भगवद गीता अध्याय 3
कर्मयोग
भगवद गीता अध्याय 2 श्लोक 1,2,3
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
Table of Contents
Toggleअर्जुन म्हणाला, हे जनार्दना! जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तूर मग हे केशवा! मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की, ज्यामुळे माझे कल्याण होईल. श्री भगवान म्हणाले, हे निष्पापा! या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते.
दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांख्ययोग म्हणजेच आत्मा व प्रकृती यांच्या स्वरूपाचे पृथ्यकरणात्मक ज्ञान सांगितले आहे. या अध्यायात ते कर्मयोग अधिक विस्तृतपणे सांगत आहेत. स्थिर बुद्धीने निष्काम कर्म केले तर मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 4,5,6
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्मांचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. जो मूर्ख सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो.
क्रियाशील असणे हा जीवात्म्याचा स्वभाव आहे. आत्म्याशिवाय शरीर हालचाल करू शकत नाही. मुळात आत्मा शुद्ध असतो; पण शरीर संपर्कामुळे अशुद्ध होतो. ईश्वर चिंतनाने तो शुद्ध होतो. म्हणून ईश्वरकर्ता समजून, फलाशा सोडून निष्काम कर्म करावे. निष्काम कर्म म्हणजे निष्क्रियता नव्हे. कर्म म्हणजेच कर्तव्य होय.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 7,8,9
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
परंतु, हे अर्जुना! जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय) तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर; कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना! तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर.
शरीर निर्वाहासाठी माणसाला कर्म करावे लागते. शरीरधर्म पालनासाठी कर्म करावे लागते. जी शास्त्रविहित कर्मे आहेत, ती कर्मे केल्याने भगवंत संतुष्ट होतो, त्याला यज्ञकर्म म्हणतात. नेमून दिलेले कर्म करणे म्हणजेच यज्ञकर्म होय. अन्नदान हेदेखील यज्ञकर्मच आहे. अशा कर्माने चित्तशुद्धी होते. अर्जुन हा क्षत्रिय व गृहस्थाश्रमी होता. युद्ध करणे हे त्याचे धर्माचरण होते.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 10,11,12
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच उपभोगतो, तो चोरच आहे.
वेदात ईश्वराचे व ईश्वरसेवेचे वर्णन केले आहे. सजीवांची उत्पत्ती झाली तेव्हा ईश्वराने पाणी, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी या गोष्टी सजीवांना बहाल केल्या. या मनुष्याने तयार केल्या नाहीत.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 13,14,15
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतात; पण जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीरपोषणासाठी अन्न शिजवितात, ते तर पापच खातात. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो.
ईश्वर भक्तांना संत म्हणतात. ते नवविधा भक्ती करतात. या नऊ यज्ञापैकी कोणताही यज्ञ म्हणजेच भक्ती ईश्वराला मान्य आहे. ज्या देवतांनी आपल्या रक्षणाची हमी घेतली त्यांना भजणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आपण देवाला नैवेद्य दाखवतो. भगवंत भावाचा भुकेला आहे. भक्तीचा भुकेला आहे.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 16,17
हे पार्था! जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारे भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो; परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही.
शास्त्रसंमत नसलेल्या कर्माला विकर्म म्हणतात. त्यालाच पापकर्म असेही म्हणतात. वेदातील आदेश भगवंताच्या निःश्वासातून तयार झाले आहेत. म्हणून वेदाज्ञा कर्मबंधनातून मुक्त करते व मोक्षाचा मार्ग खुला करते. भगवंताचे स्मरण आपणास भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग यापैकी कोणत्याही प्रकारे करता येते.
जे इंद्रियांच्या तृप्तीत रत झाले आहेत, त्यांना यज्ञकर्माचे आचरण करून शुद्ध व्हावे लागते. चित्तशुद्धी झाल्याखेरीज मोक्षप्राप्ती होत नाही. जो पापकर्माचरण करतो, त्याचे जीवन व्यर्थच होय; पण जो आत्म्यामध्ये रममाण होतो, सतत आत्मानंदात राहतो, त्याला वेगळे असे कर्मच करावे लागत नाही. तो कर्मबंधनातून मुक्त होतो.
.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 18,19
त्या महामनुष्याला या विश्वात कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्यकर्म नीट करीत राहा; कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो.
अर्जुनाने कुरुक्षेत्रावर युद्ध करावे अशी भगवंताची इच्छा आहे. त्यामुळे भगवंतासाठी केलेले युद्ध हे पुण्यकर्म होणार होते. शिवाय ते क्षात्रधर्माला अनुसरून केलेले कर्म होते. त्यात फलाशा नव्हती. मरण आले असते तरी स्वर्गप्राप्ती झाली असती व विजय मिळाला तरी राज्यप्राप्ती होणार होती. म्हणून फळाची आसक्ती सोडून कर्तव्यकर्म नीट करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो.
म्हणजेच मोक्षप्राप्ती करतो, असे भगवंतांना येथे सुचवायचे आहे. असे कर्म करायला वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. फक्त मनाची तयारी हवी. तळमळ हवी. शरणागती हवी. प्रत्येक कर्म ईश्वरासाठीच करावे
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 20,21
जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनदेखील तू कर्म करणेच योग्य आहे. श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो.
सध्याच्या बिहार राज्यातील मिथिला नगरीचा राजा जनक हा सीतेचा पिता व श्रीरामाचा श्वशुर होता. अत्यंत नीतिमान व धर्म परायण म्हणून त्याची ख्याती होती. यथा राजा तथा प्रजा. प्रजाही अत्यंत नीतिनियमांचे पालन करणारी होती. गुरूंचा आदर्श जसा शिष्यापुढे असावा लागतो, त्याचप्रमाणे राजाचा आदर्श प्रजेपुढे असावा लागतो. दुर्योधन हा अतिशय क्रूर व दुष्ट बुद्धीचा होता.
स्वतः श्रीकृष्णांनी शिष्टाई करूनसुद्धा पांडवांना राज्य देण्यास तयार झाला नाही. उलट त्याने युद्धाची भाषा सुरू केली. म्हणून अर्जुनाने विषाद सोडून देऊन युद्ध करावे व प्रजेला चांगला राजा मिळवून द्यावा, असे भगवंतांना वाटत होते. त्यामुळे सर्व जण सुखी होणार होते. अर्जुनाच्या सर्व शंकांचे निरसन करून भगवंत त्याला कर्मयोग सांगत आहेत. आसक्तिरहित कर्माने परमसिद्धी प्राप्त होते असे ते सांगत आहेत.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 22,23
हे पार्था! मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्यकर्म करीतच असतो, कारण हे पार्था! जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात.
शिक्षकांचा आदर्श विद्यार्थी घेतात. सद्गुरूंचा आदर्श शिष्य घेतात. आई- वडिलांचा आदर्श मुले घेतात. संतांचा आदर्श भक्त घेतात. राजाचा आदर्श प्रजा घेते, तसे ईश्वराचा आदर्श सर्व समाजापुढे असतो व त्यामुळे मनुष्य ईश्वराच्या मार्गाचे अनुकरण करतात. भगवंत सर्व सृष्टीचा नियंता आहे. त्याच्याहून कोणीही श्रेष्ठ नाही. तो पूजनीय आहे. त्याला काहीच कर्तव्यकर्मे करायची नाहीत. तरीसुद्धा पीडितांना साहाय्य करण्यासाठी ते कुरुक्षेत्रावर युद्धावेळी अर्जुनाचे सारथ्य करीत आहेत; कारण तेही एक कर्तव्यकर्मच आहे. ते नाही केले तर मात्र मोठे नुकसान होईल, असे भगवंतांना वाटते.
ईश्वर जर विहित कर्म करीत असेल तर मनुष्यानेदेखील तसे अनुकरण केले पाहिजे. भगवंताला आवडणारे कर्म केले तर मोक्ष मिळतो. अंतःकाळी जशी मती तशी गती प्राप्त होते, असे म्हणतात.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 24,25
म्हणून जर मी कर्मे केली नाहीत, तर ही सर्व माणसे नष्ट-भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन. हे भारता! कर्मांत आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात, त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत.
भगवंत सर्व जीवांचे जनक आहेत. जर या जीवांना चुकीचे मार्गदर्शन केले, तर त्याची जबाबदारी प्रत्यक्ष भगवंतांवर येते म्हणून जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, लोक अधर्माने वागू लागतात, तेव्हा भगवंतांना अवतार घ्यावा लागतो. श्रीकृष्णाला अवतार त्यामुळेच घ्यावा लागला आहे. वर्णसंकर समाजाला अत्यंत घातक असतो. त्यामुळे समाजाची शांती भंग पावते. आध्यात्मिक अधोगती होते. व समाज भ्रष्ट होतो.
आपणास भगवंताचे अनुकरण जरी करता आले नाही, तरी भगवंताच्या उपदेशाचे पालन नक्कीच करता येईल आणि भगवंतांचीदेखील तेवढीच अपेक्षा आहे. आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म कोणतीही फलाशा न ठेवता करीत जावे व मिळेल तो प्रसाद आनंदाने ग्रहण करावा. हे यज्ञकर्म भगवंताला आवडते व तो आपणास मोक्ष बहाल करतो. हे जनक राजाचे उत्तम उदाहरण आहे.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 26,27
परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविहित कर्मांत आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तमप्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत. वास्तविक सर्व कर्मे सर्वप्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे, असा अज्ञानी मनुष्य मी कर्ता आहे, असे मानतो.
अज्ञानी लोक विषयासक्त असतात. ते स्वतःला मी कर्ता आहे, असे मानतात. कर्मात त्यांची आसक्ती असते. अहंकारामुळे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झालेली असते. अशा अज्ञानी लोकांना उपदेशाचे डोस उपयोगी पडत नाहीत. अशा लोकांना ज्ञानी लोकांनी स्वतः शास्त्रविहित कर्मे उत्तमप्रकारे पार पाडून ती अज्ञानी लोकांकडून करून घ्यावीत.
अनुकरणाचा व संस्काराचा आदर्श फार महत्त्वाचा असतो. संतसंगतीचा परिणाम संकीर्तनापेक्षा महत्त्वाचा असतो. निष्काम कर्माचे बीज ज्या समाजात रुजते, ती संस्कृती श्रेष्ठ समजली जाते. म्हणूनच भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोगाचे महत्त्व विशद करून सांगितले आहे.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 28,29
पण, हे महाबाहो! गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये.
हे शरीर म्हणजे प्रकृतीची देणगी आहे, असे जो मानतो त्याला मंद म्हणतात. हे शरीर म्हणजेच आत्मा आहे, असे जो मानतो व ज्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा अभाव आहे त्याला आळशी म्हणतात. ज्यांना परमेश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान नाही त्यांना अज्ञानी म्हणतात. सर्व समजून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला मूढ असे म्हणतात.
अशी माणसे गुणात व कर्मात आसक्त होतात. अशा लोकांचा ज्ञानी लोकांनी बुद्धिभेद करू नये. नाही तर ते लोक आणखीनच अधोगतीला जातील व समाजव्यवस्था बिघडून जाईल. ज्ञानी लोकांनी निष्काम कर्माद्वारे समाजाला आदर्श घालून द्यावा. अनुकरणाने समाज सुधारतो.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 30,31
अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर. जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात.
वरील श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला आसक्ती, ममता, मोह व क्रोध सोडून देऊन सर्व कर्मे मला अर्पण कर, असे सांगितले आहे. हे करीत असताना आत्मा व परमात्मा यात चित्त गुंतलेले हवे, असेही सांगितले आहे. याचा अर्थ असा की, अर्जुनाने युद्ध केले तरी त्या कर्माचा दोष त्याला लागणार नाही.
उलट ते निष्काम कर्म होऊन त्याला मोक्षप्राप्ती होईल. भगवंत म्हणतात की, माझ्या उपदेशांचे श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे पालन करतात त्यांची सर्व कर्मबंधनातून सुटका होते. आपल्या पालकांवर, मालकांवर, गुरूंवर, ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. भक्तीने श्रद्धा वाढते.
शरणागतीने सर्व कर्मे ईश्वरार्पण होतात व अहंकार नाहीसा होतो. या सृष्टीतील कोणत्याही वस्तूवर माझ्या एकट्याचा अधिकार नाही कारण ती वस्तू ईश्वराने निर्माण केली आहे, अशी एकदा भावना झाली की, विहित कर्मे करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 32,33
परंतु, जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मूर्खाना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांत कोणाचाही हट्टीपणा काय करील?
भगवंताच्या आज्ञेचे पालन केले नाही तर तो मनुष्य शिक्षेस पात्र होतो, यात शंकाच नाही. भगवंत म्हणतात की, जे लोक माझ्यावर दोषारोप करतात, माझ्या उपदेशांचे पालन करीत नाहीत, ते हृदयशून्य असतात, अज्ञानी असतात, अश्रद्ध असतात. प्रत्येक सजीव आपल्या स्वभावानुसार कर्म करीत असतो. अशावेळी हट्टीपणा उपयोगी पडत नाही. असेल त्या परिस्थितीत राहून, संत्संगतीने, पूर्ण श्रद्धेने निष्काम कर्म करीत गेल्यास मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो व सद्गतीला जातो.
भगवंतालासुद्धा विहित कर्म सुटलेले नाही. अर्जुनाचे सारथ्य भक्ताच्या व सख्याच्या प्रेमासाठी करावे लागले. केवढा मोठा आदर्श त्यांनी घालून दिला ! हजारो वर्षे झाली तरी तो आदर्श आपली प्रेरणा बनली आहे.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 34,35
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे; पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे.
प्रत्येक इंद्रियाचे विषय वेगवेगळे असतात. मायेच्या प्रभावामुळे अज्ञानी मनुष्य विषयभोगात अडकतात कोणी धनलोभात अडकतात, तर कोणी स्त्रीमोहात गुरफटतात. कोणी जुगारात, कोणी मदिरेत, तर कोणी ऐषोरामात बुडून जातात. अशा विषयात राग आणि लोभ लपलेले असतात. ते उफाळून वर येतात. त्यामुळे मानवी जीवनाचे अत्यंत नुकसान होते.
अर्जुन क्षत्रिय होता. त्याने क्षात्रधर्माचे पालन करून युद्धास तयार व्हावे. इतर धर्माचरण करू नये. गुणातीत झाल्यानंतर आत्मज्ञानी द्वंद्वातीत होतो. विश्वामित्र मूळचे क्षत्रिय; पण नंतर ब्राह्मणासारखे कर्म करू लागले, तर परशुराम ब्राह्मण होते तरी ते क्षत्रियासारखे कर्म करू लागले; पण सामान्य माणसाने मात्र मृत्यू आला तरीही दुसऱ्याचा धर्म स्वीकारू नये.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 36,37
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा ! तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो? श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, असे तू जाण.
जीवात्मा हा परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे तो जन्माला आल्यावर शुद्ध असतो. सात्त्विक असतो; पण नंतर कामाच्या प्रभावाने तो रजोगुणी किंवा तमोगुणी होतो. म्हणून अर्जुनाने फार छान प्रश्न विचारला आहे. तो म्हणतो की, हे भगवंता! मनुष्य इच्छा नसताना कोणांच्या प्रेरणेने पापाचरण करतो? तेव्हा भगवंत म्हणतात की, रजोगुणापासून काम निर्माण होते. त्यातूनच क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे विषयाची निवृत्ती कधी होतच नाही.
काम आणि क्रोध यांना जर भगवचिंतनात वळविले तर मात्र ते आपले मित्र होतात. श्री हनुमंताने काम-क्रोध रामभक्तीकडे वळविले आहेत.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 38,39
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. आणि हे अर्जुना ! कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे.
कामामुळे ज्ञान झाकले जाते हे दाखविण्यासाठी भगवंतांनी सामान्य प्रापंचिक माणसाच्या नेहमीच्या व्यवहारातील तीन उदाहरणे दिली आहेत. ते म्हणतात की, धुराने अग्नी, धुळीने आरसा, वारेने गर्भ झाकला जातो. सर्व क्रियांचा केंद्रबिंदू काम हाच असतो. जेव्हा मनुष्य इंद्रियसुखाचा भोग घेतो तेव्हा तो तृप्त होत नाही. त्यामुळे तो वारंवार त्यात अडकत जातो व क्रोध उत्पन्न झाल्याने पापाचरण करीत राहतो.
ज्ञानी मनुष्याचे ज्ञानदेखील कामामुळे झाकले जाते. त्याचे अधःपतन होते. श्री हनुमंताचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून आपले काम व क्रोध ईश्वरभक्तीकडे वाळवावेत म्हणजे त्यांना योग्य दिशा मिळून त्यांची तीव्रता कमी होईल व मन आत्मज्ञानाकडे वळेल. कामाची शक्ती अफाट असल्यामुळे इच्छा नसतानाही मनुष्य तिकडे ओढला जातो. त्याला ताब्यात ठेवण्यासाठी चिकाटी लागते, कष्ट सोसावे लागतात, तरच त्या शत्रूचे परिवर्तन मित्रत्वात होते.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 40,41
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाचे निवासस्थान म्हटली जातात. हे काम या मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारे ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करते. म्हणून हे अर्जुना! तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक.
मन, बुद्धी व इंद्रिये यांना मोहित करून त्यांना आपलेसे करणारा काम हा माणसाचा मोठा शत्रू आहे. काम या तिन्ही ठिकाणी घर करून राहतो. व नंतर निघता निघत नाही. अशा पापमय कामाला मारून टाकायचे असेल तर प्रथम इंद्रिये त्याच्या ताब्यातून सोडवून घेतली पाहिजेत. आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे आकलन होणे म्हणजे ज्ञान होय आणि प्रकृतीविषयी अधिक ज्ञान होणे म्हणजे विज्ञान होय. कामरूपी शत्रू हा ज्ञान व विज्ञानाचा नाश करतो.
जीवात्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अतिशय गुह्य व रहस्यमय आहे. सर्व जीव भगवंताचे अंश आहेत. भगवंताला जाणून घेणे हे आपले परमकर्तव्य आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला इंद्रियजय करण्यास सांगत आहेत. आत्मज्ञानाच्या अभ्यासातील महत्त्वाचा अडथळा म्हणजे काम व क्रोध हे होत. मनाने व बुद्धीने इंद्रियांना भगवंताकडे वळवावे व भगवद्भक्ती करावी.
भगवद गीता अध्याय 3 श्लोक 42,43
भगवद गीता अध्याय 3 श्लोकआणि अर्थ
इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियांहून मन पर आहे. मनाहून बुद्धी पर आहे. आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे, तो आत्मा होय. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक.
आता प्रश्न असा आहे की, कामाला मारायचे कसे? कारण तो तर बलाढ्य आहे. भगवंत म्हणतात की, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. असा हा आत्मा सर्वाहून श्रेष्ठ, बलवान व सूक्ष्म आहे, हे आपण ओळखले पाहिजे. प्रथम बुद्धीने मनाला ताब्यात घ्यायचे. एकदा मन ताब्यात आले की, मग इंद्रियांना जिंकायचे. इंद्रिये ताब्यात आली की, काम व क्रोध जिंकायला फार अवघड जाणार नाही, हे अर्जुनाला भगवंत समजावून सांगत आहेत. आपणास केवढा मोठा संदेश दिला आहे!
हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी कर्मयोग नावाचा हा तिसरा अध्याय समाप्त झाला
.