भगवद गीता अध्याय 12 ( भक्तियोग ) bhagwat geeta adhyay 12 in marathi

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 1,2

भगवद-गीता-अध्याय-12-श्लोक-1-2

  भगवद गीता अध्याय 12 श्लोकआणि अर्थ

                    अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन, ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात.

               भक्त दोन प्रकारचे असतात. सगुण साकार भगवंताची नवविधा भक्ती करणारे व निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणारे. अर्जुनाचा प्रश्न असा आहे, दोन भक्तांमधील श्रेष्ठ भक्त कोणता? भगवंत म्हणतात, सगुण भक्ती करणारा श्रेष्ठ आहे.

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 3,4

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 3,4

  भगवद गीता अध्याय 12 श्लोकआणि अर्थ

                परंतु, जे पुरुष इंद्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी, सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात.

                 भगवंत म्हणतात की, सगुण साकार भक्ति कारणारे भक्त जरी श्रेष्ठ असले तरी इंद्रियदमन करून मन व बुद्धीच्या पलीकडे असाणाऱ्या निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणारे ज्ञानयोगी मलाच येऊन मिळतात. ध्यानयोग, ज्ञानयोग, कर्मयोग यापेक्षा भक्तियोग सर्वसामान्य संसारी माणसाला सोपा आहे व त्याचे फळही लवकर प्राप्त होते. म्हणून भगवंतांनी भक्तियोग श्रेष्ठ आहे, असे सांगितले आहे. इंद्रियदमन झाले की, चित्तशुद्धि होते. चित्तशद्धि झाली की विषयाला चिकटलेले मन मोकळे होते. मनाच्या मागे धावणारी बुद्धी मोकळी होते. अंतरात्म्यातील परमात्मा सर्वव्यापी असल्याची जाणीव होते. तशी अनुभूती आल्यावर ब्रह्मज्ञान होते.

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 5,6

भगवद-गीता-अध्याय-12-श्लोक-5-6

  भगवद गीता अध्याय 12 श्लोकआणि अर्थ

               सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत, कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते; परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात.

              ज्ञानयोगाचा मार्ग भगवंताकडे नेणारा असला तरी अत्यंत कठीण मार्ग आहे; कारण मी देह नाही ही कल्पनाच मनुष्याला सहन होत नाही. त्याचा देहाभिमान सुटत नाही. केवळ ध्यानाने किंवा कल्पनेने निराकार ब्रह्माची उपासना करण्यापेक्षा सगुण भगवंताची भक्ती करणे त्याला सोपे वाटते. प्रत्यक्ष मूर्तीची पूजा म्हणजे पुतळ्याची पूजा नव्हे, हे त्याला चांगले ठाऊक असते. तो भगवंताचे नाम घेईल. पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करेल.

          भजन, कीर्तन करेल. उठल्यापासून झोपेपर्यंत भगवंताचेच प्रत्यक्ष गुणगान गाईल. नवविधा भक्तीद्वारे भगवंताच्या प्राप्तीसाठी ध्यास धरेल. प्रपंच करता करता सर्वसामान्य माणसाला हे करता येण्यासारखे आहे. असे भक्त सर्व कर्मे भगवंताला अर्पण करतात.

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 7,8

भगवद-गीता-अध्याय-12-श्लोक-7-8

  भगवद गीता अध्याय 12 श्लोकआणि अर्थ

                हे पार्था! त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो. माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही.

               आईबाप आपल्या मुलाची काळजी घेतात, त्यामुळे ते मुल सुरक्षित असते. त्याप्रमाणे अनन्य भक्ती करून जर सर्व कर्मे भगवंताकडे सोपवली तर भगवंताला भक्ताची काळजी घ्यावीच लागते. एवढेच नव्हे, तर भगवंत त्या भक्ताची लगेच मृत्युरूप अशा संसारसागरातून सुटका करतो. त्याचा उद्धार करतो. त्याला मोक्ष प्राप्त करून देतो. आपल्याला काही आजार झाल्यास आपण वैद्याकडे जातो. तो सांगेल तशी पथ्ये पाळतो, तो देईल ती औषधे घेतो. तो आपला आजार बरा करणार असा विश्वास ठेवतो.

              मग आपली सर्व जबाबदारी वैद्य घेतो व आपला आजार बारा होतो. त्याप्रमाणे आपण अनन्य भक्तीने भगवंताची सेवा केली की, तो आपला इध्दार करतो. आपण अनन्य भक्ती केली पाहिजे. भगवंतापाशी तन, मन, चित्त, बुद्धी, अंतःकरण लावले पाहिजे. त्याच्यावर प्रेम केले पाहिजे. निष्काम कर्म केले पाहिजे.

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 9,10

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 9,10

  भगवद गीता अध्याय 12 श्लोकआणि अर्थ

             जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया! अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरिता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील.

             भगवंत म्हणतात की, जर ज्ञानप्राप्ती करून, इंद्रिय विजय करून, चित्तशद्धी करून, अविनाशी निर्गुण निराकार सर्वव्यापी ब्रह्माची उपासना करता येत नसेल आणि मन माझ्या ठिकाणी निश्चल ठेवता येत नसेल तर कर्म मार्गाचा अवलंब करून भगवंत प्राप्त करता येतो; पण त्यासाठी सत्कर्म हवे. निष्काम कर्म हवे. सर्व कर्मे भगवंतासाठीच करून ती सर्व कर्मे भगवंताला अर्पण करायची तयारी हवी. या निष्काम कर्मयोगाची सर्व माहिती भगवंतांनी

                आपणास यापूर्वी सांगितलीच आहे. भक्तीयोगामध्येसुद्धा कर्माला खूप महत्त्व आहे. पूजा-अर्चा, भजन-कीर्तन, श्रवण-मनन, स्मरण-चिंतन करताना जी सत्कर्मे केली जातात, त्याने भगवंतप्राप्ती होते. भगवंतांनी साधनापेक्षा साध्य श्रेष्ठ आहे, असे सांगितले आहे.

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 11,12

भगवद-गीता-अध्याय-12-श्लोक-11-12

  भगवद गीता अध्याय 12 श्लोकआणि अर्थ

                   जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे; कारण त्यागाने ताबडतोब परमशांती मिळते.

                 ब्रह्म प्राप्तीसाठी भगवंतांनी मुख्यत्वे चार साधन प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग व भक्तियोग. ज्ञानयोग अत्युत्तम असला तरी आचरणास अत्यंत कठीण आहे. ध्यानयोग संसारी माणसाला आचरणे अवघड वाटते. ज्यांना ज्ञानयोग व ध्यानयोग अवघड वाटतो, त्यांना कर्मयोग चांगला आहे; पण त्यातसुद्धा सकाम कर्मापेक्षा निष्काम कर्म अतिशय उत्तम समजले जाते. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान व ध्यानापेक्षा सर्व कर्म फलत्याग श्रेष्ठ आहे; कारण त्यागाने लवकर शांती प्राप्त होते. म्हणून मन व बुद्धी यावर प्रथम विजय मिळवावा. मग सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करावा. मगच ब्रह्म प्राप्त होते.

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 13,14

भगवद-गीता-अध्याय-12-श्लोक-13-14

                  जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चात्तापानंतर) अभय देणारा असतो. जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे, भगवंताला जो भक्त प्रिय आहे. अशा सद्भक्ताची लक्षणे भगवंतांनी सांगितली आहेत.

               १) प्राणीमात्रांचा द्वेष न करणारा, २) निःस्वार्थी, ३) सर्वांवर प्रेम करणारा, ४) दयावान ५) अहंभाव नसलेला ६) अहंकार नसलेला ७) सुख-दुःखात समभाव असणारा ७) क्षमावान ८) समाधानी व आनंदी ९) जितेंद्रिय १०) मनोजयी ११) शरीर ताब्यात ठेवणारा १२) श्रद्धावान १३) मन व बुद्धी ईश्वरार्पण करणारा असे अनेक गुण भक्तापाशी असतात. खरा भक्त नेहमी संत सज्जनांच्या व सद्‌गुरूंच्या सान्निध्यात असतो. त्याच्या मनात रात्रंदिवस भगवंत प्रेमाचा विचार सुरू असतो व भगवंत भेटीची इच्छा असते. रात्रंदिवस भगवंताशिवाय त्याला काही सुचत नाही.

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 15,16

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 15,16

               ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे.

                भगवंतांनी या ठिकाणी भक्तांचे आणखी काही गुणवर्णन केले आहे. भक्त कोणालाही आपणहून त्रास देत नाही. एवढेच नाही, तर कोणी त्रास दिला तरी त्याचा त्रास भक्ताला होत नाही. भक्त हा परिसासारखा असतो. त्याचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्या लोखंडाचे सोने बनते आणि लोखंडाचा मार जरी परिसाला बसला तरी लोखंडाचे सोनेच होते. परिस तो परिसच राहतो; पण लोखंडाचे मात्र सोने बनते. भक्तावर हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग यापैकी कशाचाच परिणाम होत नाही.

              भक्त नेहमी अंतर्बाह्य शुद्ध असतो. चतुर, तटस्थ, व दुःखमुक्त असतो. केलेल्या कर्तृत्वाचा अभिमान तो कधीही बाळगत नाही. त्यामुळे असा भक्त समाजातील सर्व लोकांना आवडतो. जो सर्वांना आवडतो तो देवाला का नाही आवडणार?

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 17,18

भगवद-गीता-अध्याय-12-श्लो-17-18

               जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते.

                   भगवंत आपल्या भक्ताचे गुणवर्णन करीत आहेत. भक्त कधीही कोणाचा द्वेष करीत नाही. कोणाबद्दल शोक करीत नाही. हवी ती वस्तू मिळाली तरी भक्त हर्ष किंवा दुःख व्यक्त करीत नाही. कशाचीही आसक्ती धरीत नाही. भक्त नेहमी शुभ किंवा अशुभ अशा सर्व कर्मांचा त्याग करतो. तो निरंतर भगवंताची भक्तीच करीत असतो. भक्त नेहमी द्वंद्वातीत असतो. म्हणजेच शत्रू-मित्र, मान-अपमान, सुख- दुःख, थंडी-ऊन याविषयी समभाव बाळगतो. असा भक्त भगवंताला अतिशय प्रिय असतो. आई जशी आपल्या मुलावर निरपेक्ष प्रेम करते तसा भगवंतदेखील आपल्या भक्तावर नितांत प्रेम करीत असतो. भक्ताला जन्म-मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढतो.

भगवद गीता अध्याय 12 श्लोक 19,20

भगवद-गीता-अध्याय-12-श्लोक-19-20

                 ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो; परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत.

                या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला भक्तियोगाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. इतर साधनांपेक्षा भक्ती मार्ग सोपा कसा आहे हेही सांगितले. शिवाय सद्भक्तांची लक्षणेही सांगितली आहेत. तसेच सत्संगती व गुरू सान्निध्य लाभले की, कोणते चांगले गुण अंगी बाणतात हेही सांगितले. भगवंतावर नितांत श्रद्धा असावी. अनन्य भक्ती असावी. निष्काम कर्म असावे. कर्म भगवंताला अर्पण करावे. हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी भक्तियोग हा बारावा अध्याय समाप्त झाला.

Leave a Comment