भगवद गीता अध्याय 9 श्लोक 1,2
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
श्रीभगवान म्हणाले, दोषदृष्टिरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे.
आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग यांची माहिती दिली. त्याला झालेला विषाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अर्जुन श्रीकृष्णाचा लाडका भक्त व सखा असल्यामुळे अर्जुनाला अधिकाधिक ज्ञान देण्याचा भगवंतांचा प्रयत्न आहे. या अध्यायात ते राजविद्या म्हणजे काय व राजगुह्य म्हणजे काय ते सांगत आहेत. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा असलेली विद्यातरराजगुह्य म्हणजे अतिशय गोपनीय ज्ञान होय. शरीर, आत्मा, परमात्मा, परमपद यांची माहिती भगवंतांनी दिली.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 3,4
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
हे अर्जुना ! या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसारचक्रात फिरत राहतात. जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत; पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही.
भगवंत म्हणतात की, कर्म करण्यास अतिशय सोपे, आचरणात आणण्यास अतिशय सोपे असे ज्ञान मी सांगणार आहे. सर्व योगामध्ये भक्तियोग अतिशय सोपा असून लवकर फलप्राप्ती करून देणारा आहे. ज्याची धर्मावर श्रद्धा नसते असे लोक संसारचक्रात फिरत राहतात. मी मात्र निराकार अशा परमात्म्याने सर्व चराचर व्यापले आहे. सर्व सृष्टी मझ्यात आहे; पण मी मात्र त्यांच्यामध्ये नसतो. जे भक्तिरूपाने माझे स्मरण करतात, त्यांना मात्र मी जवळ करतो.
नारद हे पूर्वजन्मात दासीपुत्र होते. त्यांना शिक्षण नव्हते. आईबरोबर भक्तसेवा व सत्संगतीमुळे ते ब्रह्मज्ञानी झाले. नवविधा (श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन) यापैकी कोणतीही भक्ती मला प्रिय आहे.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 5,6
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
ती सर्व भुते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत; परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पाहा की, भुतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण-पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भुतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भुते माझ्यात राहतात.
भारतीय अध्यात्मशास्त्र अतिशय जुने व समृद्ध आहे. जगातील सर्वात जुने तत्त्वज्ञान अशी भारतीय अध्यात्मशास्त्राची परंपरा आहे. आपल्याकडे सात उत्तम दर्शनकार होऊन गेले. ते म्हणजे गौतम, कणाद, कपिल, याज्ञवल्क्य, शांडिल्य, वैश्वानर, व्यास. या सात जणांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा महासागर उभा केला. भगवंत अर्जुनाला म्हणतात की, आकाशातून निर्माण झालेला वायू सर्व ब्रह्मांड व्यापतो; पण आकाशातच राहतो. आकाश वायूत राहत नाही.
सर्व प्रजा राजाच्या छत्राखाली राहते; पणराजा प्रजेच्या छत्राखाली राहत नाही. त्याप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले सर्व जीवमात्र माझ्यात राहतात. पण मी मात्र त्यांच्यात नसतो. मी त्या सर्वांचे धारण व पोषण करतो, त्यांना सांभाळतो.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 7,8
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
हे अर्जुना ! कल्पाच्या शेवटी सर्व भुते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मांनुसार उत्पन्न करतो.
या ठिकाणी भगवंतांनी कल्प ही संज्ञा वापरली आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्यमान १०० वर्षे धरले तर तेवढा कालावधी म्हणजे एक कल्प होय; पण ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे (चार युगे १००० आवर्तने). तेवढीच वर्षे म्हणजे एक रात्र. एक महिना म्हणजे ३० दिवस-रात्र. एक वर्ष म्हणजे १२ महिने. एका कल्पाचा सर्व कालावधी जर मोजला तर तो ३११०४००००००००۰۰ वर्षे होतो. नंतर प्रलय होऊन जीवसृष्टी नष्ट पावते व ती भगवंताच्या प्रकृतीत विलीन होते. उत्पत्ती, स्थिती, लय यांचा नियंता भगवंत आहेत.
कल्पाच्या आरंभी पुन्हा भगवंत संकल्पाने सृष्टी निर्माण करतात. पूर्व कर्मानुसार जीवांना त्या त्या योनीत जन्म मिळतो व सृष्टिचक्र पुन्हा सुरू होते. ज्या जीवांना परमपद प्राप्त झाले आहे, त्यांना मात्र या सृष्टिचक्रात परत यावे लागत नाही; कारण ते जीव भगवंताचा अंश असतात.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 9
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
हे अर्जुना! त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्म बंधानकारक होत नाहीत.
सर्वात आहे, पण कशात नाही, अशी स्थिती भगवंताची असते. त्याच्या आज्ञेवाचून झाडाचे पानदेखील हलत नाही; पण त्याचे कर्तेपण तो स्वतःकडे घेत नाही, कारण तो कर्मात आसक्ती नसलेला असतो. न्यायाधीश ज्याप्रमाणे कोणास फाशीची शिक्षा देतो, कोणास तो जन्मठेपेची शिक्षा सुनावतो कोणास तो खडी फोडायला पाठवितो, तर कोणास तुरुंगवासाची शिक्षा सुनावतो, कोणाच्या संपत्तीची वाटणी करतो, तर कोणाचे तंटे मिटवतो, कोणाच्या जमिनीचा वाद मिटवतो, तर कोणाचा वारसदार ठरवतो. एवढे करूनही तो मात्र निर्विकार असतो. त्याला कोणाचे घेणे-देणे नसते. त्याप्रमाणे भगवंतदेखील कर्माच्या बाबतीत निर्विकार उदासीन असतो. त्यामुळेच परमात्म्याला कर्मे बंधनकारक ठरत नाहीत.
अशा परमात्म्याला ओळखायचे असेल तर भक्ती करायला हवी. तीसुद्धा अनन्यतेने करायला हवी, निरंतर करायला हवी. कर्म करतानादेखील निष्काम भावनेने करायला हवे. कर्म करताना ते भगवंताला अर्पण केले म्हणजे ते निष्काम होते; कारण असे कर्म भगवंताला आवडणारे असते. फलाशा नसलेले असते. मग ते कर्म, कर्म म्हणून राहतच नाही. ते अकर्म होते.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 10
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
हे अर्जुना ! माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसारचक्र फिरत आहे.
वरील श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगतात की, हे पार्था! केवळ माझ्या अधिष्ठानामुळे ही अपरा प्रकृती चराचरासह सर्व सृष्टी निर्माण करते, सांभाळते व नष्ट करते. आणि कल्पांतापर्यंत हे संसारचक्र फिरत राहते. त्यामुळे सर्वांना असे वाटते की, प्रकृतीच या सृष्टीचा कर्ता आहे, सर्वस्व आहे; पण या प्रकृतीला चालना देणारी शक्ती मी आहे हे सर्व जण विसरतात. प्रथम सूक्ष्म परमात्म्याशिवाय या ब्रह्मांडात काहीच नव्हते. नंतर थोडे स्फुरण निर्माण झाले व माया निर्माण झाली. नंतर माझ्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. सृष्टी निर्माण करणारी प्रकृती माझ्या अंकित आहे. त्यामुळेच या सर्व विश्वावर माझी सत्ता चालते. मी निर्गुण आहे. निराकार आहे. मी अव्यक्त आहे. अक्षर आहे. मी परमात्मा आहे. ईश्वर आहे.
त्यामुळेच अज्ञानी, मूढ लोक मला ओळखत नाहीत; पण ज्ञानी व योगी लोक मला जाणण्याचा प्रयत्न करतात. माझी भक्ती करतात. त्या सर्व भक्तांना मी जवळ करतो. मला उणीव आहे ती भक्तांची. भक्तांना भेटण्यासाठी मी शतकानुशतके, युगानुयुगे वाट पाहतो. माझ्या भक्ताला भेटण्यासाठी मी अत्यंत आतूर आहे. भक्ताची सेवा करण्याचे भाग्य मला लाभावे म्हणून मी वाट पाहत असतो. जे माझी अनन्यतेने भक्ती करतात, त्यांना मी अढळपद बहाल करतो.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 11
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला-सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात, आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात.
विषय वासनेत रमणारे, अज्ञानी, मूढ असे जे अभक्त असतात. ते भगवंताला एखादा थोर मनुष्य असेच ओळखतात. भगवंतांनी धर्म रक्षणासाठी व दुष्टांचा संहार करण्यासाठी जे नृसिंह, वामन, राम, कृष्ण इ. अवतार घेतले आहेत, यावरून भगवंत म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून एक अवतारी पुरुष आहे, असेच ते समजतात. तुच्छ समजतात. विडंबन करतात. कुचेष्टा करतात; पण त्यांना हे समजत नाही की, भगवंतांनी योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात अवतार घेतले आहेत. कार्य पूर्ण होताच भगवंतांनी अवतारही समाप्त केले आहेत.
अनेक दुष्ट दैत्यांचा संहार केला आहे. दुर्जनांना शासन केले आहे व धर्माचे संरक्षण केले आहे; पण भगवंताच्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक भगवंताची उगीचच कुचेष्टा करीत राहतात; पण जे खरोखर ज्ञानी लोक आहेत, जे खरोखर योगी लोक आहेत, ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात माझी भक्ती करतात, मला जाणतात. मला सर्वव्यापी परमेश्वर समजतात. परमात्मा समजतात. परमपद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. असे भक्त भगवंताला खूप आवडतात.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 12
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
माया ही तीन गुणांनी भरलेली असते. काही लोक सत्त्वगुणी, काही रजोगुणी, तर काही तमोगुणी असतात. ज्ञानी लोक सत्त्वगुणी असतात, त्यांना ब्राह्मण म्हणतात. काही लोक रजोगुणी असतात त्यांना क्षत्रिय म्हणतात. काही लोक मिश्र गुणी असतात (सत्त्व-रज, रज-तम) त्यांना वैश्य म्हणतात.
काही लोक तमोगुणी असतात त्यांना शूद्र असे म्हणतात. ते अज्ञानी असतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, समजले जाणारे लोक हे भगवंताची पूजाअर्चा करतात. यज्ञयाग करतात. दानधर्म करतात. त्या लोकांना भगवंत म्हणजे काय हे समजलेले असते; पण जे व्यर्थ आशा मनात धरतात, त्या सर्व आशा विषयासंबंधी असतात. त्या स्वार्थाने भरलेल्या असतात. त्या निरर्थक असतात. त्यांची कर्मेही तशीच अशुद्ध असतात. वाईट असतात. त्यांना कुकर्मे असे म्हणतात. भगवंताची भक्ती म्हणजे त्यांना ढोंग वाटते.
दान देण्यापेक्षा स्वीकारणे त्यांना आवडते. यज्ञात व्यत्यय आणणे त्यांना अधिक आवडते. अशा लोकांचे चित्त शुद्ध नसते, स्थिर नसते. असे लोक अज्ञानालाच ज्ञान समजतात. मोहिनी विद्या, आसुरी विद्या व राक्षसी विद्या (चेटूक, जारण मारण, भानामती, जादूटोणा) या त्यांना खूप आवडतात.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 13
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
परंतु, हे पार्था! दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भुतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.
वाज्याचा आत्मा महान आहे, त्याला महात्मा म्हणतात. कोणाचा आत्मा महान असतो? जो मायेच्या अधीन नसतो, माया पार करून गेलेला योगी महात्मा असतो. जो दैवी प्रकृतीत जातो तो दिव्य पुरुष महात्मा असतो. जो मायेच्या प्रकृतीला सोडून दैवी प्रकृतीच्या आश्रयाने राहतो तो महात्मा असतो. अशा दैवी पुरुषांना दैव अनुकूल असते. म्हणजे ते भगवंताला शरण जातात. सारे कर्तृत्व भगवंताला अर्पण करतात. त्यामुळे ते जे काही करतात ते सर्व भगवंताला आवडणारे असेच असते. ते भगवंताला सर्व भुतांचे सनातन कारण समजतात.
भगवंतानेच सर्व सृष्टी निर्माण केली आहे, यात त्यांना तिळमात्रही शंका नसते. भगवंत हाच अविनाशी आहे. सर्व सृष्टीचा प्रलय होईल, सर्व सृष्टी नष्ट पावेल; पण भगवंत नाश पावत नाही. भगवंत अक्षर आहे. तो परमात्मा आहे. म्हणून अशा भगवंताची दैवी महात्मे योगीजन अनन्यतेने भक्ती करतात. या जन्म- मृत्यूचा चक्रातून सुटका होण्यासाठी फक्त भगवंतच सक्षम आहे अशी त्या महात्म्यांची पूर्ण खात्री असते. ते श्रद्धेने भगवंताला भजतात. त्यामुळे भगवंत अशा महात्म्यांवर प्रसन्न होतो. त्यांना जवळ करतो. त्यांना परमपद बहाल करतो. मुक्ती देतो.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 14
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात.
जे अनन्य भक्त आहेत ते काय करतात, तर जी पाच ज्ञानेंद्रिये आहेत त्यांच्यामार्फत भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. ते जे काही पाहतात, त्यात फक्त भगवंतच पाहतात. परस्त्री त्यांना मातेसमान दिसते. परपुरुष त्यांना गुरूप्रमाणे दिसतो. एखादे लहान बालक त्यांना बालकृष्णाप्रमाणे दिसते. ते जे ऐकतात तेदेखील भगवंताविषयीच ऐकतात. भजन, कीर्तन, प्रवचन, पोथी, पुराण वा भगवंतलीलाच ऐकतात. मुखानेदेखील भगवंताचे नाम निरंतर घेत राहतात.
संतवचने वाचतात. भजन करतात. कीर्तन करतात. पोथी वाचतात. वेदपठण करतात. प्रबचन करतात. पुराण सांगतात. पारायणे करतात. पोथी वाचन करतात. भगवंताच्या भक्तिरसाचा आस्वाद घेतात. हरिनामाचे तीर्थ प्राषन करतात. नामस्मरणाची गोडी चाखतात. संतसंगतीमध्ये भक्तीचा सुगंध अनुभवतात. आई, वडील, गुरू, संत, अनाथ, अपंग, बालक यांची सेवा करतात. भूतदया हीच ईश्वरसेवा मानतात. वडीलधाऱ्यांना चरणस्पर्श करतात. वंदन करतात. सतत भगवंताची उपासना करतात. ते खरे अनन्य भक्त होत.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 15
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण-निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट-स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात.
जे महात्मा नाहीत, पण जे भगवंताचे भक्त आहेत त्यांचे चार प्रकार आपण पाहिले. ते म्हणजे १) आर्त भक्त, २) जिज्ञासू भक्त, ३) अर्थार्थी भक्त, ४) ज्ञानी भक्त. याशिवाय काही भक्त भगवंताची भक्ती करतात. अशा भक्तांचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. ते म्हणजे १) भगवंत आणि आपण वेगळे नसून अभेदपणे भक्ती करणारे, २) भगवंताचे कोणते तहरी स्वरूप मनाने कल्पून त्या देवतेची भक्ती करणारे, ३) भगवंताच्या विश्वरूपाचा स्वीकार करून त्याची भक्ती करणारे. यामध्ये पहिल्या प्रकारचे जे ज्ञानयोगी भक्त आहेत ते भगवंत निर्गुण निराकार आहे असे समजून ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदपणे भक्ती करतात.
दुसऱ्या प्रकारचे भक्त मनामध्ये भगवंताची मूर्ती निर्माण करून त्याप्रमाणे निरनिराळ्या देव-देवता निर्माण करतात व त्या देवतांची पूजा करतात. तिसऱ्या प्रकारचे जे भक्त आहेत ते भगवंत म्हणजे विराट स्वरूपच आहे असे समजतात. असे भक्त पंचमहाभूते, ब्रह्मांड, विराट स्वरूप, निसर्ग, सृष्टिदेवता, यांची भक्ती करतात. जे जे भक्त अनन्यतेने भक्ती करतात, ती सर्व भक्ती भगवंताला पोहोचते.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 16
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
श्रौतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती, अन्न व औषध मी आहे. मंत्र मी आहे, तूप मी आहे, अशी मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे.
वेदांच्या कर्मकांड विभागात अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. ते सर्व यज्ञ, त्या सर्व यज्ञाला लागणारे साहित्य, अग्री, मंत्र, कर्म हे सर्व म्हणजे भगवंतच आहे. यज्ञाची संकल्पना, स्वरूप, कृती व पळ हे सर्व तात्विक असते, जे जे सात्त्विक व परोपकारी असते तेथे भगवंत असतो. सजीवांच्या धारण व पोषणासाठी ज्यांची मदत होते, ज्यांचे उपकार होतात, त्यांचे ऋण फेडण्यासाठी, त्या ऋणाची जाणीव ठेवण्यासाठी तसेच रोज आपल्या हातून कळत-नकळत अपराध होतात, नकळत हत्या होते, त्याची क्षमा मागण्यासाठी वेगवेगळे यज्ञ केले जातात.
श्रौतयज्ञ, स्मार्तयज्ञ, पितृयज्ञइ. अनेक यज्ञ आहेत. क्रतू आहेत. ते सर्व यज्ञ भगवंत आहेत. यज्ञासाठी हवन करतात, त्यामध्ये तीळ, सातू, तूप, समिधा, दूर्वा, दूध, दही, तांदूळ, इ. अनेक हविद्रव्ये लागतात. ते सर्व भगवंतच आहेत. यज्ञातील अग्नी भगवंत आहेत. यज्ञाचे मंत्र भगवंत आहेत. याज्ञिक भगवंत आहेत. वनस्पती, अन्न, औषध हे सर्व भगवंत आहेत. एवढेच नव्हे, तर हवनाची जी क्रिया केली जाते तीसुद्धा भगवंतच आहेत. प्रत्येक ठिकाणी भगवंतच उभे असतात, व ते आपल्या हातून यज्ञकर्म करवून घेतात. सत्कर्म करवून घेतात. परोपकार करवून घेतात.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 17
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा, आई-वडील, आजोबा, जाणण्याजोगा पवित्र ॐकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे.
प्रलय होताना ही सर्व सृष्टी अव्यक्त स्वरूपात भगवंत धारण करतात. पुन्हा जेव्हा भगवंत उत्पत्तीची प्रक्रिया सुरू करतात तेव्हा ती सर्व सृष्टी भगवंताच्या अंश रूपाने व्यक्त होते. याचाच अर्थ असा की, चराचरात भगवंत आहे. सजीवात भगवंत आहे. निर्जीवात भगवंत आहे. मानवाला जन्म देणारे आई-वडील, त्यांना जन्म देणारे जीवाचे आजी-आजोबा, बंधू, भगिनी, गुरू, आचार्य हे सारे भगवंतच आहेत. या ब्रह्मांडाचा पवित्र ध्वनी जो ॐकार आहे तो ॐकार भगवंत आहेत. त्यालाच एकाक्षर ब्रह्म असे म्हणतात.
भगवंताचे ते नामब्रह्म, नादब्रह्म आहे. आदी असलेले जे अपौरुषेय वेद आहेत, ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद होत. हे सर्व वेद म्हणजे स्वतः भगवंतच आहेत. भगवंत सर्व जगाला धारण करतात. चराचराचे पोषण करतात. कर्म करणाऱ्या सर्वांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळही भगवंतच देतात. भगवंत वस्तू वस्तूत भरलेला आहे. नृसिंह अवतारात त्यांनी खांबातून प्रकट होऊन सर्व जगाला हे दाखवून दिले आहे. भगवंत एकच असला तरी तो अंश रूपाने सर्वत्र भरला आहे. ज्ञानी भक्त हे जाणतात. व भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. भगवंताची भक्ती करतात.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 18
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण-पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती-प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे.
गती म्हणजे परमधाम. मृत्यूनंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार गती प्राप्त होत असते. कोणास चंद्रलोक प्राप्त होतो, तर कोणास सूर्यलोक प्राप्त होतो. कोणास शिवलोक म्हणजे कैलासाची प्राप्ती होते, तर कोणास ब्रह्मलोक प्राप्त होतो. कोणी इंद्रलोक प्राप्त करतो, तर कोणी नरकवासाची वाट धरतो. ही सर्व धामे जरी भगवंतांनीच निर्माण केली असली तरी सर्वात महत्त्वाचे असे जे परमधाम आहे, त्याला विष्णुलोक किंवा वैकुंठ असे म्हणतात.
बाकी सर्व धामांतून पुण्यक्षय होताच पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात मनुष्य अडकतो; पण जे परमधाम किंवा परमगती आहे तेथून पुनर्जन्म प्राप्त होत नाही. यालाच मोक्ष असे म्हणतात. भगवंत धारण व पोषण करणारा आहे. कर्मानुसार सर्वांचे निवासस्थान आहे. कर्मानुसार सर्वांचे शुभाशुभ पाहणारा आहे. सर्वांच्या उत्पत्ति, स्थिती, लय याचे नियंत्रण करणारा आहे. तो स्थितीला आधार देणारा आहे. तो सर्वांचा स्वामी असून आनंदनिधान आहे. तो अविनाशी परमात्मा आहे.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 19
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकषून घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना! मीच अमृत आणि मृत्यू आहे आणि सत्य असत्त्वसुद्धा मीच आहे.
ब्रह्मांड निर्माण करणारा भगवंत आहे. तो सूर्य रूपाने सर्वांना प्रकाश व उष्णता देतो, ऊब देतो. सर्वांचे थंडीपासून संरक्षण करतो. सूर्य आहे म्हणून प्राणवायू आहे, वनस्पती आहेत, जल आहे. पाण्याला सूर्याची उष्णता प्राप्त होऊन त्याची वाफ बनते. वाफेचे ढग बनतात. या ढगांना थंड हवा लागून त्याचा पाऊस पडतो. नद्या वाहतात. तलाव भरतात. तळी, विहिरी भरतात. घन, द्रव, वायू या तीन अवस्थांमध्ये पाणी असते. पाणी गोठून बर्फ बनते, तर पाणी तापून त्याची वाफ बनते. स्थिर समुद्रापासून पाणी जगात कोठेही वाहून नेण्याची भगवंताची लीला अगाध आहे.
त्यामुळेच चराचराला पाणी प्राप्त होते. सजीव जगतात. पाणी हे जणू सजीवांचे अमृतच आहे. पाणी नसेल तर सजीवाला मृत्यू येतो. म्हणून भगवंत सूर्य आहेत. भगवंत उष्णता आहेत. भगवंत ढग आहेत. भगवंत जल आहेत. भगवंत अमृत आहेत. भगवंत मृत्यू आहेत. चराचरात जे जे सत् दिसते ते भगवंत आहेत. या सृष्टीत जे जे असत् दिसते तेही भगवंत आहेत. भगवंत जसा आत्मा आहेत, तसा ते परमात्मा आहेत. ते कर्ता आहेत. ते करविता आहेत. जन्माला जसे ते कारण आहेत तसे मृत्यूलाही कारण आहेत, ते पालनकर्ता आहेत. धारणकर्ताही आहेत; पण मनुष्य मात्र सर्व माझे म्हणून मोहाच्या मागे धावतो.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 20
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात; ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वगति देवांचे भोग भोगतात.
एकूण चार वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद. या चार वेदांचा अभ्यास असणाऱ्या ब्राह्मणांना चतुर्वेदी म्हणतात. असे ब्राह्मण अत्यंत कमी म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके कमी असतात. पहिल्या तीन वेदांमध्ये कर्माचे विवरण आहे, व त्याची फलप्राप्तीही दिली आहे. त्यामुळे तीन वेदांचा अभ्यास करणारे ब्राह्मण त्यांना त्रिवेदी म्हणतात. त्यांना समाजात अत्यंत प्रतिष्ठा असते. असे ज्ञानी लोक निष्काम कर्मापेक्षा सकाम कर्म करतात. सोमरसाचे प्राशन करतात. पापक्षय होऊन पुण्य जोडण्यासाठी विविध यन्न करतात. स्वर्गप्राप्तीची अपेक्षा करतात.
कोणी चंद्रलोकाची, तर कोणी इंद्रलोकाची अपेक्षा करतात. असे लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात. तेथे असणारे सुख भोगतात. जे अनन्यतेने माझी भक्ती करतात, त्यांना परमपद प्राप्त होते. त्यांना मात्र पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 21
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या, तिन्ही वेदांत सांगितलेल्या सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. अर्थात, पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात.
यज्ञात अनेक प्रकारची कर्मे सांगितली आहेत. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. प्रत्येक कर्माचे फळ वेगळे. प्रत्येक यज्ञाची फलप्राप्ती वेगळी. कोणी स्वर्गप्राप्तीसाठी, तर कोणी धनदौलत, ऐश्वर्य, समृद्धी, संकटनाश यासाठी यज्ञ करतात. कोणी पापक्षय होऊन पुण्यप्राप्तीसाठी यज्ञ करतात. कोणी महालोकातून जनलोकात व जनलोकातून तपोलोकात जाण्यासाठी कर्म करतात. अशी सकाम कर्मे करून अनेक लोक पुण्यसाठा करतात व मृत्युनंतर स्वर्गप्राप्ती करतात; पण स्वर्ग त्यांना कायमचा प्राप्त होत नाही.
जोपर्यंत पुण्याचा साठा खिशात आहे, तोपर्यंत स्वर्गात मुक्काम ठेवता येतो; पण खिशातील पुण्य संपले की, त्या लोकांना पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. त्यांच्या जन्म- मृत्यूच्या येरझाऱ्या सुरू होतात.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 22
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भज्ञतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.
जे लोक अनन्य भावाने भगवंताला शरण जातात, निष्काम कर्म करतात. इंद्रिय दमन करतात, विषयवासनेपासून दूर राहतात, जे भक्त आपल्या कर्माचे कर्तेपण भगवंताला देतात, जे लोक सत्कर्म करतात व निरंतर भगवंताचे स्मरण करतात, जे लोक ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, ध्यानमार्ग, यापैकी कोणत्याही मार्गाने भगवंताची भक्ती करतात. जे लोक श्रवण, कीर्तन, नामस्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन. दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा नवविधा भक्ती मार्गाने भगवंताची अनन्यतेने भक्ती करतात, अशा सर्व भक्तांचा योगक्षेम भगवंत सांभाळतात. योग म्हणजे गरजा.
मनुष्याला प्रमुख तीन प्रकारच्या मूलभूत गरजा असतात. त्या म्हणजे १) अन्न-पाणी २) वस्त्र ३) निवारा. या मूलभूत गरजा भगवंत उपलब्ध करून तर देतातच, पण त्याशिवाय इतर मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक असणाऱ्या गरजासुद्धा भगवंत उपलब्ध करून देतात. एवढेच नव्हे, तर त्या गरजांचे रक्षणदेखील भगवंत करतात; भगवंत काय करीत नाहीत? भगवंत सर्व काही करतात. पण त्यासाठी भगवंतावर आपली मनापासून श्रद्धा पाहिजे. भगवंतावर आपली अनन्यतेने भक्ती पाहिजे, भगवंत भावाचा भुकेला आहे.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 23
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
हे कौन्तेया, अर्जुना! जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात; परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते.
भगवंत आणि इतर देव-देवता यामध्ये काय फरक आहे? भगवंत म्हणजे राजा अशी कल्पना केली तर देवदेवता म्हणजे त्या राज्याच्या प्रशासन कार्यालयातील विविध खात्यांचे उच्च अधिकारी आहेत. एखाद्या व्यक्तीने प्रशासकीय अधिकाऱ्याला प्रसन्न केले तर तो अधिकारी त्याच्या कार्यक्षेत्रातील लाभ त्या व्यक्तीला देतो. समजा, एखाद्याने श्री लक्ष्मीची भक्ती केली, तर लक्ष्मी देवता त्या भक्ताला धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य प्रदान करते. जर एखाद्या भक्ताने सरस्वतीची उपासना केली, तर ती सरस्वती देवता त्या भक्ताला विद्वत्ता, ज्ञान प्रदान करते.
जर एखाद्याने मारुतीची उपासना केली, तर हनुमंत आपल्या भक्ताला शक्ती, सामर्थ्य, बल प्रदान करतो; पण राजाला प्रसन्न केले तर तो मागेल ते देऊ शकतो. अर्धे राज्यदेखील देऊ शकतो. तसे भगवंताची जर उपासना केली तर भगवंत भक्ताला परमपद प्रदान करतो. जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतो. देव- देवतांची उपासना करणारे भक्त अज्ञानी असतात; पण भगवंताची उपासना करणारे भक्त ज्ञानी असतात. जरी भक्ताने देव-देवतांची पूजा केली तरी ती भगवंतालाच पोहोचते. नदीला मिळणारे पाणी समुद्रालाच मिळते. तसे देवतांची पूजा भगवंतालाच अर्पण होते.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 24
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे; पण ते मला, परमेश्वराला तत्त्वतः जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात.
मनुष्य स्वतःच्या लाभासाठी निरनिराळे यज्ञ करतो. प्रत्येक यज्ञाचे फळ वेगवेगळे असते. मनुष्य धारणेसाठी अनेक वस्तू, पदार्थ उपयोगी पडतात. वनस्पती, पाणी, धनधान्य, फळे, प्राणी, हवा, पाऊस, अग्नी, दूध, जमीन, सूर्य, आकाश, इ. अनेक वस्तू प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उपयोगी पडतात. त्यांचे उपकार होत असतात. ते ऋण थोडे का होईना, फेडावे म्हणून व ती जाणीव राहावी म्हणून यज्ञकर्म केले जाते. शिवाय अशा यज्ञापासून पुण्यादी इतरही काही लाभ मिळतात.
स्वर्गादी लोक प्राप्त होतात. शिवाय वेगवेगळ्या देवदेवतांपासून वेगवेगळी फळे प्राप्त होतात. म्हणून लोक यज्ञ करतात. अशा या सर्व यज्ञांचा भोक्ता स्वतः भगवंत आहेत; कारण या सर्व यज्ञांचे स्वामी स्वतः श्री भगवंत आहेत; पण नेमके हेच यज्ञ करणारे लोक विसरतात, कारण ते अज्ञानी असतात. ते सकाम कर्म करतात. काही तरी मिळविण्यासाठी ते कर्म करतात. त्यामुळे जरी त्यांना स्वर्ग प्राप्त झाला तरी ते पुण्यक्षय होताच पुन्हा जन्म-मृत्यूचा फेऱ्यात अडकतात. भगवंताला न जाणल्यामुळे त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो; पण जे अनन्यतेने भगवंताची भक्ती करतात, निष्काम कर्म करतात, तेमात्र जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटतात.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 25
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.
आता आपल्या मनात असा प्रश्न उभा राहतो की, लोक देवांची पूजा करतात. लोक पितरांची पूजा करतात. लोक भुतांची पूजा करतात. लोक भगवंताची पूजा करतात. या सर्व पूजा जर भगवंताला प्राप्त होतात तर बिघडले कोठे? नदी शेवटी समुद्रालाच मिळणार ना! पण हे लक्षात घेतले पाहिजे की, गंगा म्हणजे ब्रह्मपुत्रा नव्हे. यमुना म्हणजे शरयू नव्हे. प्रत्येक नदीचे जसे माहात्म्य वेगवेगळे असते, तसे प्रत्येकाची भक्ति वेगळी. त्यांची फळे वेगळी असतात. देव-देवतांची पूजा करणारे देवलोक प्राप्त करून घेतात. शंकराची भक्ती करणारे कैलास प्राप्त करतात.
चंद्राला भजून चंद्रलोक मिळवतात. काही सूर्यलोक प्राप्त करतात. काही ब्रह्मलोक मिळवतात, तर काही इंद्रलोकी जातात. अशा रीतीने देवांची भक्ती करून ते देवांना मिळतात. काही अज्ञानी लोक पितरांची पूजा करतात. त्यांना वाटते की, हीच खरी ईश्वरपूजा आहे; पण ते लोक पितरांना जाऊन मिळतात. जे भुतांची पूजा करतात त्यांना इंद्रजाल किंवा जादूटोणा करणारे जादूगार म्हणतात. ते लोक भुतांना प्राप्त होतात; पण जे भगवंतांची भक्ती करतात ते मुक्त होतात. त्यांना पुनर्जन्म नाही.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 26
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो.
जर एखादा मनुष्य म्हणेल की, माझ्याजवळ पैसा अडका, द्रव्य, उंची वस्खे, मुबलक धान्य नाही. मी गरीब आहे. मला देवाची भक्ती कशी जमेल? मला भगवंत जवळ करेल का? याचे उत्तर भगवंतांनी या श्लोकात दिले आहे. भगवंताला निसर्गात सहज उपलब्ध होणारी पाने, फुले, फळे, पाणी अर्पण केले तरी चालेल. भगवंत भावाचा भुकेला आहे. विड्याची पाने, रुईची पाने, तुलसी पत्र, बिल्वपत्र, विविध पत्री व दूर्वा भगवंताला आवडतात. सत्यभामेपेक्षा आपली भक्ती अनन्य आहे हे एक तुलसीपत्र भगवंताला अर्पण करून रुक्मिणीने दाखवून दिले. रुईची पाने मारुतीला, तर दूर्वा गणपतीला आवडतात. विविध प्रकारची फुले भगवंताला आवडतात.
संकटसमयीं भगवंताला अनन्य भावाने कमलपुष्प अर्पण करून गजेंद्राने प्रचंड मक्रापासून मृत्यूच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. प्रसाद म्हणून भगवंत श्रीफळ व फळांचा स्वीकार करतात. अनन्य भक्तीपोटी श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरेसुद्धा आनंदाने खाल्ली. थंड पाण्याचे स्नान भगवंताला आवडते. चरणतीर्थाचे खूप महत्त्व आहे.
.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 27
भगवद गीता अध्याय 9 श्लोकआणि अर्थ
हे कौन्तेया, अर्जुना! तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर.
अर्पण भक्तीचे महत्त्व सांगताना भगवंत म्हणतात की, जीवन जगण्यासाठी मनुष्याला काही ना काही कर्म करावेच लागते. जर कर्म करायचेच आहे तर मग प्रपंच काय वाईट आहे? मुळीच नाही; पण तो करताना त्यात अडकून पडू नये. लहान मुले जसे खेळ खेळतात तसा प्रपंच करावा. सर्व कर्माचे कर्तेपण भगवंताकडे सोपवावे. आपण जे अन्न ग्रहण करतो ते भगवंताला अर्पण करून नंतर ते खावे.
आपण यज्ञात जे जे हवन करतो, ते सर्व भगवंताला अर्पण करावे, आपण धनसंचय करतो, व त्यातील काही भाग दान करतो. त्याला द्रव्यदान म्हणतात. द्रव्यदान, अन्नदान. गोदान, वस्त्रदान, भूदान, वृक्षदान इ. कोणतेही दान असो, ते सर्व दान प्रथम भगवंताला अर्पण करावे, व नंतरच ते दुसऱ्याला द्यावे. आपण जे तप करतो, जे पुरश्चरण करतो, जी साधना करतो. ते सर्व भगवंताला अर्पण करावे. भगवंत तर सर्व सृष्टिकर्ता आहे. त्याला काय कमी आहे? मग त्याला कर्तेपण कशासाठी द्यायचे? कर्तेपण भगवंताकडे सोपवले की, आपण निर्मोह होतो. आपली भगवंतावरील श्रद्धा दृढ होते.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 28
अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला, भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. जो मनुष्य आपले सर्व जीवनच भगवंताला अर्पण करतो, कर्म, ज्ञान, भक्ती, ध्यान हे सर्व भगवंताला अर्पण करतो, त्याला संन्यासी म्हणतात. संन्यास म्हणजे मुक्त होणे; पण संपूर्णपणे कर्म आपल्याला टाळता येत नाही.
प्रत्येक कर्माला शुभ किंवा अशुभ असे फळ असतेच. जर कर्म करून त्याचे फळ ईश्वरार्पण केले तर त्याला युक्त वैराग्य म्हणतात. त्यामुळे मन स्वच्छ होते, शुद्ध होते. त्याला युक्त चित्त असेही म्हणतात. मग आता कर्मबंधनातून जर मुक्त व्हायचे असेल तर कर्मापासून मुक्त झाले पाहिजे. केलेली कर्मच आपण भगवंताला अर्पण केली तर भगवंत आपल्याला या कर्मबंधनातून कायमचे मुक्त करतो. एवढेच नव्हे, तर तो आपल्याला भगवंताच्या स्वरूपात सामावून घेतो. प्रपंच करायला भगवंत नाही म्हणत नाहीत; पण सर्व कर्मांचे कर्तेपण भगवंताकडे देण्यास सांगत आहेत.
कर्तेपण भगवंताकडे द्यायचे म्हणजे काय करायचे? तर बोलताना भगवंताला आवडेल तेच बोलावे, तेच वाचावे, भजन-कीर्तन करावे. भगवंताचेच गुणगान ऐकावेत. कीर्तन, प्रवचन ऐकावे. अन्नाचा नैवेद्य दाखवून काही भाग गायीला, काही भाग पक्ष्यांना, तर काही भाग भुकेल्याला द्यावा. उरलेला भाग आपण सेवन करावा.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 29
मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो.
भगवंतांनी स्पष्ट केले आहे की, भगवंत चराचरात समभावाने व्यापून राहिले आहेत. भगवंताला कोणी प्रिय वा अप्रिय नसते; परंतु भगवंत पुढे असेही म्हणतात की, जो भक्त माझी अनन्यतेने भक्ती करतो तो माझ्यात व मी त्याच्यात प्रत्यक्ष प्रकट होतो. ध्रुवएक बालक होते. द्रौपदी एक स्त्री होती. विदुर एक दासीपुत्र होता. शबरीएक भिल्लीण होती. गजेंद्र एक पशू होता. प्रल्हाद एक आसुर कुळातील होता; पण हे सारे भक्ता भगवंताचे अनन्य भक्त होते, लाडके भक्त होते. त्यांचा उद्धार भगवंतांनी केला. भगवंत भक्तांचेही भक्त होतात; पण तशी भक्ती आपण केली पाहिजे, तशी तळमळ आपल्याला लागली पाहिजे.
नवविधा भक्तीचे महत्त्व भगवंतांनी सांगितले, याचे कारण प्रत्येक भक्ताची आवड भिन्न असते. आपल्या प्रकृतीला मानवेल ती भक्ती अनन्यतेने करावी. एकदा चित्त शुद्ध झाले की, निम्मे काम झाले; पण चित्त शुद्धीसाठी आचरण शुद्ध असावे लागते. आचरण शुद्धीसाठी कर्म शुद्ध असावे लागते. हे जर माणसाने लक्षात ठेवले तर नराचा नारायण व्हायला वेळ लागत नाही. भगवंत भावाचा भुकेला आहे.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 30
जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा; कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात, त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, असा पूर्ण निश्चय केलेला असतो.
मनुष्य दोन प्रकारची कर्म करतो. एक म्हणजे उपाधीयुक्त कर्म व दुसरे आध्यात्मिक किंवा दिव्य कर्म. शरीरधर्मासाठी करावी लागणारी कर्मे, समाजनियमानुसार करावी लागणारी कर्मे, राष्ट्र नियमानुसार करावी लागणारी कर्मे इ. कर्मांना उपाधीयुक्त कर्मे म्हणतात. यातसुद्धा सत्कर्मे व दुराचारी कर्मे असे दोन प्रकार आहेत. भगवंताची भक्ती करण्यासाठी करावी लागणारी जी कर्मे आहेत, त्यांना आध्यात्मिक कर्मे किंवा दिव्य कर्मे म्हणतात.
भगवंताची उपासना करतानाकाही वेळा अनावधानाने अधःपतन होते, हातून दुराचार घडतो. अशावेळी समाज त्याला दुर्वर्तनी ठरवतो; पण भगवंत त्याला सुधारण्याची पुन्हा संधी देतात. त्याचा भक्तिभाव आनंदाने स्वीकारतात. त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. भगवंत त्याला सज्जनच समजा असे म्हणतात. म्हणून तर वास्वाव, वाल्मीकी होऊ शकतो. मनुष्य म्हटला की, चुका ह्या होणारच, पण पश्चात्ताप होऊन चूक सुधारली की, मनुष्य दानवाचा मानव व मानवाचा देव होऊ शकतो.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 31
तो तत्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो. अर्जुना ! तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की, माझा भक्त नाश पावत नाही.
हे अतिशय दुराचारी मनुष्य भगवंताची भक्तीच करीत नाही असे नाही. त्याच्या हृदयात भक्तीची जर ज्योत तेवत असेल तर त्याचे चित्त शुद्ध होऊ शकते. वेदामध्ये जर एखाद्याचे अधःपतन झाले तर त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागते, असे म्हटले आहे; पण येथे भक्ती हेच प्रायश्चित्त असल्याने तो दुराचारी होत नाही. भगवंत त्याला सदाचारी समजतात. अनेक अतिउच्च पातळीवर गेलेल्या योग्यांचेसुद्धा आकस्मित अधःपतन होते. ते खालच्या पातळीवर येतात. असे योगी जर पश्चात्ताप होऊन पुन्हा आध्यात्मिक मार्गावर गेले तर ते धर्मात्माच आहेत, असे समजावे. त्यांच्या तात्पुरत्या झालेल्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करावे. असे धर्मात्मे नंतर परमगतीला जातात. नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतात.
भक्तीचे फळ कधी उणे होत नाही. त्या पुण्याचा संचय होत राहतो. जसजशी भक्ती वाढेल तसतसा पुण्यसंचय वाढतच राहतो. त्यामुळे भगवंताचीभक्ति करणारा भक्त कधी नाश पावत नाही. तो भगवत्स्वरूपात मिसळतो. त्याला जन्म- मृत्यूच्या चक्रात जावे लागत नाही, कारण त्याने केलेली अनन्य भक्ती भगवंताला आवडते. भगवंत भावाचा भुकेला असतो. कलियुगात स्मरणभक्ती श्रेष्ठ मानली आहे.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 32
हे पार्धा अर्जुना ! स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनीतील अर्थात चांडाळादी कोणीही असो, तेसुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार समाजातील सर्व स्तरांतील लोकांनाआहे, असे स्पष्ट नमूद केले आहे. त्रिगुणानुसार समाजव्यवस्थेचे चार प्रकार केले आहेत. जे सत्त्वगुणी असतात, त्यांना ब्राह्मण असे समजतात. जे रजोगुणी असतात त्यांना क्षत्रिय व प्रशासकीय असे संबोधतात.
जे रजोगुणी व तमोगुणी यांनी मिश्रित असतात त्यांना वैश्य, व्यापारी, कृषिवल म्हणतात. जे तमोगुणी असतात त्यांना शूद्र संबोधतात. याशिवाय जे नीच कुळात किंवा पापी कुळात जन्मतात, त्यांना चांडाळ असे म्हणतात. अशा सर्व स्तरांतील लोकांना, एवढेच नव्हे, तर स्त्रियांनासुद्धा भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे, भगवंताला शरण जाण्याचा अधिकार आहे, असे स्वतः भगवंत म्हणतात. असे सर्व भक्त परमगतीला प्राप्त होतात. द्रौपदी, अहिल्या स्त्रिया होत्या.
मूलाधार वैश्य होता. युधिष्ठीर क्षत्रिय होता. प्रल्हाद आसुर कुळातील होता. ध्रुव बालक होते. शबरी स्त्री असून शूद्र होती. विदुर दासीपुत्र होता. सुदामा दरिद्री होता. गजेंद्र पशू बोनीतील होता; पण अनन्य भक्तीमुळे या सर्वांचा उध्दार भगवंतांनी केला. म्हणून अनन्य भक्ती भगवंतासाठी महत्त्वाची आहे, मग तो कोणत्याही योनीतील असो.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 33
मग पुण्यशील, ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे? म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्यशरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर.
हे जग अनित्य आहे, सुखरहित आहे, नाशवंत आहे, असे भगवंत सांगत आहेत. हे जग अनित्य आहे म्हणजे काय आहे? तर हे जग अशाश्वत आहे, नष्ट होणारे आहे. या अनित्य जगात सुख प्राप्त होत नाही. चिरकाल टिकणारे सुख या जगात प्राप्त होत नाही. जे भासते ते क्षणैक सुख असते. जगात अनेक ज्ञानी लोक आहेत, विद्वान लोक आहेत. ते तरी सुखी आहेत का? तर त्याचेही उत्तर नाही असेच आहे, कारण मनुष्याचे शरीरसुद्धा अनित्य आहे.
सुखरहित आहे, नाशवंत आहे. मग असे एखादे जग आहे का, की जे शाश्वत आहे, दुःखरहित आहे, नित्य आहे. तर असे जग म्हणजे विष्णुलोक होय, वैकुंठ होय. तेथे परमपद आहे. तेथे चिरशांती आहे. तेथे परमानंद आहे. तेथे सच्चिदानंद आहे. तेथे मुक्ती आहे. तेथे भगवंतस्वरूप होता येते. येथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ, स्त्रिया, बालके अशा विविध योनीतील व श्रेणीतील अनन्य भक्त येतात. भगवंताची भक्ती करीत भगवंताचे नामस्मरण करीत मृत्युलोकी देह ठेवतात. भगवंत त्यांना परमपद बहाल करतो.
भगवद गीता अध्याय 9 श्लोक 34
माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील.
भगवंतांनी या अध्यायात आपल्याला सर्व विद्यांचा राजा असलेली विद्या व अतिशय गुह्यतम ज्ञान सांगितले आहे. तसेच योगशास्त्रातील अत्यंत सोपा असा भक्ती योग आपणास सांगितला. भक्ती कोणी करावी हे सांगितले. भक्ती कशी करावी हे सांगितले. भक्तीचे फळ कोणते हे सांगितले. हे सर्व भगवंतांनी जरी अर्जुनाला सांगितले असले तरी ते सर्व जगासाठी सांगितले आहे. शेवटी भगवंत अर्जुनाला सांगतात की, हे अर्जुना ! तू तुझे मन माझ्या ठिकाणी एकाग्र कर. तू इतर कोणाचा भक्त होण्यापेक्षा माझा भक्त हो, कारण अतिशय सर्वोच्च मानले जाणारे परमपद फक्त मीच देऊ शकतो.
तू माझी पूजा कर, कारण ती मला लवकर प्राप्त होते. इतर देवांची पूजा केली तरी ती शेवटी मलाच प्राप्त होते. तू मला नमस्कार कर. तो मला लगेच प्राप्त होतो. देवांना केलेला नमस्कार शेवटी मलाच प्राप्त होतो, कारण सर्व विश्वाचा स्वामी मीच आहे. हे परमसत्य आहे. श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी राजविद्याराजगुह्ययोग हा नववा अध्याय समाप्त झाला.