भगवद गीता अध्याय 6 (आत्मसंयमयोग ) bhagwat geeta adhyay 6

भगवद गीता अध्याय 6

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 1,2

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-1-2

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

Table of Contents

           भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म कस्तो, तो संन्यासी व योगी होय. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. हे अर्जुना! ज्याला संन्यास असे म्हणतात, तोच योग आहे, असे तू समज; कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही.

              या श्लोकांत भगवंतांनी संन्यासी व योगी यांची व्याख्या सांगितली आहे. संन्यासी हा कर्मफलाची अपेक्षा करीत नाही; पण ज्याला उगाचच असे वाटते की, मी आता लौकिक कर्तव्यापासून मुक्त झालो. म्हणून जो यज्ञ, होमहवन, अग्नी यांचा त्याग करतो. त्याला संन्यासी म्हणत नाहीत. योगीसुद्धा कर्मफलाची अपेक्षा करीत नाही; पण ज्याला उगाचच असे वाटते की, मला आता काही कर्म करायचे राहिले नाही. म्हणून जो क्रियांचा त्याग करतो व संकल्पांचा त्याग करीत नाही, त्याला योगी म्हणत नाहीत. ज्याला संन्यास म्हणतात तोच खऱ्या अर्थाने योग होय.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 2,4

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-2-4

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ    

            योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो, तोच कल्याणाला कारण सांगितला आहे. ज्यावेळी इंद्रियांच्या भोगांत आणि कर्मातही पुरुष आसक्त होत नाही, त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते.

           या अध्यायात भगवंतांनी मन व इंद्रिये वश करण्याचे साधन म्हणून अष्टांगयोग सांगितला आहे. आता असा योग करणारा योगी कसा असावा हे सांगताना भगवंत म्हणतात की, तो निष्काम कर्म करणारा असावा. तेथे सर्व संकल्पांचा अभाव असावा. तो कर्म आणि भोग यात अनासक्त असावा. ज्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग होतो, त्यावेळी त्याला योगी असे म्हणतात. ज्ञानयोग, ध्यानयोग व भक्तियोग यापैकी कोणत्याही मार्गाने आपणास भगवंतापर्यंत पोहोचता येते.

               ज्ञानयोगापेक्षा ध्यानयोग सोपा आहे. ध्यानयोगामध्ये मन व इंद्रिये यावर ताबा मिळविणे अत्यंत महत्त्वाचे असते. यम या अवस्थेपासून समाधी या अवस्थेपर्यंत जाता येते व ब्रह्मप्राप्ती होते.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 5,6

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-5-6

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

             स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले, त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही, त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो.

             अष्टांगयोगात मनाला केंद्रस्थानी घेऊन मनोनिग्रह व मनाला विषयापासून दूर खेचले जाते. मन व इंद्रियांसह शरीर जिंकणारा जीवात्मा हा स्वतःचा मित्र, सखा, गुरू, राजा असतो; पण जर त्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले नाही तर मात्र तो स्वतःचाच शत्रू बनतो. योग्याने स्वतःला अधोगतीला जाऊ न देता या अथांग संसार समुद्रातून स्वतःचा उद्धार करून घ्यावा. मन जिंकले की मग काम, क्रोध, लोभ, मोह या विकारांना दूर करून भगवंताला जवळ करता येते.

             मनोनिग्रह करता येण्यासाठी योगाभ्यासाला फार महत्त्व आहे. स्वतःवर विजय मिळविणे हेच योगाचे प्रमुख कार्य आहे. स्वतःवर विजय मिळवला की, मग शरीरातील षड्रिपुंवर विजय मिळालाच म्हणून समजा. एवढे महत्त्व योगाभ्यासाला आहे.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 7,8

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-7-8

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

             थंड-उष्ण, सुख-दुःख इत्यादी तसेच मान-अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंदघन परमात्मा उत्तमप्रकारे अधिष्ठित असतो, म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.

             मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश पाळावा लागतो. मनाला एकदा वश केले की, मग त्या मनाला भगवंताच्या आज्ञांचे पालन करण्यास भाग पाडणे सोपे जाते. मन स्वाधीन झाले की, मग बुद्धी व आत्मा ताब्यात येतात. हे सर्व योगधारणेने शक्य होते. मग अशा योग्याला थंड-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान हे समान वाटतात. त्यांची वृत्ती शांत असते. अशा पुरुषाच्या मनात परमात्मा अधिष्ठित असतो. त्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त भरलेले असते. तो पूर्णपणे निर्विकार असतो. त्याने सर्व इंद्रिये जिंकलेली असतात.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 9,10

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-9-10

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

            सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे.

             जो सुख-दुःख, थंड-उष्ण, मान-अपमान, दगड-माती, चांदी-सोने, शत्रू- मित्र, सज्जन-पापी, सुहृद-बांधव, उदासीन मध्यस्त या सर्वांविषयी समभाव ठेवतो, जो मन व इंद्रिये यासह शरीर ताब्यात ठेवतो, जो असंग्रही आहे, जो निरीच्छ आहे, अशा योगसाधकाने एकट्यानेच एकांतात बसावे. ध्यान व समाधीच्या योगाने आत्म्याला परमात्म्यात लावावे.

               भगवंताच्या ठिकाणी असलेल्या चित्ताच्या एकाग्रतेला समाधी, असे म्हणतात. चित्ताची एकाग्रता नेहमी एकांतातच होते. म्हणून पूर्वीचे ऋषी-मुनी वनात तपश्चर्येसाठी जात असत. एकांतात बाह्य विषयाला चिकटलेले मन अंतरात्म्यात जात नाही. ते एकाग्र होत नाही. आपल्या घरात पहाटेची वेळ अशा साधनेला फार चांगली असते. झोप झाल्यामुळे झोप येत नाही. मन प्रसन्न असते. ते लवकर एकाग्र होऊ

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 11,12

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-11-12

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

             शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजिन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व जे फार सखल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.

              यम आणि नियमांनी युक्त असलेला योगी जेव्हा योगाभ्यास करू लागतो. त्यावेळी तो जे आसन वापरतो तेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. कोणत्याही अभ्यासाची बैठक व्यवस्थित हवी. ज्या जमिनीवर योगाभ्यास करावयाचा ती जमीन प्रथम शुद्ध करून घ्यावी. गोमूत्र किंवा गोमय याने ती सारवलेली असावी. ती सपाट असावी. म्हणजे फार उंच नको किंवा उतरती, चढाची किंवा खोलगट नसावी. अशा जमिनीवर प्रथम दर्भ अंथरावेत. त्या दर्भावर मृगाजिन अंथरावे.

              हल्ली मृगाजिन मिळत नाही. अशावेळी मऊ जाड आसन घालावे. त्यावर मऊ पातळ वस्त्र घालावे. वस्त्रावर वज्रासनात किंवा पद्मासनात शांत चित्ताने बसावे. मन एकाग्र करावे. चित्त व इंद्रिये ताब्यात ठेवावीत. हळूहळू अंतःकरण शुद्ध होत जाईल. आत्मसाक्षात्कार होऊ लागेल. अत्यंत सुखाचा अनुभव येऊ लागेल.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 13,14

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-13-14

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

           शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे.

              ब्रह्मचर्याशिवाय कोणताही योगाभ्यास शक्य नाही असे म्हणतात. म्हणूनच पूर्वी वयाच्या पाचव्या वर्षी मुलाला गुरुगृही ठेवत असत. गुरू त्यांना ब्रह्मचर्याचे कडक पालन करावयास लावत. हल्ली हे शक्य होत नाही. गृहस्थाश्रमाचे शास्त्रशुद्ध पालन केले तरी त्यास ब्रह्मचारी असे म्हणतात. ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग यात म्हणूनच ब्रह्मचर्य पालनास महत्त्व आहे.

          योगाभ्यास करताना बैठक कशी असावी हे सांगताना भगवंत म्हणतात की, शरीर, डोके व मान सरळ रेषेत ठेवावी. वज्रासनात किंवा पद्मासनात स्थिर बसावे. दृष्टी नाकाच्या अग्रावर स्थिर करावी. डोळे बंदही करू नयेत किंवा उघडेही ठेवू नयेत. ते अर्धोन्मीलित असावेत. अंतःकरण शांत असावे. मन आवरलेले असावे. इंद्रिये ताब्यात असावीत. चित्त शांत करून माझे स्मरण करावे. सतत माझ्या आश्रयाने राहावे.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 15,16

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-15-16

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

              मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्टा अशी शांती मिळवतो. हे अर्जुना ! हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही.

            हा योगाभ्यास करताना कोणकोणती पथ्ये पाळावीत हे सांगताना भगवंत म्हणतात की, योगाभ्यास करणाऱ्या योग्याने प्रथम मन ताब्यात ठेवण्याचा अभ्यास करावा. चित्त नेहमी परमेश्वराच्या स्वरूपाशी लावावे. उपाशी राहू नये किंवा अति खाऊ नये. फार झोपू नये किंवा फार जागरण करू नये. भगवंताजवळ परमानंदाची पराकाष्टा अशी शांती असते. ही शांती योग्याला योगसाधनेने प्राप्त करून घेता येते.

           योगसाधनेचे हेच तर खरे प्रमुख उद्दिष्ट असते. म्हणून अष्टांग योगातील आठही अंगांच्या प्रत्येक अंगाचे काळजीपूर्वक व योग्य मार्गदर्शनाखाली अध्ययन करावे. त्याचा रोज सराव करावा. व तो योग लीलया आत्मसात करावा. हा योग करण्यास फार अवघड नाही. तो ज्ञानयोगापेक्षा सोपा आहे; पण तो करण्यासाठी मनाचा निर्धार पाहिजे. चिकाटी पाहिजे. निष्ठा पाहिजे.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 17,18

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-17-18

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

              दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये वथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जागरण करणाऱ्याला साध्य होतो. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते, तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो.

              योग्याला योग साध्य केव्हा होतो हे सांगताना भगवंत म्हणतात की, ज्याचा आहार संयमित आहे, जो निष्काम भावनेने कर्म करतो. जो सदाचाराने व्यवहार करतो. ज्याची झोप किंवा विश्रांती पुरेशी असते, जो अति जागरण करीत नाही, जो जास्त झोप घेत नाही. जो अति खादाड नाही, जो भुकेने व्याकूळ नसतो, ज्याचे चित्त ताब्यात आहे, ज्याचे चित्त परमात्म्यात पूर्णपणे स्थिर आहे, ज्याची विषयासक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे, अशा पुरुषाला हा योग साध्य झाला असे समजावे; कारण हा योग दुःखांचा नाश करणारा आहे.

           मनुष्याच्या चार मुख्य गरजा असतात. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. त्यांचा अतिरेक झाला की, योगाभ्यासात अडथळा निर्माण होतो. म्हणून या चारही गोष्टी संयमित असाव्यात.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 19

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-19

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

              ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे.निवारा म्हणजे ज्या ठिकाणी वाऱ्याचा त्रास नाही अशी जागा, अशा ठिकाणी जर दिव्याची ज्योत तेवत ठेवली तर ती हालत नाही. ती शांतपणे जळत राहते. त्याप्रमाणेजर योग्याने आपले चित्त जिंकलेले असेल तर ते जिंकलेले चित्त त्याने परमात्म्याच्या ध्यानात लावले पाहिजे.

             शांत दिव्याचा प्रकाश जसा घरभर पसरतो त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या परमेश्वर भेटीचा परमानंद परमात्म्याच्या ठिकाणीसुद्धा दिसू लागतो. आपल्याच काय, पण प्रत्येक जीवातील भगवंत आपणास दिसू लागतो. नाही तरी प्रत्येक योग्याचे अंतिम ध्येय हेच असते. भगवंत चिंतनासाठी तर आपणास हा भव्य दिव्य मनुष्य देह लाभला आहे. त्याचे सार्थक करणे हे प्रत्येक मनुष्याचे प्रथम कर्तव्य आहे. प्रपंचात राहूनसुद्धा हे साध्य करता येते. त्यासाठी प्रपंच सोडावा लागत नाही.

             तपश्चर्या करायला वनात जावे लागत नाही. द्रव्य खर्च करावे लागत नाही. फक्त प्रत्येक कर्म ईश्वराला स्मरून केले पाहिजे. उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त ईश्वराचेच चिंतन करायला हवे. गरजेपुरतेच कर्म करावे व तेही ईश्वरार्पण करावे म्हणजे त्या कर्माची जबाबदारी भगवंताची होते.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 20,21,22,23

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 20,21,22,23

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

              योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद परमात्म्यात संतुष्ट राहतो. इंद्रियातीत, शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो आनंद आहे, तो अनुभवाला येतो आणि त्या अवस्थेत असलेला योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही.

            परमात्मप्राप्तीचा लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानीत नाही आणि परमात्मप्राप्ती अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. जो दुःखरूप संसाररहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे, तो योग जाणून निश्चयाने न कंटाळता धैर्य व उत्साह यांनी युक्त चित्ताने केला पाहिजे.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 24,25

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-24-25

भगवद गीता अध्याय 6 श्लोकआणि अर्थ 

            संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून मनानेच इंद्रियसमुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे. तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये.

             योगमहर्षी पतंजली म्हणतात की, योगसामर्थ्याने निर्माण झालेली शरीरातील आंतरिक शक्ती मोक्ष प्राप्त करून देते; पण त्यासाठी यम, नियम इ. पासून समाधीपर्यंत क्रमाक्रमाने अभ्यास करायला हवा. संकल्पाने कामना उत्पन्न होतात. त्या पूर्णपणे टाकल्या पाहिजेत. कासवाप्रमाणे सर्व इंद्रिये आपल्या ताब्यात घेतली पाहिजेत.

             मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करावे. अशावेळी भगवंताशिवाय दुसरा कोणताही विचार मनात आणू नये. मग खरा चिरकाल टिकणारा आनंद प्रत्ययास येतो. असा मनुष्य परमात्म्यापासून जरासुद्धा विचलित होत नाही. तो दुःखरूप संसारापासून कायमचा मुक्त होतो. असा हा योग मनुष्याने निश्चयाने न कंटाळता धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने केला पाहिजे. हा योग चिरकाल सुख देणारा आहे.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 26,27

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-26-27

              हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते, त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे; कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे, अशा या सच्चिदानंदघन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो.

             मन हे सदैव चंचल आणि अस्थिर असते. अशा मनाला आवरणे महाकठीण काम असते. ज्याचा मनावर ताबा आहे, त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हणतात, तर मन ज्याच्या ताब्यात नाही त्याला, गोदास किंवा इंद्रियदास म्हणतात. ऋषीकेश म्हणजे इंद्रियांचा अधीश्वर जो भगवान श्रीकृष्ण. मन वारंवार विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते.

           त्याला सतत विषयांपासून आवरून परमात्म्यात स्थिर करावे लागते. मन स्थिर झाले तरच ते शांत होते, पापरहित होते; कारण त्याचा रजोगुण शांत झालेला असतो. असा योगी परमात्म्याशी पूर्णपणे तादात्म्य पावतो. ब्रह्माशी एकरूप होतो. त्या योग्याला खरा शांतीचा लाभ होतो. तो मुक्त होतो.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 28,29

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-28-29

               तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थितिरूप योगाने युक्त असून, जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व सजीवमात्रात स्थित व सजीवमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो.

               जीवात्मा हा भगवंताचाच अंश आहे. त्यामुळे तो प्रत्येक जीवात स्थित असणारच, एकदा योगसामर्थ्याच्या जोरावर योग्याने आत्म्यामध्ये भगवंत पहिला की, त्याने प्रत्येक जीवात्म्यात किंवा परमात्म्यात भगवंत पाहायला शिकले पाहिजे. निष्पाप योगी अशा परब्रह्म प्राप्तीचा आनंद घेत असतो. तो सर्वांना समभावाने पाहतो; कारण परमात्मा हा सर्वव्यापी अनंतात चैतन्यरूपाने राहतो.

           एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली, कारण त्यांना गाढवाच्या हृदयात भगवंत दिसला. गणिकेच्या हृदयात दिसला. दलित मुलीच्या हृदयात दिसला. नामदेवांना जनाबाईच्या हृदयात दिसला. तो परमात्मा तुकारामांना दिसला. ज्ञानदेवांना रेड्याच्या हृदयात दिसला. सर्व साधू-संतांना, ऋषी-मुनींना दिसला.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 30,31

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-30-31

              जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व सजीवांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व सजीवमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंदघन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात.

              वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण होय. श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूचा अवतार होय. याचाच अर्थ असा की, सर्व सजीवांचा जो आत्मा तो भगवंताचाच अंश आहे. भगवंतात सर्व सजीव सामावले आहेत व सर्व सजीवात भगवंत सामावले आहेत. हे ज्यांना दिसते अशा योग्यांचे सर्व व्यवहार, सर्व कर्मे भगवंतासाठीच होतात. भगवंतातच समाविष्ट होतात.

            आत्मा व परमात्मा यात भेद राहतच नाही. तो म्हणजे भगवंत व भगवंत म्हणजे तो असे होऊन जाते. त्याचा आनंद तो भगवंताचा आनंद व भगवंताचा आनंद तो त्याचा आनंद असे होते. त्यामुळे त्याने कर्म केले तरी ते कर्म राहतच नाही. ते अकर्म होऊन जाते.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 32,33

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-32-33

              हे अर्जुना ! जो योगी आपल्याप्रमाणे सर्व सजीवमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना ! जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील, असे मला वाटत नाही.

             सध्याच्या कलियुगात माणसाचे आयुष्य कमी झाले आहे. पूर्वीच्या मानाने त्याचा जीवन जगण्यासाठी संघर्ष वाढला आहे. त्याला घर सोडून गिरीकंदरात किंवा वनात, अरण्यात एकांतात जाता येत नाही. त्यामुळे मनाची चंचलता कमी होत नाही. मन आत्म्यात व परमात्म्यात स्थिर राहत नाही. म्हणून अर्जुन भगवंतांना म्हणतो की, त्यांनी सांगितलेला हा समभावाचा अष्टांगयोग त्याला जमेल असे वाटत नाही.

             अर्जुन हा श्रीकृष्णाचा अत्यंत लाडका आहे. त्यामुळे त्या गुरू-शिष्यातील संवाद अतिशय मनमोकळे असतात. मध्येच प्रश्न विचारल्यामुळे भगवंतही अत्यंत खूश होतात. त्यामुळे ते अधिक तपशीलवार माहिती अर्जुनाला सांगतात. अर्जुनसुद्धा अत्यंत तयारीचा शिष्य आहे. तो नवीन माहिती मिळवितो.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 34,35

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-34-35

              कारण, हे श्रीकृष्णा! हे मन मोठे चंचल, क्षोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडविण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. हे अर्जुना! हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते.

              देहाला जर रथाची उपमा दिली तर असे म्हणता येईल की, देहरूपी रथात जीवात्मा बसला आहे. बुद्धी त्या रथाचे सारथ्य करीत आहे. इंद्रिये हे रथाचे घोडे आहेत, तरमन हे त्या घोड्यांचे लगाम आहेत. स्वैरपणे धावणाऱ्या इंद्रियरूपी घोड्यांचा वेग आवरायचा असेल तर मनरूपी लगाम खेचायला हवेत. आणि हे काम बुद्धिरूपी सारथ्याला करायचे आहे.

               मन आणि इंद्रिये यांच्या स्वाधीन असलेला जीवात्मा सुख-दुःखे भोगत असतो. सोसाट्याचा वारा किंवा महाभयंकर वादळ जसे आटोक्यात येत नाही, त्याला अडविता येत नाही, तसे मनसुद्धा चंचल आहे. बलवान आहे. क्षोभविणारे आहे. मोठे दृढ आहे. त्याला अभ्यासाने व वैराग्यानेच ताब्यात ठेवावे लागते. त्याला वश करणे हे वाऱ्याइतकेच कठीण आहे.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 36,37

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-36-37

              ज्याने मनावर ताबा मिळविला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे, असे माझे मत आहे. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा ! जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे, परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो?

             जीव आणि शिव यांची झालेली फारकत जोडण्याचा दुवा म्हणजे योगाभ्यास होय. मग तो ज्ञानयोग असो वा कर्मयोग, अष्टांगयोग असो वा भक्तियोग. या चारही मार्गांनी योग्याला परब्रह्माचा यथावकाश लाभ मिळविता येतो. चारही योगात चित्तशुद्धी, इंद्रियजय व निष्काम कर्म याला महत्त्व आहेच. मनोजय व इंद्रियजय करण्यासाठी अष्टांगयोगाला फारच महत्त्व आहे. योगसाधनेने समाधी अवस्था प्राप्त करता येते. आत्म्याला व परमात्म्याला पाहता येते. मुक्ती, मोक्ष व सच्चिदानंद प्राप्त होतो.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 38,39

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-38-39

              हे श्रीकृष्णा ! भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत? हे श्रीकृष्णा! हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही.

              अर्जुनाने येथे अशी शंका निर्माण केली आहे की, एखाद्या मनुष्याची योगावर पूर्ण श्रद्धा आहे; पण अंतकाळी त्याचे मन योगापासून विचलित झाले व विषयाकडे आसक्त झाले आहे, असा मनुष्य योगसिद्धी प्राप्त करीत नाही. भगवत् साक्षात्कार प्राप्त करीत नाही.

              विस्कटलेल्या ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना होत? अर्जुनाचा भगवंतांवर पूर्ण विश्वास आहे. केवळ भगवंतच त्याच्या शंकांचे निरसन करतील, अशी अर्जुनाला खात्री आहे. खरा शिष्यच आपल्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवू शकतो. श्रीकृष्णालाही आपल्या लाडक्या शिष्याची मध्येच शंका विचारण्याची सवय माहीत आहे व ती भगवंतांना आवडतेही. योगभ्रष्ट झालेला मनुष्य कोणती गती प्राप्त करतो हे अर्जुनालाजाणून घ्यायचे आहे.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 40,41

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-40-41

             भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना! त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही; कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत्प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो.

             अर्जुनाची रास्त शंका विचारात घेऊन भगवंत अर्जुनाला स्पष्टीकरण करतात की, जो मनुष्य योगाभ्यास करीत होता, पण कालांतराने त्याचा अभ्यास बंद झाला तर त्याने केलेले कार्य वाया जात नाही. झालेल्या कर्माचे पुण्य त्याला प्राप्त होतेच. त्याची अधोगती होत नाही. त्याचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाश होत नाही.

             असा पुरुष स्वर्गप्राप्ती करून घेतो. तेथे पुष्कळ वर्षे राहतो व शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंत घरात जन्माला येतो. हे त्याला पुण्यकर्म करण्यासाठी मिळालेले प्रोत्साहन आहे. पुढील जन्मात त्याने पुण्यकर्म करावेही अपेक्षा असते.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 42,43

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-42-43

             किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकांत न जाता ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो; परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे, तो या जगात निःसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्वबुद्धिरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे कुरुवंशीय अर्जुना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मप्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो.

            भगवंत पुढे सांगतात की, जो खरोखर वैराग्यसंपन्न आहे, ज्याने ज्ञानयोगाचा अभ्यास केला होता; पण कालांतराने तो योगभ्रष्ट झाला, तो ज्ञानी पुरुष पुढील जन्म योग्याच्या कुळात घेतो. असा जन्म फार कचित लोकांना मिळतो, कारण योग्याचा जन्म मिळणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे.

            असा योगी पुढील जन्मात पूर्वसंस्कारानुसार योगसिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो. याचे कारण असे की, जन्माच्या अगदी सुरुवातीपासूनच घरात आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे पूर्वसंस्कारांना पोषक वातावरण मिळते व आध्यात्मिक प्रगती लवकर होते. म्हणजेच पूर्वपुण्याई वाया जात नाही. अर्थात, ईश्वरभक्तीसाठी केलेले प्रयत्न वाया जात नाहीत.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 44,45

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-44-45

             तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निःसंशयपणे भगवंतांकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धिरूप योगाचा जिज्ञासूदेखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना ओलांडून जातो; परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो.

               एखाद्या मागील जन्मातील योगभ्रष्टाने या जन्मात एखाद्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतला असेल तर पूर्व संस्कारामुळे तो या जन्मात भगवंतसेवेकडे आकर्षिला जातो. एखादा योगाभ्यासी पूर्वपुण्याईनुसार या जन्मी सकाम कर्म ओलांडून निष्काम कर्म करू लागतो; पण या जन्मात प्रयत्नपूर्वक योगाभ्यास करणारा योगी गेल्या अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात परमगतीला प्राप्त होतो. तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होते.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 46

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-46

             तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानी पुरुषांपेक्षासुद्धा योगी श्रेष्ठ मानला आहे आणि सकाम कर्मे करणाऱ्या माणसांपेक्षासुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो.

               भगवंत अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला देत आहेत; कारण योगसाधना करणारा मनुष्य हा सर्वश्रेष्ठ आहे असे भगवंत आवर्जून सांगतात. तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ असतात कारण तपस्वी लोकांना थोडातरी आपल्या तपाबद्दल अहंकार असू शकतो; त्यांना थोडा तरी अभिमान असू शकतो. पण योग्याचे मन व इंद्रिये ताब्यात असल्यामुळे त्याच्याजवळ अभिमान वा अहंकार मुळीच नसतो. तसेच शास्त्रार्थ जाणणारे जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्यापेक्षा योगी केव्हाही श्रेष्ठ समजावेत; कारण त्यांनी कर्माचे कर्तेपण भगवंताकडे सोपविलेले असते.

              सकाम कर्म करणारे जे पुरुष असतात, त्यांच्यापेक्षा योगसाधना करणारे योगी असतात ते श्रेष्ठ असतात; कारण त्यांना फळाची अपेक्षा नसते. ते निष्काम कर्म करीत असतात. त्यामुळे ज्ञानयोग असू दे, भक्तीयोग असू दे, नाही तर ध्यानयोग असू दे, कोणतीही योगसाधना करणारा योगी हा इतर सर्व पुरुषांहून श्रेष्ठ असतो. म्हणून अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला भगवंत देतात. भगवंतांनी तपस्वी लोकांचा ध्यानयोग, शास्त्रज्ञानी लोकांचा ज्ञानयोग, तर सकाम कर्मे करणाऱ्या लोकांचा कर्मयोग यांच्यापेक्षा सोपा आणि सहज करता येण्याजोगा भक्तियोग चांगला असे, सुचविले आहे.

भगवद गीता अध्याय 6 श्लोक 47

भगवद-गीता-अध्याय-6-श्लोक-47

        ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ।।

          सर्व योग्यांमध्येसुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर भजतो, तो योगी मला परमश्रेष्ठ म्हणून मान्य आहे.

            भगवंत म्हणतात की, योगसाधनेमध्ये श्रद्धेला फार महत्त्व आहे. श्रद्धा याचा अर्थ असा की, एखादी गोष्ट आपण आहे तशी स्वीकारणे. ती चुकीची आहे किंवा बरोबर आहे, याची सहनिशा येथे करू नये. ती चांगलीच आहे, आपल्या भल्यासाठीच आहे असे समजण्याचेच नाव श्रद्धा होय. आपल्या गुरूंवर व भगवंतावर श्रद्धा असली म्हणजे मग त्यांची सेवा योग्य रीतीने होते. असा जर भगवंताचा भक्त असेल तर तो जेव्हा भगवंताला अंतरात्म्याने भजतो, त्यावेळी तो भगवंताचा अत्यंत लाडका व परमप्रिय भक्त असतो. भजने याचाच अर्थ असा होतो की, पूजा करणे, सेवा करणे.

      श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वराची सेवा किंवा भक्ती करणे म्हणजेच भगवंताशी नाते जोडणे होय. आपण आपल्या हृदयात भगवंताला पाहिले की, भगवंतदेखील त्याच्या हृदयात आपल्याला पहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताचा अंश असलेल्या प्रत्येक मनुष्याने प्राप्त झालेल्या पवित्र देहानेच ईश्वराची सेवा करावी.

           हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी आत्मसंयमयोग हा सहावा अध्याय समाप्त झाला.

Leave a Comment