भगवद गीता अध्याय 8 (अक्षरब्रह्मयोग ) bhagwat geeta adhyay 8

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 1,2

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-1-2

भगवद गीता अध्याय 8 श्लोकआणि अर्थ 

              अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा ! ते ब्रह्म काय आहे? अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे? आणि अधिदैव कशाला म्हणतात? हे मधुसूदना ! येथे अधियज्ञ कोण आहे? आणि तो या शरीरात कसा आहे? तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात ?

            अर्जुन हा श्रीकृष्णाचा अतिशय हुशार शिष्य आहे. ज्ञान-विज्ञान योगाचे महत्त्व समजावून सांगितल्यावर अर्जुनाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे त्याला भगवंतांकडून कुशलतेने काढून घ्यायची आहेत म्हणून अर्जुन भगवंतांना विचारतो की, हे पुरुषोत्तमा ! ब्रह्म काय आहे? अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? अधियज्ञ म्हणजे काय? अधियज्ञ शरीरात कसा आहे? ज्ञानी पुरुष अंतकाळी तुम्हाला कसे जाणतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अर्जुनाला भगवंतांकडून हवी आहेत. भगवंत आपल्या लाडक्या भक्ताला आता कशी उत्तरे देतात ते पाहू.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 3,4

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 3,4

भगवद गीता अध्याय 8 श्लोकआणि अर्थ

             श्री भगवान म्हणाले ! परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भुतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो. उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना ! या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे.

            अर्जुनाने विचारलेले प्रश्न ऐकून भगवंत अत्यंत आनंदित झाले. भगवंत अर्जुनाला म्हणाले की, हे अक्षर ब्रह्म म्हणून ओळखले जाते. ते परम, अविनाशी व नित्य आहे. ब्रह्म जीवात्म्याशी निगडीत आहे तर त्याच्याही पलीकडे असणारे परब्रह्म भगवंताशी निगडित आहे. जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म होय. सर्व प्राणीमात्रांचे भाव दर्शविणारे तसेच नवीन जन्मात जे कृत्य करावे लागते त्याला कर्म असे म्हणतात. उत्पत्ती-विनाश असलेल्या सर्व पदार्थांना अधिभूत म्हणतात. देव-देवता, चंद्र-सूर्य, हिरण्यमय किंवा दिव्य पुरुष यांना अधिदैव म्हणतात. जीवात्म्याच्या शरीरात अंतर्यामी मी अधियज्ञ वास करतो.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 5,6

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-5-6

भगवद गीता अध्याय 8 श्लोकआणि अर्थ

            जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. हे कुंतीपुत्र अर्जुना ! हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो; कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.

           नेहमी भगवंताचे स्मरण का करावे? याचे उत्तर वरील श्लोकात दिले आहे. भगवंत म्हणतात की, ज्याचे आपण नित्य स्मरण करतो, त्याचेच अंतकाळी स्मरण होते. जे आयुष्यभर पैसा पैसा करतात असे लोक मरतानाही पैशाचाच विचार करीत देह सोडतात. त्यांचा पुढील देह पैशाच्या सान्निध्यातच होतो. जे विद्येचा विचार आयुष्यभर करतात, ते मरताना विद्येचा विचार करतात व पुढील जन्मी विद्याभ्यासी होतात.

              अंतकाळी भगवंताचे स्मरण व्हायला सतत आयुष्यभर भगवंत स्मरण करावे लागते; कारण मरणसमयी शरीराची कार्ये विस्कळीत होतात. आणि मन भयव्याकुळ स्थितीत असू शकते. सवयीशिवाय अंतकाळी भगवंताचे स्मरण होत नाही; पण जे पुरुष अंतकाळी भगवंताचे स्मरण करीत देहत्याग करतात, ते भगवंताच्या स्वरूपाला जाऊन मिळतात.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 7,8

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-7-8

भगवद गीता अध्याय 8 श्लोकआणि अर्थ

              म्हणून हे अर्जुना ! तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर, अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील. हे पार्था! असा नियम आहे की, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य, परम प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो.

              भगवंत अर्जुनाला म्हणतात की, तू युद्ध करावेस. तसेच तू निरंतर माझे स्मरण करावेस. तू जर माझ्या ठिकाणी मन व बुद्धी अर्पण केलीस तर तू नक्कीच मला येऊन मिळशील. फुलपाखरूदेखील सुरवंट अवस्थेत असताना सतत आपण फुलपाखरू व्हावे, असे चिंतन करीत असते. मन व बुद्धी त्या चिंतनात असल्याने शेवटी त्या सुरवंटाचे फुलपाखरू होते. सतत नामस्मरण, श्रवण व कीर्तन अशा सत्संगतीत असल्यामुळे जिव्हा, वाचा, चित्त शुद्ध होण्यास मदत होते.

              सकाम कर्म करण्याची इच्छा हळूहळू कमी होऊन निष्काम कर्म करण्याची बुद्धी होते. शरणागती निर्माण होऊन सर्व कर्मांचे कर्तेपण आपोआप भगवंताकडेच येते. त्यामुळे भक्ताच्या सर्व सत्कर्माची जबाबदारी भगवंतालाच घ्यावी लागते.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 9,10

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-9-10

भगवद गीता अध्याय 8 श्लोकआणि अर्थ

                  जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचेधारण-पोषण करणारा, अतर्व्यस्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणिअविद्येच्या पलीकडील शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे स्मरण करतो, तोभक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्यारीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परम पुरुषपरमात्म्यालाच प्राप्त होतो.

              भगवंत सांगतात की, कलियुगात भगवंताचे नाम हेच विशेष महत्त्वाचे साधन आहे. या नामानेच चारही युगांत श्री शंकरापासून अजामेळापर्यंत सर्वांनाच फायदा झाला आहे. अंतकाळी योगबलाने जर दोन्ही भुवयांच्या मध्यभागी प्राणवायु स्थापन करून शांत मनाने माझे नाव घेत प्राण सोडला तर तो पुरुष परमात्म्याला प्राप्त होतो.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 11

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-11

भगवद गीता अध्याय 8 श्लोकआणि अर्थ

                वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंदघनरूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो.

                वरील श्लोकात भगवंतांनी परमपद प्राप्त करण्यासाठी कोण कोण कसे प्रयत्न करतात हे सांगितले आहे. जे वेद जाणणारे विद्वान आहेत ते परमपदाला अविनाशी असे म्हणतात; कारण परमपद असे पद आहे की, ते कधीच नष्ट होत नाही. संन्यासी महात्मे हे आसक्तिरहित असतात. तसेच ते कठोर योगसाधना करतात. शेवटी ते परमपद प्राप्त करतात.

               ब्रह्मचर्याचे पालन करणारे व योगसाधना करणारे ब्रह्मचारीसुद्धा हे परमपद प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. भगवंत कसा आहे? तो सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण व पोषण करणारा, आतर्व्यस्वरूप, सूर्याप्रमाणे चेतन प्रकाशस्वरूप, सच्चिदानंद, तेजस्वी, अद्वितीय, अविनाशी असा आहे. भगवंत जर असा आहे तर मग परमपद कसे आहे? ते आता भगवंत सांगत आहेत.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 12,13

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-12-13

भगवद गीता अध्याय 8 श्लोकआणि अर्थ

         सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी आहे, त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो.

            देहत्याग कसा करावा हे सांगताना भगवंत म्हणतात की, योगसाधना करण्याची सवय असणाऱ्या मनुष्याने प्रत्याहार पद्धतीचा उपयोग करून कर्ण, नयन, नासिका, जिव्हा, त्वचा. या पंचेंद्रियांचे जे विषय आहेत. श्रवण, पाहणे, गंध, रस, स्पर्श त्यांना आवरून धरावे. मन निरिच्छ झाले की, मनाला हृदयात स्थापन करावे. मग प्राणवायूला वर वर खेचत दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थापावे. नंतर या एकाक्षर मंत्राचा जप करीत करीत तो प्राणवायू मस्तकात स्थापन करावा.

             अशारीतीने निर्गुण ब्रह्माचा जप करीत जो देहत्याग करतो, तो परमपदाला प्राप्त होतो. म्हणजेच भगवंताला प्राप्त होतो. तो परमगतीला प्राप्त होतो म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घेतो.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 14,15

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-14-15

भगवद गीता अध्याय 8 श्लोकआणि अर्थ

              हे पार्था! जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे. परम सिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगार असलेल्या क्षणभंगुर पुनर्जन्माला जात नाहीत.

                 भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की, जे पुरुष माझी अनन्य भावाने भक्ती करतात, त्या सर्व भक्तांना मी सहज प्राप्त होतो. ते योगी मग ज्ञानमार्गी असोत, योगमार्गी असोत, निष्काम कर्ममार्गी असोत की भक्तीमार्गी असोत. भक्तीचे पाच प्रकार आहेत. १) शांत भक्ती, २) दास्य भक्ती, ३) सख्य भक्ती, ४) वात्सल्य भक्ती, ५) मधुरा भक्ती. भक्तियोग हा आचरण करायला अतिशय सोपा आहे. उद्धवाने शांत भक्ती केली. विदुराने दास्य भक्ती केली. अर्जुनाने सख्य भक्ती केली.

              यशोदेने वात्सल्य भक्ती केली. राधेने व रुक्मिणीने मधुरा भक्ती केली. भक्ती कोणत्याही प्रकारची असो, ती अनन्य असावी, शुद्ध असावी. सात्त्विक असावी, निरंतर असावी. उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त भगवंताचाच ध्यास हवा. भगवंताला जे आवडते ते खावे, ते ल्यावे, ते कर्म करावे.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 16,17

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-16-17

                 हे अर्जुना ! ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत; परंतु हे कौन्तेया ! मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. कारण, मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्त्वतः जाणतात, ते काळाचे स्वरूप जाणणारे होत.

             भगवंत अर्जुनाला म्हणतात की, ज्यांना पुनर्जन्म आहे ते ब्रह्मलोकांपर्यंतच जातात; पण ज्याला परमपद म्हणतात ते म्हणजे विष्णुपद होय. या पदाला प्राप्त झालेले लोक पुनर्जम घेत नाहीत; कारण हे पद कालातीत आहे. ब्रह्मलोकाला मर्यादा आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कृतयुग (१७२८००० वर्षे), त्रेतायुग (१२९६००० वर्षे), द्वापारयुग (८६४००० वर्षे) व कलियुग (४३२००० वर्षे) यांची बेरीज ४३२०००० होय.

           (महायुग). अशी १००० आवर्तने (कल्प). एवढाच कालावधी ब्रह्मदेवाच्या एका रात्रीला लागतो. ब्रह्मदेवाची आयुर्मर्यादा १०० वर्षे धरली तरी (८६४०००००००१००३६०) अशी एकूण ३१,१०,४०,००,००,००००० इतकी वर्षे होतात. याचाच अर्थ असा की, सजीव या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटत नाहीत; पण जे लोक मृत्युसमयी माझे नामस्मरण करतात, त्यांना पुनर्जन्म नाही.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 18,19

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-18-19

             सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. हे पार्था! तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो.

            उत्पत्ती, स्थिती व लय हा सृष्टीचा नियम भगवंताच्या अधीन आहे. जे उत्पन्न होते ते लय पावते हे भगवंतांनी सांगितलेच आहे. ज्यावेळी ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो, त्यावेळी या सृष्टीची उत्पत्ती होते. ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून म्हणजेच अव्यक्तातून सर्व चराचर भूत समुदाय उत्पन्न होतात. हे सर्व सृष्टीच्या अधीन असतात.

               ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच प्रलय होऊन सर्व सृष्टीचा नाश होतो. पुन्हा सर्व सृष्टी अव्यक्तात विलीन होते. अशारीतीने उत्पत्ती, स्थिती व लय हा क्रम अखंड सुरू असतो. जे अज्ञानी प्राणीमात्र असतात, ते अशा जन्म- मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात; पण जे ज्ञानी असतात, ते मात्र जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतात.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 20,21

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 20,21

            त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परम दिव्य पुरुष सर्व भुते नाहीशी झाली, तरी नाहीसा होत नाही. त्याला अव्यक्त, अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय.

           अढळपद कोठे व कसे आहे हे आता भगवंत सांगत आहेत. व्यक्त आणि अव्यक्त अपरा प्रकृतीत सजीव जन्म-मृत्यूच्या फेऱ्या करीत असतो; पण त्याच्याही पलीकडे परा प्रकृतीचा अव्यक्त, अक्षर, विलक्षण व सनातन भाव आहे. त्यालाच परमपद म्हणतात. कोणी त्यास अढळपद म्हणतात, कोणी त्यास परमगती म्हणतात, कोणी त्यास मुक्ती म्हणतात. कोणी त्यास मोक्ष म्हणतात.

              या ठिकाणी पोहोचल्यावर मनुष्य परत जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात येत नाही. तो भगवंताच्या स्वरूपात विलीन होतो. हेच ते भगवंताचे सर्वश्रेष्ठ स्थानआहे. योगी लोक, भगवंताचे खरे भक्त या पदाला पोहोचण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. मनुष्य हा एकच सजीव असा आहे की, प्रगल्भ बुद्धीद्वारे, भगवंताची भक्ती करून अढळपदास जातो.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 22,23

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 22,23

            हे पार्था! ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भुते आहेत आणि ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परम पुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. हे अर्जुना! ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन.

           परमात्म्याने सर्व जग व्यापले आहे हे तर आपण पाहिले. अव्यक्त सनातन परम पुरुष असा जो भगवंत आहे, त्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर अनन्य भक्तीनेच प्राप्त करावे लागेल, असे भगवंत अर्जुनाला वारंवार सांगतात. प्राप्त झालेल्या शरीराचा त्याग करतानासुद्धा असा काळ किंवा वेळ हवी की, पुन्हा पुनर्जन्म येऊ नये व देहत्याग करताना भगवंताचे नामस्मरण हवे.

           विष्णुपदाला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म प्राप्त होत नाही. दुसरा मार्ग म्हणजे देहत्याग करताना विषयाचे स्मरण करत व अशा विशिष्ट कालावधीत देहत्याग होतो की, त्यामुळे पुनर्जन्माला सामोरे जावे लागते. स्वर्गप्राप्ती झाली तरी पुण्यक्षय झाला की, पुन्हा जन्म घ्यावा लागतो.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 24,25

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-24-25

               ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्रतेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्मांची फळे भोगून परत येतो.

            भगवंत म्हणतात की, उत्तरायणाचे सहा महिने, त्यातही शुक्ल पक्षाचे पंधरा दिवस, त्यातही दिवसामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काल देह त्यागासाठी उत्तम समजला जातो. अग्नी, सूर्य, दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायण हा देवयानमार्ग परमपदासाठी योग्यांना उत्तम असतो; पण धूर, रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायन या पितृयान मार्गाने गेलेले लोक चंद्रलोकाला प्राप्त होतात. स्वर्गातील भोग भोगून पुण्यक्षयहोताच पुन्हा जन्म घेतात.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 26,27

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-26-27

                 कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यांतील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही, अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म-मृत्यूला प्राप्त होतो. हे पार्था ! अशारीतीने या दोन मार्गांना तत्त्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना! तू सर्व काळी समबुद्धिरूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो.

              वरील श्लोकात भगवंत अर्जुनाला आवर्जून सांगत आहेत की, तू योगयुक्त हो. तू योगसाधना कर. तू माझ्या प्राप्तीसाठी भक्ती साधना कर. देहत्यागासाठी देवयान किंवा उत्तरायण आणि पितृयान किंवा दक्षिणायन हे दोन मार्ग एकदा समजले की, तो योगी मोह पावत नाही. तो योगी निष्काम कर्म करतो व उत्तरायणात देहत्याग करून परमपदाला पोहोचतो. म्हणजे तो जन्म-मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो; पण जो अभागी वासनेत रत होऊन मला न स्मरता दक्षिणायनात देहत्याग करतो तो जन्म-मृत्यू भोगत राहतो.

भगवद गीता अध्याय 8 श्लोक 28

भगवद-गीता-अध्याय-8-श्लोक-28

          योगी पुरुष या रहस्याला तत्त्वतः जाणून, वेदांचे पठण, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्य फळ सांगितले आहे, त्या सर्वाला निःसंशय ओलांडून जातो व सनातन परमपदाला पोहोचतो.

           या अध्यायाचा शेवट करताना भगवंत पुन्हा एकदा सांगतात की, योगसाधना करणारे व भगवंताची सेवा करणारे भक्त मी सांगितलेल्या रहस्याला जाणतात. त्याप्रमाणे आचरण करतात. त्याप्रमाणे सत्कर्म करतात. वेदपठण करतात. यज्ञयाग करतात. जप-तप करतात.

              दानधर्म करतात. त्यांना त्याचे जे फळ प्राप्त होते. त्याविषयी मोह न धरता ते माझी भक्ती करीत राहतात. त्यांना निश्चितपणे माझी प्राप्ती होते, मी त्यांना सनातन अव्यक्त चिरंतन अशा परमपदाला घेऊन जातो. म्हणजे मी त्याला माझ्याच तत्त्वात सामावून घेतो. त्याला पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकावे लागतनाही. तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्राविषयी अक्षरब्रह्मयोग हा आठवा अध्याय समाप्त झाला.

Leave a Comment