भगवद गीता अध्याय 11 ( विश्वरूपदर्शनयोग ) bhagwat geeta adhyay 11 in marathi

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 1,2

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-1-2

  भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

Table of Contents

       अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले; कारण हे कमलदलनयना ! मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे.

             भगवंतांनी अत्यंत गुप्त असा आध्यात्मिक ज्ञानोपदेश अर्जुनरूपी सर्व समाजाला सांगितला आहे. तसेच सजीवांची उत्पत्ती, स्थिती व लय यांची विस्तारपूर्वक माहितीही सांगितली आहे. भगवंतांचा अविनाशी प्रभाव व विभूती यांचेही आकलन झाले आहे. त्यामुळे अर्जुनाचे अज्ञान नाहीसे झाले आहे. त्यामुळे अर्जुनाचा विषाद नाहीसा झाला आहे, भ्रम दूर झाला आहे.

                अर्जुन हा मुळातच भगवंतांचा अनन्य भक्त असल्याने त्याला उपदेशाचा उपयोग झाला. भगवंतांना अनेक प्रश्न विचारून अर्जुनाने जे ज्ञान मिळविले त्याचा सर्व जगाला उपयोग झाला आहे.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 3,4

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-3-4

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

               हे परमेश्वरा ! आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात, ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा ! आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेज यांनी युक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. हे प्रभो! जर मला आपले ते रूप पाहता येईल, असे आपल्याला वाटत असेल, तर हे योगेश्वरा! त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा.

           आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाल्यावर आता अर्जुनाला भगवंतांचे विराट स्वरूप पाहण्याची ओढ लागली आहे. ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य, तेज या सहा तेजोगुणांनी समृद्ध असलेल्या भगवंतांना अर्जुन त्यांचे ईश्वरी स्वरूप दाखविण्याबद्दल विनंती करीत आहे. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ति करणारा, त्यांना सांभाळणारा व प्रलय करणारा अविनाशी भगवंत कसा असेल, याचीच उत्सुकता अर्जुनाला लागली आहे.

          अवतार रूपातील श्रीकृष्ण व जगन्नाथ भगवंत यात काय फरक आहे हे अर्जुनाला पाहायचे आहे. सर्वसामान्य भक्ताला सगुण साकार रूपच पाहायला आवडते. विराट स्वरूप पाहायला दिव्य दृष्टी लागते. ती भगवंतांनी द्यावी लागते.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 5,6

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक 5,6

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

             भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था! आता तू माझी शेकडो-हजारो नाना प्रकारची, नाना रंगांची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पाहा. हे भारता! माझ्यामध्ये अदितीच्या बारा पुत्रांना, आठ वसूंना, अकरा रुद्रांना, दोन्ही अश्विनीकुमारांना आणि एकोणपन्नास मरुद्रणांना पाहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पाहा.

                अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन आपल्या लाडक्या भक्ताला व सख्याला भगवंत अनेक रूपे दाखविण्यास तयार झाले आहेत. भगवंत अर्जुनाला म्हणाले की, अनेक प्रकारची, अनेक आकाराची व अनेक रंगांची शेकडोच काय, पण हजारो अलौकिक रूपे आता तू अर्जुना पाहू शकतोस. अदितीला जे श्रेष्ठ बारा पुत्र झाले ते माझ्या रूपात पाहून घे. हे बघ. या आठ वसूंना पाहून घे. अकरा रुद्रही तू माझ्या या रूपात पाहू शकतोस.

             हे बघ दोन अश्विनीकुमार. तुला मरुद्रण पाहण्याचीच जर इच्छा असेल तर हे बघ माझे हे रूप. तुला या रुपात सर्व मरुद्गण दिसतील. तू यापूर्वी जी रूपे पाहिली नसशील ती पाहून घे. ती रूपे अद्भुत व आश्चर्यकारक आहेत.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 7,8

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-7-8

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

                     हे अर्जुना ! आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पाहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल, ते पाहा; परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षूनी खात्रीने पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या साहाय्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पाहा.

                   मनुष्याला जे चर्मचक्षू लाभले आहेत, त्यांची शक्ती अत्यंत कमी असते. एका जागेवर बसून कोणालाच हे संपूर्ण जग पाहता येत नाही. अतिउंच आकाशात गेले तरी या जगाचा निम्माच भाग तो पाहू शकतो. संपूर्ण नाही. म्हणून विराट स्वरूप पाहण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. व्यास महर्षीनी संजयासदेखील अशीच दिव्य दृष्टी दिली आहे. त्यामुळे संजयदेखील रणांगणावरील सर्व दृश्य व भगवंतांचे विराट स्वरूप पाहून त्याचे वर्णन धृतराष्ट्रास करू शकत आहे. आता अर्जुन भगवंतांचे विराट स्वरूप पाहू शकत आहे.

           तो आता चराचरास हे संपूर्ण जग भगवंतांच्या शरीरात पाहत आहे. भगवंतांची योगशक्ती पाहत आहे. अर्जुनाला जे काही पाहायचे आहे ते सर्व तो पाहू शकत आहे.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 9

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 9

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

                   संजय म्हणाला, हे महाराज ! महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या श्री भगवंतांनी असे सांगून मग पार्थाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखविले.

               युद्ध सुरू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने संजयास आपला दूत म्हणून पाठवून सामोपचाराचा सल्ला देण्याच्या निमित्ताने पांडवांचे पुरेसे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. धृतराष्ट्राचा सामोपचार म्हणजे शत्रूच्या मनात विपरीत विचार पेरणे. त्याच्या मनात गोंधळ निर्माण करणे. धृतराष्ट्राने संजयाकरवी युधिष्ठिरास सांगितले की, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षा क्षमा हेच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शंतनुनंदन भीष्म मारला जाईल, द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही.

              कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणते सुख प्राप्त होणार आहे? धृतराष्ट्राला खात्री होती की, आपल्या निरोपाचा युधिष्ठिरावर नक्कीच परिणाम होणार; पण जरी वरील निरोपाचा युधिष्ठिरावर व भीमावर परिणाम झाला नाही तरी त्याचा अर्जुनावर परिणाम झालाच. संजय व्यास महींनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे कुरूक्षेत्रावरील घटनाक्रम बसल्या जागेवरून समक्ष पाहू शकत होता. आता संजय धृतराष्ट्रास सांगत आहे की, महाराज, सर्व पापांचा नाश करणाऱ्या महायोगेश्वर भगवंतांनी अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त असे दिव्य स्वरूप दाखविले.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 10,11,12

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-10-11-12

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

                   अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त, अनंतस्वरूप, सर्व बाजूंना तोंडे असलेल्या विराटस्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल, तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाचितच होईल म्हणजे होणार नाही.

           अर्जुनाने जे विश्वरूप पाहिले ते अलौकिक होते. आकाशात हजार सूर्यांचे जेवढे तेज असेल त्याहीपेक्षा जास्त तेज या विश्वरूपाचे होते. या विराट स्वरूपाला सर्व बाजूंनी तोंडे होती. असंख्य डोळे होते. त्याने दिव्य अलंकार, शस्त्रे, माळा, गंध व वस्त्रे परिधान केली होती.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 13,14

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-13-14

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

           अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारांत विभागलेले संपूर्ण जग देवाधिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला धनंजय प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला,

              अर्जुनाने जे विश्वरूप पाहिले, जे विराट स्वरूप पाहिले., ते महाभयंकर होते. अतिविशाल होते. अर्जुनाने भगवंतांच्या देहात स्वर्ग, पृथ्वी, सप्तपाताळ तर पाहिलेच, पण अनेक ब्रह्मांडे पाहिली. अनेक तारे, ग्रहगोल, तारका पाहिल्या. अनेक देवदेवता पाहिल्या. शिवलोक, ब्रह्मलोक, यमलोक, वैकुंठ पाहिले. ऋप्तर्षी पाहिले. वसू, आदित्य पाहिले. मनू, रुद्र पाहिले. सप्त समुद्र पाहिले.

            हे सर्व पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला. अत्यंत दिव्य तेजाने प्रकाशमय असलेला तो विश्वरूप परमात्मा पाहून अर्जुन सद्गतीत झाला. अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्याने नमस्कार केला. श्रीकृष्णाचा तो अनन्य भक्त होताच, दन करावे हे त्याला कळेना. त्याने श्रद्धायुक्त अंतःकरणाने हात जोडून भगवंतांना वंदन केले.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 15,16

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 15,16

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

           अर्जुन म्हणाला, हे देवा! मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवांना, शंकरांना, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्वांना पाहत आहे. हे संपूर्ण विश्वाचे स्वामी ! मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले, तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा ! मला आपला ना अंत दिसतो, ना मध्य दिसतो, ना आरंभ.

            भगवंतांचे विराट दिव्य स्वरूप पाहताना जे काही दिसत आहे त्याचे वर्णन अर्जुन भगवंतांना पुन्हा पुन्हा सांगत आहे. त्याने भगवंतांच्या देहामध्ये सर्व देवदेवता पाहिल्या. अर्जुनाने अनेक ऋषींचे, मुनींचे समुदाय, योगीजनांचे समुदाय, ब्रह्मदेव, शंकर, भगवंतांच्या देहात पाहिले. अनेक मुखे, बाहू, चक्षु असलेले विश्वरूप पाहिले.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 17,18

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-17-18

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

                  मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे, प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद असे पाहत आहे. आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादी धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात, असे मला वाटते.

           अर्जुनाने भगवंतांचे मुकुट घातलेले, चक्र, गदा धारण केलेले अत्यंत तेजस्वी असे लावण्यरूप पाहिले. भगवंत सर्व जगाचे परब्रह्म, परमात्मा, पालनहार व आधारस्तंभआहेत.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 19,20

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-19-20

                आपण आदी, मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले, चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे, असे आहात, असे मला दिसते. हे महात्मन् ! हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकल्या आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत.

              विराट स्वरूपाचे वर्णन अर्जुन करीत आहे. ज्याला आदी, मध्य व अंत नाही, ज्याला अनंत सामर्थ्य आहे, अनंत बाहु आहेत. चंद्र व सूर्य हे ज्याचे नयन आहेत. प्रज्वलित अग्नी हे ज्याचे मुख आहे ज्यांनी सर्व आकाश व दिशा व्यापून टाकल्या आहेत.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 21,22

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-21-22

भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

            तेच देवतांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्ध यांचे समुदाय सर्वांचे कल्याण होवो, अशी मंगलाशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत. अकरा रुद्र, बारा आदित्य तसेच आठ वसू, साध्यगण, विश्वेदेव, दोन अश्विनीकुमार, मरुद्गण आणि पितरांचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धांचे समुदाय सचकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत.

            देव, महर्षी, सिद्ध, रुद्र, आदित्य, वसू, अश्विनीकुमार, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस हे त्या भगवंताकडे पाहत आहेत.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 23,24

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-23-24

  भगवद गीता अध्याय 11 श्लोकआणि अर्थ

             हे महाबाहो! आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकूळ होत आहेत. तसेच मीही व्याकूळ होत आहे; कारण हे विष्णो, आकाशाला जाऊन भिडलेल्या, तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहेत.

             अनेक दाढा, पसरलेली तोंडे, अनेक तेजस्वी डोळे, हात, पाय, मांड्या, अनेक पोट असलेले भयंकर वआकाशाला जाऊन भिडलेले विराट रूप पाहून अर्जुनाचे धैर्य व शांती नाहीशी झाली.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 25

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-25

            दाढांमुळे भयानक व प्रलयकाळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे. हे देवाधिदेवा ! हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा.

            एवढा धनुर्धारी क्षत्रिय पार्थदेखील ते विराट रूप पाहून घाबरला. प्रलयकाली जसा भयानक अग्नी प्रज्वलित होतो, तसा अग्नी त्या विराट रूपाच्या मुखातून ज्वाला रूपाने बाहेर पडत होता. त्याच्या त्या महाभयंकर दाढा पाहून अर्जुनाला भीती वाटू लागली. त्याला दिशाही कळेनाशा झाल्या. त्याचे सर्व सुख हरपून गेले. त्याचे मानसिक संतुलन बिघडले. अर्जुनाच्या मनात अतिशय गोंधळ निर्माण झाला. त्याला काय करावे हे सुचेना. भगवंताला प्रसन्न करून घेतल्याशिवाय तरणोपाय नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याने नतमस्तक होऊन भगवंतांना नमस्कार केला. अनन्य शरण जाऊन भगवंतांना प्रार्थना केली की, हे भगवंता ! तू जगत्पालक आहेस. तू महान शक्तिमान आहेस. तुझा आद्य, मध्य व अंत कळत नाही.

            तू सर्वेश्वर आहेस. तू परमात्मा आहेस. तूच ब्रह्म आहेस. तू भक्तांचा उद्धार करतोस. अनेक पुण्यवंत महात्मे मी तुझ्या देहात पाहिले आहेत. ज्या आसुरांना तुझ्या हातून मृत्यू आला, त्यांचा तू उद्धार केला आहेस. या तुझ्या भक्तावर तू प्रसन्न हो.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 26,27,28

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 26,27,28

                ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत जात आहेत आणि कित्येक डोकी चिरडलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत.

               ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात, समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्यलोकातील वीर आपल्या प्रज्वलित तोंडात शिरत आहेत.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 29,30

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-29-30

            जसे पतंग नष्ट होण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत. आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात. हे विष्णो ! आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवीत आहे. सर्व कौरव, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण व दोन्ही पक्षांतील प्रमुख योद्धे विराट पुरुषाच्या दातांच्या फटीतून व दाढांमधूनतोंडात अतिशय वेगाने प्रवेश करीत आहेत. त्यांना गिळले जात आहे. त्यांना चाटले जात आहे.

            त्या दिव्य पुरुषाच्या प्रखर तेजाने सर्व जग भाजून निघत आहे. कित्येक योद्धे डोकी चिरडलेल्या अवस्थेत त्या विराट पुरुषाच्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 31,32

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-31-32

              मला सांगा की, भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा! आपणास नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो; कारण आपली ही करणी मला कळत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत, ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणार आहे.

                आपल्या भक्ताची विनंती मान्य करून भगवंत अर्जुनास प्रसन्न झाले व म्हणाले की, मी लोकांचा नाश करणारा महाकाळ आहे. अनेकांचा नाश तू युद्ध केले नाहीस तरी होणार आहे.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 33,34

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-33-34

                म्हणूनच तू ऊठ. यश मिळव. शत्रूना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे सव्यसाची अर्जुना! तू फक्त निमित्तमात्र हो. द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिऊ नकोस. युद्धात तू खात्रीने शत्रूना जिंकशील. म्हणून युद्ध कर.

              भगवंत अर्जुनाला युद्ध करून युद्ध जिंकण्यासाठी निमित्त होण्याविषयी सांगत आहेत. ज्यांना भगवंतांनी अगोदरच मारले आहे त्यांना अर्जुनाने जर मारले तर अर्जुनाला स्वकीयांच्या मृत्यूची भीती उरणार नव्हती व त्याचा विषाद नाहीसा होणार होता. अर्जुनाने उठावे, युद्ध करावे, यश मिळवावे. धनधान्याने संपन्न असलेल्या राज्याचा उपभोग घ्यावा, अशी भगवंतांची इच्छा होती.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 35,36

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-35-36

              संजय म्हणाला, भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गतीत होऊन तो म्हणाला, अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी श्रीकृष्णा ! आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते.

          तसेच भ्यालेले राक्षस दिशादिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत, हे योग्यच होय. भगवंतांचे नाम, रूप व गुण यांचा प्रभाव एवढा असतो की, सर्व जग आनंदित होते, प्रेम करते, वंदन करते. शत्रू पळून जातो.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 37,38

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-33-38

               हे महात्मन ! ब्रह्मदेवाचेही आदिकारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? कारण हे अनंता ! हे देवाधिदेवा ! हे जगन्निवासा ! जे सत्, असत् व त्यापलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंदघन ब्रह्म आहे, ते आपणच आहात. आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच आहात. परम धामही आपणच आहात. हे अनंतरूपा, आपण हे सर्व विश्व व्यापले आहे.

              भगवंतांनी हे चराचर व्यापले आहे. या चराचराला फक्त भगवंतच जाणू शकतात. या सर्व जगाचे आश्रयस्थान भगवंत आहेत. भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहेत. आदिनाथ व परब्रह्मस्वरूप आहेत. भगवंत अनंत स्वरूप आहेत, अक्षर आहेत. सनातन आहेत. भगवंत सत् व असत् आहेत. भगवंत भक्तांचे कैवारी आहेत.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 39,40

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-39-40

             आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला हजार वेळा नमस्कार असो. आपणाला आणखीही वारंवार नमस्कार असोत. हे अनंत सामर्थ्यशाली! आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार. हे सर्वात्मका! आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्कार असो. कारण अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापले आहे. म्हणून आपण सर्वरूप आहात.

              भगवंत सर्वरूप आहेत. सर्वव्यापी आहेत. भगवंत सर्व पराक्रमी आहेत. भगवंतच वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, ब्रह्मदेव या सर्वांचे जनक आहेत. अशा सामर्थ्यशाली भगवंताला अर्जुनाने नमस्कार केला. भगवंताला नमस्कार करताना किती वेळा व कसा नमस्कार करावा, हेच समजत नाही. त्याला पुढून, मागून, सर्व बाजूंनी नमस्कार केला तरी समाधान होत नाही.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 41,42

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-41-42

            आपला हा प्रभाव न जाणवल्यामुळे, आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा ! हे यादवा! हे सख्या, असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल, आणि हे अच्युता ! माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल,

              त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे. भगवंत अर्जुनाला प्रसन्न झाले. अर्जुनाला युद्ध करण्याविषयी उपदेश केला. अर्जुनाने अनेक वेळा भगवंतांना प्रणाम केला व झाल्या अपराधांची क्षमा मागितली. काही वेळा भगवंतांचा प्रभाव जाणवत नाही. काही वेळा प्रेमाने, अविचाराने, कळत, नकळत भगवंताबद्दल चुकीचे बोलले जाते,

अशा वेळी भगवंताची क्षमा मागावी.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 43

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 43

              आपण या चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरू व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीयप्रभावा! त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही; मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल?

             भगवंतांनी प्रथम ब्रह्मदेवाला वेदांचा उपदेश केला व आता भगवंत अर्जुनाला भगवद्‌गीतेचा उपदेश करीत आहेत. म्हणजे श्रीकृष्ण हे आद्यगुरू आहेत. भगवंत सर्व जगाला जन्म देणारी माता आहे. भगवंत सर्व जगाचे पालनपोषण करणारे पिताश्री आहेत. माता, पिता व गुरू या सर्व भूमिका बजावणारे भगवंत आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. भगवंतांचा प्रभाव अतुलनीय आहे. स्वर्ग, पृथ्वी व पाताळ तसेच ब्रह्मलोक, शिवलोक व विष्णुलोकात भगवंतापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही.

            भगवंताचे हे श्रेष्ठत्व जे जाणतात तेच खरे भक्त होत, तेच खरे योगी होत. जे भगवंताला जाणत नाहीत ते मात्र अज्ञानी समजावेत. अर्जुनाने भगवंताला अनन्यतेने शरण जाऊन नमस्कार केला. भगवंतांची क्षमा मागितली. भगवंतांना आपण सखा म्हटले, मित्र म्हटले, यादवा म्हटले, कृष्णा म्हटले, याचा त्याला आता खेद वाटत

होता, वाईट वाटत होते.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 44

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 44

              म्हणूनच हे प्रभो! मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा ! वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात.

                भक्त आणि भगवंत यांचे नाते अतूट असते. भक्तिचेही अनेक प्रकार आहेत. कधी भक्त भगवंताकडे सखा म्हणून पाहतो, कधी स्वामी, तर कधी माता समजतो. कधी भगवंताला पिता, तर कधी गुरू म्हणून वंदन करतो. अशा सर्व नात्यांचा भगवंत आनंदाने स्वीकार करतात. चुकून काही अपराध झालाच तर माता आपल्या पुत्राचे अपराध सहन करते. पिता पुत्राला माफ करतो. गुरू शिष्याला क्षमा करतात. पती आपल्या पत्नीचे अपराध क्षम्य मानतो. मित्र मित्राला क्षमा करतो. त्याप्रमाणे भगवंतही आपल्या लाडक्या भक्ताच्या सर्व अपराधांना क्षमा करतात. त्याचे सर्व अपराध पोटात घालतात. विराट स्वरूप पाहिल्यावर अर्जुनाने भगवंतांच्या चरणकमलांवर सर्व अंग लोटून, साष्टांग नमस्कार घालून क्षमा मागितली. भगवंतांनी कृपा करावी आणि प्रसन्न व्हावे, अशी विनवणी केली.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 45

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-45

              पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकूळही होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णुरूपच दाखवा. हे देवेशा! हे जगन्निवासा ! प्रसन्न व्हा.

                 अर्जुनाला सुरुवातीला भगवंताचे विराट स्वरूप पाहण्याची इच्छा झाली होती. भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन ती पूर्ण केली. भयानक विराट स्वरूप पाहिल्यानंतर मात्र अर्जुन घाबरला. त्याला ते रूप फार वेळ पाहवेना. मग अर्जुनाने भगवंतांना विनंती केली की, असे विराटरूप मी यापूर्वी कधीच पहिले नव्हते. ते पाहून मी अतिशय आनंदित झालो आहे; पण भगवंता, मी हे तुझे भव्यदिव्य रूप फारवेळ पाहू शकत नाही.

                 मी भीतीने व्याकूळ झालो आहे. प्रसन्न होऊन मला तुमचे चतुर्भुज रूप दाखवा. आता तुम्ही माझ्यावर कृपा करावी आणि प्रसन्न व्हावे. भगवंता आता मला तुमचे नेहमीचे चतुर्भुज रूप दाखवावे. एका हातात शंख, दुसऱ्या हातात चक्र, तिसऱ्या हातात गदा व चौथ्या हातात पद्म ही आयुधे घेतलेले तुमचे लावण्यमय चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा झाली आहे. भगवंता आपण चतुर्भुज रूप दाखवा.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 46

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-46

               मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. हे विश्वस्वरूपा ! सहस्रबाहो! आपण चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा.

                  अर्जुनाला आता भगवंताचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा अनावर झाली आहे. भगवंतांना चार हात कशासाठी असतात, तर भगवंत दोन हातांनी शत्रूचा संहार करतो व दोन हातांनी भक्ताला आलिंगन देतो. अर्जुनाने भगवंतांचे विश्व स्वरूप पाहिले आहे. त्या शरीरात अनेक भूतमात्र, देवदेवता, ऋषिमुनी, साधुसंत, राक्षस पाहिले आहेत.

                अग्निमध्ये ज्याप्रमाणे पतंग वेगाने प्रवेश करतात, त्याप्रमाणे युद्धातील अनेक योद्धे भगवंतांच्या अजस्त्र दाढांमधून मुखामध्ये प्रवेश करताना पहिले आहेत. त्या भयानक रूपापेक्षा भगवंतांचे सौम्य, लावण्यमय, कपाळावर मुकुट घातलेले, हातात चक्र, गदा घेतलेले हसतमुख, गोजिरे, सुंदर चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा झाली आहे. कोणत्याही भक्ताला असेच रूप पाहायला आवडते. असे रूप पाहून मन प्रसन्न होते. मनाची तृप्ती होते.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 47

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-47

                भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय, सर्वांचे आदि, सीमा नसलेले, विराट रूप तुला दाखविले. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते.

                  अर्जुनाची विनंती भगवंतांनी मान्य केली. भगवंत अर्जुनावर प्रसन्न झाले. कोणत्याही भक्तावर त्याच्या भक्तीनुसार भगवंत प्रसन्न होतच असतो. भगवंतांनी आतापर्यंत असे विराट स्वरूप कोणालाही दाखविले नव्हते. अर्जुनाची भक्ती स्वीकारून व त्याची विनंती मान्य करून, अर्जुनावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या साहाय्याने आपले अनादी, असीम, परम तेजोमय असे विराट स्वरूप दाखविले.

           यशोदामातेला त्यांनी आपल्या मुखामध्ये जे रूप दाखविले ते वेगळे विश्वरूप होते. हे विराट रूप मात्र भगवंतांनी अर्जुनाशिवाय आजपर्यंत कोणालाही दाखविले नाही, असा स्पष्ट उल्लेख वरील श्लोकात आला आहे. अर्जुन जरी कुरुक्षेत्रावर भगवंतांचे विराट स्वरूप पाहत असला तरी अर्जुनाशिवाय ते कोणीही पाहू शकत नव्हते. दिव्यदृष्टी फक्त अर्जुनालाचप्राप्त झाली होती.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 48

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 48

                अर्जुना, मानवलोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्यांनीही तुझ्याखेरीज दुसऱ्याकडून पाहणे शक्य नाही.

                   मनुष्य दिव्य झाल्याशिवाय दिव्य शक्तीत प्राप्त होऊ शकत नाही. मनुष्याने दिव्य होणे म्हणजे काय? तर दिव्य अशा भगवंताला जे जे आवडते ते ते करणे. सत्कर्म करणे, निष्काम कर्म करणे, सत्संगती करणे, सद्भावना ठेवणे, सत्त्वशील अन्न खाणे, सद्वर्तन करणे, सत्य बोलणे, भगवंताचे सतत चिंतन करणे, भक्ती करणे हे सर्व अर्जुन करीत होता म्हणून अर्जुन हा भगवंतांचा सखा झाला, भगवंतांचा अनन्य भक्त झाला.

                  जो भगवंताचा होतो त्याला भगवंत हवे ते देतात. त्याच्या मनोकामना पूर्ण करतात, इच्छा पूर्ण करतात. अर्जुनाची विराट रूप पाहण्याची इच्छा अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन व विराट रूप दाखवून पूर्ण केली. भगवंतांनी हे विराट रूप फक्त अर्जुनालाच दाखविले आहे. त्याआधी कोणालाच ते पाहता आलेले नाही. वेद, पुराणे, वेदांगे, शास्त्रे यांचा अभ्यास करून, अनेक प्रकारचे यज्ञ करून, दानधर्म, वैदिक कर्मे, तपश्चर्या करून विराट रूप पाहता येत नाही. एक वेळ ब्रह्मपद मिळविणे सोपे आहे.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 49

भगव- गीता-अध्याय-11-श्लोक-49

               माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे हे शंख-चक्र- गदा-पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पाहा.

               अर्जुनाने भगवंतांचे विराट स्वरूप पाहिले आणि अर्जुन अत्यंत भयभीत झाला. त्याने भगवंतांना विनंती केली की, तुमचे महाभयंकर विराट स्वरूप पाहण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. मला अतिशय आनंद तर झाला आहेच, पण मनात भीतीचे काहूर माजले आहे. मला तुमचे चतुर्भुज स्वरूप दाखविण्याची कृपा करा. माझ्यावर प्रसन्न व्हा. माझ्यावर अनुग्रह करा. तेव्हा भगवंतांनी पसन्न मुद्रेने अर्जुनाची इच्छा पूर्ण करायचे ठरविले.

              भगवंत अर्जुनाला म्हणाले की, अर्जुना, माझे विराट स्वरूप पाहून तू मुळीच भयभीत होऊ नकोस आणि गोंधळूनही जाऊ नकोस. तू तुझ्या मनातील भीती सोडून दे. प्रीतियुक्त अंतःकरणाने, श्रद्धेने तू माझे चतुर्भुज रूप पाहा. अनन्य भक्ताला विराट रूपापेक्षा चतुर्भुज रूप पाहणेच आवडते. भक्ताला त्याचा भक्ती भाव आदरपूर्वक भगवंताला अर्पण करण्याची इच्छा असते. भगवंताचे चतुर्भुज रूप पाहून त्याचा भक्तीभाव द्विगुणीत होतो. भगवंतांनी अर्जुनाला चतुर्भुज रूप पुन्हा पाहण्यास सांगितले.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 50,51

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-50-51

                  संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखविले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना ! आपले हे अतिशय शांत मनुष्यरूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे.

                  भगवंतांचे विराट रूप पाहून अर्जुन क्षणैक आनंदला होता; पण पुन्हा ते भयानक रूप पाहून मनात खूप घाबरला होता, खचला होता. त्याला भगवंताचे चतुर्भुज रूप पाहायचे होते. ते नयनमनोहर चतुर्भुज रूप भगवंतांनी दाखविले. शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेले सगुण रूप पाहून अर्जुनाचे समाधान झाले. मग भगवंतांनी आपले पूर्वीचे मानव देहातील द्विभुज सौम्य शांत रूप धारण केले.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 52,53

भगवद-गीता-अध्याय-11-श्लोक-52-53

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस, ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात. तू जसे मला पाहिलेस, तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही.

भगवंतांनी प्रथम विश्वरूप दर्शनाचा लाभ अर्जुनाला दिला. आजपर्यंत भगवंतांनी कोणालाही विषरूप दर्शन दिले नव्हते. त्यानंतर भगवंतांनी अर्जुनाच्या विनंतीवरून चतुर्भुज दर्शन दिले. चतुर्भुज दर्शनाचा लाभसुद्धा अत्यंत दुर्मिळ असतो. वासुदेव-देवकीला भगवंतांनी असे चतुर्भुज दर्शन दिले होते. या चतुर्भुज दर्शनानंतर भगवंतांनी मानवरूपातील द्विभुज कृष्ण रूप धारण केले. आता अर्जुनाची मानसिक स्थिती स्थिर झाली. त्याची भीती नाहीशी झाली. त्याची करुणा नाहीशी झाली. देवदेवतांनासुद्धा चतुर्भुज दर्शनाचा लाभ क्वचितच मिळतो. वेद, तप, दान, यज्ञ यांच्या अभ्यासानेसुद्धा चतुर्भुज दर्शन मिळत नाही, इतके ते दुर्लभ आहे. अर्जुनाच्या अनन्य भक्तीमुळेच भगवंतांनी विश्वरूप व चतुर्भुज दर्शन दिले.

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 54,55

भगवद गीता अध्याय 11 श्लोक 54,55

                   परंतु हे परंतपा! अनन्य भक्तिने या प्रकारच्या चतुर्भुजरूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्त्वतः जाणणे तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे. हे पांडवा! जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्यकर्मे करणारा, मलाच परम आश्रय मानणारा, माझा भक्त आसक्तिरहित असतो आणि सर्व भूतमात्रांविषयी निर्वैर असतो, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो.

                 भगवंतांनी मागच्या श्लोकात वेद, दान, तप, यज्ञ या मार्गांनी चतुर्भुज दर्शन होणे शक्य नाही, असे सांगितले. अध्यायाचा शेवट करताना भगवंत केवळ अनन्य भक्तीनेच असे चतुर्भुज रूप भक्तांना प्रत्यक्ष पाहता येईल, असे सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर भगवंताला तत्त्वतः जाणणे, भगवंताशी एकरूप होणे, भगवंताच्या देहात प्रवेश करणे या गोष्टी सहज शक्य होतील, असे सांगितले आहे. कलियुगात अनन्य भक्तीने भगवंत लवकर प्राप्त होतो.

                   हे परमसत्य आहे. श्रीम्दगवद्गीता रूपी ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी विश्वरूप दर्शन योग हा अकरावा अध्याय समाप्त झाला.

Leave a Comment