोत्तम म्हणतात, कारण ही सर्व ऐश्वर्ये फक्त भगवंतापाशीच असतात.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 35,36

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 35,36

              तसेच गायन करण्याजोग्या वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यांतील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूंतील वसंत ऋतू मी आहे. मी छल करणाऱ्यांतील द्यूत आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे. निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्त्विक पुरुषांचा सात्त्विक भाव मी आहे.

            बृहत्साम हे सामवेदातील मध्यरात्री गायनाचे अत्यंत सुमधुर सुक्त आहे. ते भगवंत आहेत. नियमबद्ध गायनामध्ये छंद व लय यांना महत्त्व आहे. गायत्री हा छंद महत्त्वाचा आहे तो भगवंत आहेत. गायत्री हादेखील अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. बारा महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हा महिना व सहा ऋतूंत वसंत ऋतू श्रेष्ठ आहे. ते भगवंत आहेत. फसविणाऱ्या खेळांमध्ये द्यूत व प्रभावी, तेजस्वी पुरुषांचे तेज भगवंत आहेत. जे विजयी होतात त्यांचा विजय, निश्चयी लोकांचा निश्चय भगवंत आहेत.

             सात्त्विक पुरुषांमध्ये जो सात्विक भाव दिसून येतो, तो सात्विक भाव म्हणजे भगवंत आहेत. द्यूत, तेज, बल, जय, निश्चय, सात्त्विकता याबाबतीत भगवंतांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे ते भगवंत आहेत.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 37,38

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-37-38

               वृष्णीवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू, मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे. दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे, विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्त्वज्ञान मीच आहे.

              वृष्णीवंशीयांमध्ये वसुदेवपुत्र स्वतः श्रीकृष्ण भगवंत आहेत. पाच पांडवांमध्ये धनंजय म्हणजे अर्जुन भगवंत आहेत. महर्षी व्यास हे सर्व मुनींमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे भगवंत आहेत. शुक्राचार्यांना उशना म्हणून संबोधले जाते. शुक्राचार्य अत्यंत प्रतिभावान कवी समजले जातात.

              शुक्राचार्य म्हणजे भगवंत आहेत. अपराध्याला शासन किंवा दंड करण्यासाठी जी दमन शक्ती लागते. ती दंडात्मक शक्ती स्वतः भगवंत आहेत. जे नीतिमान पुरुष विजयाची अपेक्षा करतात. त्यांची शुद्ध नीती म्हणजे भगवंत आहेत. मौनाने सर्वकाही साध्य होते असे म्हणतात. मौनाने गुप्तता राखली जाते. ते मौन भगवंताची विभूती आहे. अध्यात्मात प्रगती करायला ज्ञानवंताला तत्त्वज्ञानाची गरज असते. ते तत्वज्ञान म्हणजे भगवंताची विभूती आहे.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 39,40

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-39-40

             आणि हे अर्जुना! जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे; कारण असे चराचरातील एकही भूत नाही की, जे माझ्याशिवाय असेल. हे अर्जुना! माझ्या विभूतींचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला.

           अशा नानाविध विभूतींनी भगवंत नटला आहे. सर्व भूतमात्रांची उत्पत्ती भगवंतांनी केली आहे. त्यांचे पालनही तोच करतो आहे व विनाशही तोच करणार आहे. भगवंतांनी विभूतींचा विस्तार अगदी थोडक्यात आपणास सांगितला आहे.

                भगवंताच्या शक्तींचे व ऐश्वर्याचे मोजमाप वेदांनाही करता आले नाही. नेती नेती म्हणत त्यांनी माघार घेतली आहे. भगवंताची लीला अगाध आहे. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, वेदांगे, चौसष्ट कला, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र या सर्वांचा जरी अभ्यास केला तरी भगवंत कसा आहे हे कोणालाच आकलन होऊ शकणार नाही. तो नाही असे काही अज्ञानी लोक म्हणतात; पण भगवंताच्या आज्ञेशिवाय झाडाचे पानदेखील हालत नाही. शरीरात जर प्राण नसेल तर शरीराला काहीच किंमत नाही. चराचराला भगवंताशिवाय काहीच किंमत नाही. शरीरात जसा आत्मा तसा सृष्टीत अनंत विभूतींनी भगवंत भरला आहे.

भगवद गीता अध्याय 10 श्लोक 41,42

भगवद-गीता-अध्याय-10-श्लोक-41-42

              जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज किंवा हे अर्जुना ! हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे.

               या सृष्टीत असणारी ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त, शक्तियुक्त, उत्तम, उदात्त, उन्नत जी जी वस्तू आहे, ती ती भगवंताच्या तेजाच्या अंशाने भरली आहे. सर्व चराचर भगवंताच्या अंशाने भरले आहे. म्हणून त्यात चैतन्य आहे. भगवंताकडे जेवढी योगशक्ती आहे त्याचा केवळ एक अंश भगवंताने ही सृष्टी निर्माण करण्यासाठी वापरला आहे. यावरून भगवंताची योगशक्ती किती अफाट असली पाहिजे याची कल्पना येते. प्रत्येक सूक्ष्म वस्तूचासुद्धा उगम भगवंताच्या हातात आहे. त्यामुळे भगवंतापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.

              हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी विभूतियोग हा दहावा अध्याय समाप्त झाला.

Leave a Comment